Monday 21 June 2021

नवीन सुरूवात

    कोर्टरूम मध्ये त्याने दिलेला DD हातात घेउन आपल्या लालची डोळ्यानी ती त्याकडे बघत होती. तो तिच्या मागेच उभा होता. DD वरचा आकडा एकदा बघून रक्कम किती आहे हे समजायची बौद्धिक कुवत नसल्याने ती  लहान मुलासारखे एक एक शून्य मोजत खात्री करत होती. त्याला मात्र  गेल्या साडे चार वर्षांच्या घडामोडीमुळे आलेला मानसिक ताण असह्य होत होता. तसेच ही रक्कम गोळा करताना त्याची  आणि त्याच्या आईची झालेली परवड , लोकांकडे पसरावे लागलेले हात , मध्ये आलेल्या सुट्ट्यान्मुळे झालेली घाई , दरम्यान lockdown लागायची भिती या सगळ्या पळापळीमुळे ते दोघेही खूप थकले  होते ; पण ह्या एका दुष्ट चक्रातून सुटका होणार ही  एकमेव दिलासा देणारी गोष्ट होती.
    हे लग्न करताना मुलीच्या घरच्यांची परिस्थिती नाही आणि आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न म्हणून सारा खर्च त्याच्या आईने एकटीने केला होता.आता  आज यातून बाहेर पडण्यासाठी पण त्यालाच  आणि आईलाच  पैसे गोळा करून द्यावे लागले. या देशात मुलगा म्हणून जन्म घेणे हा शाप झालाय. 
    न्यायाधीश महाराजानी दोघाना हा निर्णय घेताना कोणाचा दबाव नाही ना याची खात्री केली. तसेच ती या  रकमेत समाधानी आहे ना ? याची त्यानी तिच्याकडून खात्री केली. आणि शेवटी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. 
    जे नाते दोघान्मध्ये कधी निर्माणच झाले नव्हते पण कायद्यामुळे पती पत्नी हा शिक्का बसला होता तो आज न्यायाधीश महाराजांच्या सहीमुळे पुसला गेला. आणि तो  त्याचे  आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळा झाला.
ही भावना किती सुखकारक आहे याची कल्पना जो कोणी या प्रसंगातून गेलाय त्यालाच समजू शकते. गेली साडे चार वर्षे संयमाची कठोर परीक्षा घेणारी गेली. आयुष्याला पुरतील असे अनुभव देउन गेली. काही नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी ,  वकील, आपली महान न्यायव्यवस्था, यांची आगळीवेगळी रूपे , तसेच परमेश्वराची कृपा असली तर काय काय होवू शकते याची जाणीव देणारी ही वर्षे होती. 
     त्या दोघांच्या नात्यात काही बिनसले आहे हे जेव्हा पहिल्यांदा  नातेवाईकांना कळले तेव्हासुद्धा  काही जणांकडून इतक्या मिश्र प्रति क्रीया उमटल्या की त्या समजल्यावर त्याला आपण या सर्वाना आपले नातेवाईक म्हणून इतके वर्षे का समजत होतो असे वाटायला लागले. काय झाले आहे हे माहित करून न घेता काही जणानी पैसे देउन मोकळे व्हा असे सल्ले दिले. काहीनी आपल्या कुठल्यातरी खटल्यात आपल्याला किती द्यावे लागले मग त्यामानाने तुम्हाला काहीच द्यावे लागत नाहीये अशी तुलनाही केली. काहीना त्याच्या बाबतीत असे घडले याचा विकृत आनंद पण झाला आणि आता याची मजा बघायची असे ठरवून चेहऱ्यावर दु:खी भाव आणून खोटे सांत्वन केले. काहीनी पाठिमागे त्याच्यात आणि त्याच्या आईत काहीतरी दोष असणार नाहीतर एवढी सोन्यासारखी मुलगी घर सोडून का जाईल? असे तर्क लावले. काहीना मात्र खरोखर वाईट वाटले. "जी काही मदत लागेल ती सांग" असे काहीनी मनापासून सांगितले. त्याला "तुझे सगळे चांगले होइल" असे आशीर्वादही दिले. त्याला आणि त्याच्या आईला या  नातेवाईकांच्या या भूमिका नवीन नव्हत्या. याआधीही असे अनुभव आलेच होते. फक्त आता निमित्त नवीन होते. त्या नातेवाईकांबद्दलचे आपले ठोकताळे बरोबरच आहेत आणि ही लढाई सुद्धा आपल्या दोघानाच लढायची आहे याची जाणीव  वेळेत झाल्याचे  दोघाना त्यातल्या त्यात समाधान होते. आता सुद्धा हा विषय पूर्ण झाल्यावर त्या ठराविक नातेवाईकांच्या काय प्रतिक्रीया येणार याची त्याला कल्पना आहे. "आम्ही म्हणालो होतो ; पैसे द्यावेच लागणार. तेव्हा आमचे ऐकले असते तर कमी द्यावे लागले असते आणि लवकर सुटका झाली असती",  "तरी फार काही द्यावे लागले नाहीत अमक्याच्या तमकीने एवढे मागितले होते", "या दोघाना आमचे ऐकायला नको ; शेवटी मुलाची ४ वर्षे गेली ना फुकट ? " , " शेवटी दिलेच ना एवढे पैसे ? मग कशाला पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून रडत होते ?" इत्यादी इत्यादी. 
    न्यायव्यवस्थेत  'वकील' हा महत्वाचा  दुवा आहे . त्याने  आपल्या अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडून त्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करायचे असतात. त्या साठी त्याला अशिलाकडून फी मिळत असते . पण काही वकील असे आहेत  की ते आपल्या अशिलाना बरोबर उलटे सल्ले देतात. त्याचे परिणाम अशिलावर होतात, कोर्ट  अशिलावर नाराज होते . अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडलीच जात नाही. मग एकतर्फी  काही आर्थिक निर्णय घेतले जातात.त्याचे  वकिलाना काहीच वाटत नाही .अशीलाची आर्थिक परिस्थिती, मानसिक स्थिती याने त्याना काहीही फरक पडत नाही. माणुसकी तर दूरच पण आपले वकील म्हणून असलेले कर्तव्य  सुद्धा  वकील विसरतात .  आपल्या चुकीच्या सल्यामुळे समोरच्याचे काय काय नुकसान होवू शकते याचे त्याना अजिबात भान नसते. आणि आपण वकील आहोत म्हणजे अशीलाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा. अशीलाने प्रश्न विचारलेले त्याना आवडत नाही.त्याचे फोन उचलले जात नाहीत . अशीलाने आपल्या केस बद्दल अभ्यास केलेला त्याना चालत नाही. आणि आपण मागू तेवढे आणि मागू तेव्हा पैसे त्याने द्यावेत याच त्यांच्या अपेक्षा असतात. बदल्यात आपण काय लायकीच्या सेवा देतोय याची त्याना फिकीर  नसते. या वकीलांच्या चुकीच्या सल्ल्यामुळेच त्याचे नुकसान झाले होते. आपल्या कर्मांपासून कोणाचीच सुटका नसते. वकीलांच्या बाबतीत तर त्यांची कर्मे त्यांची तिसरी पिढी भोगते असे म्हणातात. 
    आता त्याच्यासाठी नवीन आयुष्य सुरू होतेय. साडे चार वर्षांचा अनुभव आयुष्यभर सोबतीला रहाणार आहे. आज त्याच्यासारखे असंख्य पुरूष एकतर्फी कायद्याचे शिकार झाले आहेत. कित्येक जण तुरूंगात आहेत , कित्येकांचे पालक उतारवयात कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. कित्येक जण आपल्या पोटच्या गोळ्याचे दर्शन व्हावे म्हणून विनवण्या करत आहेत आणि कित्येक जण असे आहेत ज्याना हा ताण सहन  होत नाही , आई वडिलांचे हाल पहावत नाहीत , समाजाच्या विखारी जीभा असह्य होतात ; ते आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण त्याची तरी कोणाला फिकीर आहे ? एक पुरूष गेला म्हणून कोणाला काहीच फरक पडत नाही. कारण आपल्याला फक्त महिलांचे सबलीकरण करायचे आहे. असे किती पुरूष रोज जातात. कोणालाही त्याचे काही वाटत नाही. मुळात महिला सबलीकरणाच्या पाशवी उत्साहाच्या नादात समाज पुरूषालाही मन असते, आत्मसन्मान असतो , त्यालाही प्रेमाची , गरज असते , त्यालाही काही अधिकार असतात हेच विसरून गेलोय. पुरूष म्हणजे घाण्याला जुंपलेला बैल झालाय ; काहीही  करून त्याने कुटूंबाच्या सतत वाढत्या गरजा भागवायच्या आणि त्यातच आपले आयुष्य खर्ची पाडायचे. यात कधीही कसूर करायची त्याला परवानगी नाही ; तसे झाले तर लगेच  समाज त्याचे लचके तोडायला तयारच आहे. 
    राज्यकर्त्यांनी विवाह संदर्भातले कायदे इतके एकतर्फी करून ठेवले आहेत की मुली त्याचा एक पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून वापर करू लागल्या आहेत. कायद्यांच्या  मूळ उद्देशाला हरताळ फासला जातोय ;पण त्याची दखल  कुठेही घेतली जात नाहीये. आपली काही चूक नसताना केवळ आपण मुलगा आहोत म्हणून आपल्या आयुष्यातील ५ वर्षे मनस्तापाची गेली आणि वर आर्थिक भुर्दंड बसला ही सल त्याच्या मनातून काही केल्या जाणार नाही. महिला सशक्तीकरणाच्या नकली ओझ्याखाली दबलेल्या व्यवस्थेने आज आणखी एक बळी मिळवला.