Saturday 4 July 2015

Attitude matters ..

काल विम्बलडन मध्ये जागतिक क्रमवारीत 102 क्रमांकावर असणार्या डस्टिन ब्राउन ने नदाल ला हरवल्याचे समजले आणि मन 6-7 वर्षे मागे गेले . तो काळ नदालचा उमेदीचा काळ होता . आणि त्याचा पारम्पारीक प्रतिस्पर्धी होता रॉजर फेडरर . रॉजर फेडरर , टेनिस चा अनभिषिक्त सम्राट ! आपल्या कारकीर्दीत 302 आठवडे ( त्यात 237 सलग) जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर रहाण्याचा विक्रम या अदभूत खेळाडूच्या नावे आहे .
पण फेडरर जास्ती लक्षात रहातो तो त्याच्या शांत , विनम्र स्वभावामुळे. सहा फुटांपेक्षा जास्त उंची , बारीक शरीरयष्टी , आणि प्रसन्न हसतमुख चेहरा . खेळातली प्रतिभा तर त्याच्याकडे आहेच पण वागण्याबोलण्यातली सहजता ,  शांत विनम्र स्वभाव त्याला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते . इतके ग्रॅंड्स्लाम जिंकले , इतके विक्रम झाले तरी कधीही या खेळाडूने आपल्या विजयाचा उन्माद मैदानावर व्यक्त केला नाही . की कधी हरल्याचा त्रागा , चिडचिडेपणा व्यक्त केला नाही . हरल्याचे दु:ख त्याला होते ; ते फक्त  त्याच्या अश्रू तून दिसते .  समोरचा खेळाडू नवखा असला तरी फेडररने कधीही त्याला कमी लेखले नाही . सगळे सामने तो पूर्ण ताकदीने खेळतो. आपण जिंकणार हे माहित असले तरीही त्याने कधी दुसर्याचा अपमान होइल , कमीपणा येइल असे वर्तन केले नाही . फेडरर चा खेळ बघताना खेळाचे सौंदर्य , त्याची उचतम दर्जाची गुणवत्ता , खेळावरची पकड या गोष्टी पाहून मंत्रमुग्ध व्हायला होते आणि  त्याचा खेळ बघताना एका जंटलमॅन चा खेळ बघितल्याचे समाधान सुद्धा मिळते. साधारणपणे 2002 ते 2010 पर्यंत या टेनिस च्या जादूगाराने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले .

नदाल चे टेनिस पण लवकर सुरू झाले पण तो नावारूपाला आला 2005 नंतर. टेनिस मधल्या कौशल्या बरोबर व्यायामाने कमावलेले शरीर , जबरदस्त फिटनेस ,  मोठया ताकदीचे फटके यामुळे हा खेळाडू वलयांकित झाला . खेळातली गुणवत्ता तर आहेच त्याच्याकडे पण क्लेकोर्ट ही त्याची USP. तिथे त्याला हरविणे फेडररलाही जमलेले नाही अजून. नंतर नंतर तर ग्रॅंड्स्लाम ची फायनल म्हणजे नदाल आणि फेडरर असे समीकरणच होवून गेले . तिसरा कोणीही नाही तिथे . खूप रोमांचक व्हायच्या या मॅचेस. दोघेहे जिंकण्यासाठी जीवाचे रान करायचे . पण नदाल खरा प्रसिद्ध झाला तो त्याच्या आक्रमक शैली मुळे . सेट किंवा सामना जिंकल्यावर आरडाओरड करून विजय साजरा करण्याची त्याची पद्धत असो किंवा प्रतिस्पर्ध्यावर हिंस्र श्वापदाप्रमाणे तूटून पडणे असो , लोकाना तो आवडू लागला . आपल्या आक्रमक देहबोलीने तो प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणी . आणि हे त्याचे प्रकार फेडरर समोर जास्ती प्रमाणात व्हायचे . तोवर लोकाना खात्री वाटू लागली की फेडररचा टेनिस विश्वातला एकछत्री अम्मल हा मोडू शकतो. फेडरर विरूद्धचा विजय त्याला एक वेगळीच झिंग आणी . तो त्याच्या देहबोलीतून जणू बोले की, बघ या तुझ्या चाहत्यांसमोरच मी तुझ्या वर्चस्वाला सुरूंग लावतोय.. आणि तेव्हा शांतपणे आपली बॅग भरून कोर्ट सोडणारा फेडरर दिसला की काळजात कससच व्हायच.  नदाल , फेडरर पेक्षा सहा वर्षानी लहान आहे . हळूहळू हा वयाचा फरक फेडरर च्या खेळात दिसायला लागला . आता नदालला हरविणे फेडररला कठीण जाउ लागले . पुढे फेडरर हरू लागला . पण विजेतेपद किंवा उपविजेतेपद इतकेच . फेडररने आपल्या खेळाचा दर्जा याखाली येउ दिला नाही.  अजूनही कोणी तिसरा खेळाडू, त्यांच्या आसपास नव्हता. फेडररच्या चहात्यानी सुद्धा , नदालबरोबरच हरतोय ना मग ठीक आहे, नदालचे वयच आहे उमेदीचे .अशी समजूत काढून घेतली .

आणि इथे नदालचा काळ सुरू झाला , यशाच्या शिखरावर जाण्याची त्याला संधी मिळाली . फेडरर प्रमाणेच नदाल आता येणारी अनेक वर्षे टेनिस चे सम्राटपद भूषवेल अशी नदालच्या चाहत्यांची खात्री होती . आणि याच दरम्यान जागतिक टेनिस मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविच चा प्रवेश झाला . अनेक धक्कदायक निकाल देताना नोवाक ने फेडरर आणि नदाल ला पण हरवून आपले विजय हे गुणवत्तेवर आधारित आहेत हे जगाला दाखवून दिले.
फ्रांस चा त्सोंगा सुद्धा अशीच मुसंडी मारू लागला . एकूणच टेनिसच्या जगात परीपूर्ण यश मिळवण्यापूर्वीच नदाल ला तोडीस तोड स्पर्धा वाट्याला आली . पण तो या स्पर्धेला समर्थपणे तोंड देण्यास कुठेतरी कमी पडला . नवीन खेळाडू हे ताज्या दमाचे आणि उच दर्जाच्या गुणवत्तेचे आहेत . नोवाक ने तर जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवून ते सिद्ध केलेय . फेडरर च्या वाटेला अशी स्पर्धा नव्हती का ? जरूर होती . लियांडर पेस, मरात साफिन , लेटन हेवीट  , अंडी मरे असे दिग्गज खेळाडू तेव्हा टेनिस  विश्वात होते . तरी फेडरर ने न भूतो न भविष्यति असे यश मिळवले .
क्ले कोर्ट हा नदाल चा प्लस पॉइंट आहे ; पण इतर ठिकाणी त्याला पुरून उरणारे खेळाडू आहेत . पण या सगळ्या पेक्षा मला महत्वाचा वाटतो तो खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन . फेडरर चे साम्राज्य सम्पवणे हा एकमेव हेतू न ठेवता नदाल ने खेळ केला असता तर आज चित्र थोडे वेगळे असते . आपली मैदानावरची आक्रमकता थोडी आवरून खेळावर लक्ष केंद्रीत केले असते तर त्याच्या कारकीर्दीचा सुर्यास्त अजून लाम्बला असता . 2014-15 ही वर्षे त्याला दुखापतीची ठरली आहेत .
अर्थात नदालसाठी सगळे काही सम्पले असे नाही . फिनिक्स प्रमाणे भरारी घेण्याची ताकद त्याच्यात नक्कीच आहे .
आत्तच्या जागतिक क्रमवारीत नदाल दहा नम्बर ला तर फेडरर दोन नम्बर ला आहे . ही आकडेवारीच दोघांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकायला पुरेशी आहे .
Pune 12:45 am