Friday 19 April 2024

"दुबई चा पूर : निसर्गाचा अजून एक इशारा"

 "दुबई चा पूर : निसर्गाचा अजून एक इशारा"


    १५ -१६ एप्रिल ला मध्यपूर्वेतील संयुक्त अरब अमिरात या देशातील अबू धाबी , शारजाह  आणि दुबई या शहरात अति प्रचंड पाऊस  पडून पूर सदृश स्थिती झाल्याचे आपण सर्वानी टीव्ही वर पाहिले. जगातील श्रीमंत शहरातील एक शहर आणि जगभरच्या करोडपतींचे आवडते शहर, जगातील दोन क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेले शहर  म्हणून दुबई ची ओळख आहे. "बुर्ज खलिफा" या जगातील सर्वात उंच इमारतीसह , मोठ्या माहामार्गांचे जाळे , चालक विरहीत वहातूकीचे जाळे  , स्मार्ट पोलिस स्थानके , जगभरातील मोठ्या अस्थापनांची कार्यालये, जगातील सर्वात मोठा  सोन्याचा बाजार आणि इतर  विविध प्रवासी आकर्षणांसोबत  एक अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि मानवी जीवनाला सुखकर बनवणारे सुनियोजित असे शहर म्हणून  दुबई शहर जगप्रसिद्ध आहे. 

    पण या कथित सुनियोजित शहराला दोन दिवसांपूर्वी पावसाने इतके झोडपले की तिथे पूर आला आणि २४ तासात निसर्गापुढे या शहराने हात टेकले. जे रस्ते महागड्या गाड्या चालवण्यासाठी प्रसिद्ध होते , जो विमानतळ त्याच्या व्यस्ततेसाठी प्रसिद्ध होता, जे बाजार खरेदी विक्रीसाठी जगप्रसिद्ध   होते तिथे पाणी भरून वहातेय आणि संपूर्ण  शहराचे नियोजन कोलमडले आहे. 



    या पूरामागचे प्राथमिक कारण हे दुबई वापरत असलेले क्लाउड सीडिंग तंत्र (ढगात विविध रस्सायने सोडून कृत्रिम पाऊस पाडणे ) आणि याच दरम्यान ओमान वरून दुबई च्या दिशेने जाणारे एक वादळ यांचा एकेमेकांवर काय परिणाम होइल याचा  अभ्यास न करणे हे  दिले जातेय. पण मूळात अशा कृत्रिम पावसाची गरज दुबईला  का लागते हे समजून घेण्यासाठी या शहराचा विकास कसा आणि कुठल्या परिस्थिती मध्ये  झालाय हे थोडक्यात पहावे लागेल.



    दुबई हे पर्शियन आखातातील पूर्वेकडील अरेबियन द्वीपकल्पातील बंदर आहे. तसेच हा भाग अरेबियन  वाळवंटाचा असून सुरूवातीला दुबई बंदर हे फक्त उत्तरेकडून म्हणजे  इराक आणि इराण कडून येणार्या  आणि दक्षिणेकडून म्हणजे ओमान कडून येणार्या जहाजाना थांबा म्हणून वापरले जात होते. याशिवाय मोत्यांची शेती आणि मासेमारी एवढेच उद्योग इथे चालायचे पण वाढत्या व्यापाराने  पर्शियन आखात आणि अरबी समुद्र यामधील वहातूकीसाठी दुबई बंदराचे महत्व वाढू लागले. आणि हे महत्व लक्षात आलेली  आणि त्यावर आधुनिक दुबई ची मूहूर्तमेढ ठेवणारी व्यक्ती म्हणजे 'शेख रशीद बिन सईद अल मख्तुम'. आपल्या चतुराई ने या व्यक्तीने दुबई ला फ्री ट्रेड सिटी घोषित करून जगभरातल्या व्यापार्याना आकर्षित करायला सुरूवात केली. याचा अर्थ या बंदरात व्यापारी आपल्या मालाची खरेदी विक्री दुबई बंदराला कुठलाही कर न देता करू शकत होते. या सोयीमुळे दुबई बंदराचे नाव जगभर व्हायला सुरूवात झाली. तोपर्यंत दुबई बंदरातून फक्त मोत्यांची निर्यात होत होती. पण या नव्या सवलतीमुळे आंतराष्ट्रीय बाजारात दुबईसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या. दुबई मधील पायाभूत सुविधांचा विकास होवू लागला. पुढे ६० च्या दशकात  दुबई मध्ये तेलाचे साठे सापडले आणि दुबई ला एक नवी अर्थिक ताकद मिळाली. शेख रशीद यानी या ताकदीचा फायदा दुबई च्या विकासासाठी केला. रस्ते , शाळा , बॅंक, हॉस्पिटले याशिवाय आंतराष्ट्रीय गुंतवणूकदाराना सोयीसाठी जे जे करता येइल ते दुबई मध्ये केले गेले. यासाठी मोठ्या मोठ्या इमारतींचे बांधकाम दुबई मध्ये सुरू झाले. पश्चिमेला रखरखीत वाळवंट जिथे शेती आणि इतर उत्पादनाची शक्यता कमी आणि पूर्वेला समुद्र जिथे तेलाचे साठे सापडले जे कधीतरी संपणार होते. ह्या मर्यादा लक्षात घेउन  शेख रशीद यानी आपले लक्ष दुबई ला जगभरच्या व्यापार्याना आणि गुंतवणूकदाराना आकर्षित करण्यासाठी दुबई ला एक शिपिंग् हब बनवण्याचे ठरवले. यासाठी दुबई च्या खाडीचा जलवाहतूकीसाठी विकास करण्यात आला  आणि दुबई बंदराचे रूपांतर आंतराष्ट्रीय शिपिंग हब मध्ये करण्यात आले. यामुळे हे बंदर युरोप , मध्य पूर्व आणि आशिया यामधील व्यापाराचे मुख्य केंद्र बनले. आज जगातील १०० पेक्षा जास्त देशातील विविध कंपन्यांची ८००० पेक्षा जास्त कार्यालये दुबई मध्ये आहेत. यात भर म्हणून दुबई ला फ्री ट्रेड झोन म्हणून घोषित केले गेले. यामुळे आयातदार आणि निर्यातदार यांच्यासाठी दुबई हे महत्वाचे बंदर बनले. या नंतर दुबई ने आपले लक्ष पर्यटन उद्योगावर केंद्रीत केले. सोबत वित्तीय सेवा आणि संवाद साधने (communication industry) यावर लक्ष दिले गेले. यासाठी सगळ्यात महत्वाचे असे जागतिक दर्जाचे विमानतळ दुबई मध्ये बांधले गेले. यानंतर दुबई मध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल चालू झाली. या सगळ्यामुळे ९० च्या दशकात दुबई ला फार महत्व प्राप्त झाले. पुढे इ. स. २००० नंतर shopping malls, underwater zoo, artificial islands, luxurious hotels, artificial reservoirs, man made flower gardens उभारली गेली. बुर्ज खलिफाच्या उभारणीनंतर दुबई हे जगाच्या नकाशातील आकर्षणाचे  स्थान झाले. दुबई मध्ये फिरायला, व्यापाराला जाणे , तिथे घर विकत घेणे हे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. यानंतर दुबई ने आपला मोर्चा वैद्यकीय यंत्रसामुग्री, वाहन उद्योग , एंजिनियरींग सेवा याकडे वळवला आणि तिथे सुद्धा दुबई ची प्रगती चालू आहे. दुबई बाबत बोलताना , 'माणूस आपल्या इछाशक्तीच्या जोरावर काय काय करू शकतो हे पहायचे असेल तर दुबई कडे पहा.' असे बोलले जाते. 



   ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू बघूया. या एवढ्या मोठ्या विकासासाठी दुबई कडे नैसर्गिक  स्रोत मर्यादित आहेत. वाळवंटामुळे वापरण्यायोग्य जमीन अतिशय कमी प्रमाणात आहे. स्वत:ची वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी भेट देणारे लाखो पर्यटक याना सामावून घेणे दिवसेंदिवस दुबईला कठीण होत चालले आहे. या सर्व चंगळवादाला पोसण्यासाठी मानवी श्रम महत्वाचे आहेत. आणि हे श्रमजीवी मुख्य शहर सोडून इतर उपनगरीय भागात या देशात पैशाच्या आशेने विविध देशातून आलेले मजूर आहेत. 



   आणखी एक मुद्दा म्हणजे वाळवंटीकरणचा. ही पर्यावरणीय  ऱ्हासाची  नैसर्गिक  प्रक्रिया  आहे; यात सुपीक जमिनीचे रूपांतर वाळवंटात होते. एका अभ्यासानुसार इ.स. २००० ते इ.स २०२० मध्ये दुबई च्या सुपीक जमिनीपैकी ६०% जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. जरी ही नैसर्गिक प्रक्रीया असली तरी  नैसर्गिक  स्रोत जसे की पाणी , माती यांचे शोषण अधिक प्रमाणात झाले की जमिनीचे रूपांतर  वाळवंटात होण्याचे  प्रमाण जास्त आढळते. दुबई मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अति मानवी हस्तक्षेपामुळे  हा वाळवंटीकरणाचा वेग खूप आहे. सुपीक जमिनीची कमतरता ही अन्न धान्यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व वाढवते. ह्यावर उपाय म्हणून दुबई मध्ये vertical farming चे प्रयोग चालू आहेत.



   विकासाची अवाढव्य कामे दुबई ला जगातील सर्वात वाईट Environmental footprints   (एखाद्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या वापराच्या कृतीमुळे पर्यावरणावर होणारे मोजायचे परिमाण) देणारे  शहर म्हणून ओळख देते. हे टाळण्यासाठी तिथल्या शेख नी इ. स. २०१० मध्ये १० लाख नवीन वृक्ष लावून वाळवंट कमी करून सुपीक जमिन वाढवण्याचे ध्येय घेतले.पण तेथील वातावरणामुळे ही झाडे जगली नाहीत. याशिवाय दुबई च्या समुद्रामध्ये मातीचा भराव घालून मानव निर्मित बेटे उभारण्याचे आणि ती विकून पैसे कमवण्यासाठी ३ प्रकल्प आणले गेले.  या प्रकल्पांचा  प्रस्तावित खर्च  १० अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा होता. ३ पैकी २ प्रकल्प जवळजवळ फसले आहेत. ही बेटे उभारताना लाखो घन मीटर माती आणि दगड समुद्राच्या पाण्यात घातले गेले. या कामा दरम्यान तेथील वातावरणाची , समुद्रातील जीवसृष्टीची भरपूर हानी झालेली आहे. पण एवढी निसर्गाची हानी करूनही स्थिर आणि कायमची बेटे उभारणे शक्य झालेले नाही.



   दुबई तील ८५% जनता ही बाहेरून स्थलांतरीत झालेली आहे. जास्त पैसा आणि कर बचत च्या लोभाने हे लोक इथे रहात आहेत. एवढ्या सगळ्या जनतेला आणि दरवर्षी येणार्या पर्यटकाना लागणार्या पाण्याची गरज तिथल्या नैसर्गिक पावसाने भागणे शक्य नाही. इथले वार्षिक पर्जन्यमान  १६० मिमी  आहे;  म्हणून तिथे साधारण २००२ पासून कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्र वापरण्यात येते. यामध्ये ज्या ढगान्मध्ये किमान ४०% बाष्प आहे अशा ढगान्मध्ये विमानाच्या सहाय्याने सिल्वर आयोडाईड , पोटॅशियम आयोडाईड , ड्राय आईस अशी रसायने भरली जातात मग त्यातले बाष्प वाढून वाढीव पाऊस पाडला जातो. काही शाष्त्रज्ञांच्या मते  या रसायनांचा वातावरणावर आणि मानवी आणि पशू पक्षींच्या  जीवनावर वाईट परिणाम होतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढणे , ओझोन वायूचा थर कमी होणे असेही दुष्परिणाम या रसायनांचे आहेत. मूळात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने पावसाचे पाणी निचरा करण्याची पुरेशी योजना दुबईत बनवलेली नाही आणि तीच आता या कृत्रिम पाऊस आणि वादळ यामुळे आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आलेल्या पूराचे एक महत्वाचे कारण आहे .



   आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थ्याना , कॉर्पोरेट मधील नोकरदाराना , सगळीकडे एक आदर्श केस स्टडी म्हणून ' दुबईची प्रगती कशी झाली ?' याचे धडे दिले जायचे ; पण आता या पूराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत की नाही? हे महत्वाचे आहे. विकास , प्रगती , पैसा , भरभराट याच्या आपल्या व्याख्या काय आहेत? आणि आपले पोट कधी भरणार आहे? आपण कुठे थांबणार आहोत की नाही? ह्यावर दुबईतच नाही तर समस्त मानव जातीने विचार करायची गरज आहे. सरासरी मानवी आयुष्य ७५ वर्षे धरले तर ही ७५ वर्षे आपण मालक असल्या सारखे ह्या पृथ्वीवर वावरतो. आपल्या नंतर पुढची पिढी इथे आलेली आहे आणि त्यानंतरही अनेक पिढ्या इथे येत रहाणार आहेत. त्यानासुद्धा आपल्यासारखेच जगायचे आहे. त्यानासुद्धा  नैसर्गिक स्रोत लागणार आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला ही पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवायची आहे. निसर्ग , पंचमहाभूते ह्या कोणी व्यक्ती नाहीयेत की त्या आपल्याला समजावतील. आपण अत्ताच गांभीर्याने विचार करून निसर्गाला ओरबाडणे थांबवायचे आहे. नाहीतर Global warming मुळे दरवर्षीचा उन्हाळा हा मागील वर्षापेक्षा तीव्र आणि उपलब्ध पाणीसाठा हा  मागील वर्षीपेक्षा कमीच होणार आहे. अजून वेळ गेलेली नाही. निसर्ग आपल्याला वेळोवेळी इशारे देतोय ; अतातरी  सावध होवून कृती केली तर आपण वाचू शकतो आणि पृथ्वीला वाचवू शकतो .


- श्रीकृष्णार्पणमस्तू.

चैत्र शु एकादशी , दि: 19-04-2024

Saturday 23 March 2024

रणदीप हूडांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' :- सर्वानी अवश्य पहावा.



  काल प्रदर्शित झालेला रणदीप हूडा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  हा सिनेमा पाहिला. 
लहानपणापासून सावरकर हे खूप वेळा वाचलेले असले आणि त्यांचा सारा जीवनपट आपल्या समोर असला तरी  कोणीतरी नव्याने त्यांच्यावर आधारीत कलाकृती बनवतेय हे समजल्यापासून मन या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. चित्रपटाचे दिग्दर्शक , निर्माता  आणि अभिनेता या महत्वाच्या तीनही जबाबदारी पेलेणार्या अभिनेता रणदीप हूडा यानी एक चांगला चित्रपट बनवला त्याबद्दल यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे. अमराठी माणसाने सावरकर समजून घेणे , त्यांचा अभ्यास करणे , आणि त्यावर चित्रपट बनवून त्यात सावरकरांची भूमिका करणे हे अजिबात सोपे नाहीये. एका मुलाखतीत रणदीप यानी या चित्रपटासाठी त्याना त्यांचे घर गहाण ठेवावे लागल्याचे सांगितले आहे.

  सावरकरांचा जीवनपट केवळ तीन तासात पडद्यावर दाखवणे कठीण आहे. पण रणदीप नी आपले कसब पणाला लावून हे आव्हान स्वीकारले आहे आणि सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक  महत्वाची बाजू दाखवण्याचाप्रयत्न केला आहे. सावरकरानी आयुष्यात सुमारे १४ वर्षांचा प्रत्यक्ष सश्रम कारावास आणि १३ वर्षे नजरकैद भोगली. अंदमानचा सश्रम कारावास काय होता ह्याचे  चित्रण प्रत्येक भारतीयाने बघणे गरजेचे आहे. मी स्वत: अंदमानची सावरकरांची कोठडी आणि तेव्हा देण्यात येणार्या शिक्षांची प्रारूपे प्रत्यक्ष पाहिली आहेत. ती रिकामी कोठडी बघूनच माझा मेंदू तेव्हा जड झाला होता. तिथे सावरकरानी ११ वर्षे छळ सोसला होता , तिथेच त्यानी कोलू ओढला होता , तिथेच त्यानी हाताने नारळ सोलले होते आणि तिथेच त्याना "कमला" काव्यसंग्रह स्फुरला होता. त्यानी देशासाठी हालअपेष्टा भोगल्या म्हणजे नक्की काय काय सहन केले असेल याची जाणीव ह्या चित्रपटातून येते. एका प्रसंगात भूक हरताळावर असलेल्या कैद्याशी बोलताना सावरकर म्हणतात ,  "अरे तुझ्या उपाशी मरण्याने कोणाला कसलाही फरक पडणार नाही ; क्रांतीची ज्वाला पेटती ठेवण्यासाठी साम , दाम , दंड , भेद याचा वापर करून जिवंत रहाणे आणि इथून बाहेर पडणे आणि परत इंग्रजांविरूद्ध जोमाने लढणे हे आपले ध्येय असले पाहिजे." दुसर्या प्रसंगात अंदमानमधील मुसलमान वॉर्डन छळकपटाने आणि धाकटपशाने हिंदू कैद्याना बाटवणे आणि त्यांना धर्मांतरीत करण्याचे प्रकार करी. यामुळे दु:खी झालेल्या हिंदू कैद्याला समजवताना सावरकर म्हणतात ,  "मुसलमान का खाना क्या, पुरा मुसलमान खाओगे फिर भी मुसलमान नहीं बनोगे! "
गांधी हत्येनंतर संपूर्ण देशात जी ब्राम्हण  विरोधी दंगल झाली ज्यात अनेक ब्राम्हणाना मारण्यात आले , त्यांची घरदारं लुटली गेली , त्यातच विनायकरावांचे धाकटे बंधू , नारायणराव यांची सुद्धा हत्या झाली,हेही चित्रपटात दाखवून अहिंसेचे तत्वज्ञान त्या काळात देखील  किती तकलादू होते यावर प्रकाश टाकला आहे. सावरकरांचे ' हिंदुत्व ' हे केवळ हिंदूंसाठी नसून सर्वसमावेशक होते. देशाची फाळणी कुठल्या परिस्थित झाली ? त्यामागे कोणाचे हट्ट होते ? फाळणी नंतर ५५ कोटी भारताने का दिले ? लाहोर ते ढाका अस रस्ता बनवायला कोण उत्सुक होते ? हे आणि असे अनेक प्रसंग आपल्याला आपले स्वातंत्र्य मिळताना किती चुका केल्या गेल्या आणि सावरकरांचे ऐकले असते तर त्या टाळत्या आल्या असत्या याची जाणीव करून देतात.

  जी व्यक्ती देश स्वतंत्र झाल्यावर देशाची पंतप्रधान व्हायला हवी होती त्याना दिल्लीच्या स्वतंत्र भारताच्या  पहिल्या ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळाले नाही. तेव्हापासून आजपर्यंत सावरकराना या देशात सरकारी पातळीवर उपेक्षितच ठेवले गेले. त्यांच्यावर नको नको ते आरोप आजही केले जातात. त्यानी अंगिकारलेल्या विविध नितींवर टीका केली जाते. पण सावरकर किती द्रष्टे होते याची जाणीव ही काळच आपल्याला करून देतो. त्यांची तरूणाना सक्तीचे सैनिकी शिक्षण देण्याची कल्पना किती गरजेची होती हे आपल्याला १९६२ मध्ये चीनकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यावर झाली. "देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात ; चरख्यावरच्या सूताने नाही" हे त्यांचे लिखाण किती महत्वपूर्ण होते आणि आपण किती दुर्लक्षित केले ते आज आपल्या सीमा पाहून लक्षात येते. दुर्दैवाने आज आपली एकही सीमा सुरक्षित नाही. राज्यकर्ते काळाच्या  पुढे विचार करणार्या सावरकरांचे ऐकत नाहीत आणि त्याचे फटके आपल्या देशाला-देशातील सामान्य जनतेला भोगावे लागतात.

   राजकीय दरबारी कायम उपेक्षित राहिलेले हे तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व समाजमनामध्ये मात्र कायम जागृत राहिले पाहिजे. आणि ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. समाजमनाच्या दबावापुढे कुठलीही सत्ता झुकू शकते. आणि समाजमन घडवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. ऱणदीप हूडा यानी यानिनित्ताने जो प्रयत्न केला आहे त्याला आपण सर्वानी साथ दिली पाहिजे. हा चित्रपट घरातील लहानमोठ्या सगळ्या  सदस्याना घेउन बघितला पाहिजे. त्यावर घरी येउन चर्चा केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपल्याला हव्या त्या कृती आज आपण सहजपणे करतो. कारण आज आपण स्वतंत्र आहोत.पण त्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढीने किती भीषण दिवस काढले आहेत, केवढा संघर्ष आणि पराकोटीचा त्याग केला आहे याची जाणीव आणि त्याबद्दल सदैव  कृतज्ञ राहिले पाहिजे. 

  चित्रपटातील  'कधीच कुठल्या कॉंग्रेस सदस्याला काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाही ?' हा सावरकरांचा प्रश्न आणि आयुष्यभर अहिंसेचे तत्वज्ञान सांगणार्या गांधींचा वध गोळी घालून होतो आणि आयुष्यभर सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करणारे सावरकर मात्र प्रायोपवेशन करून देह त्याग करतात या दोन विसंगती आपल्याला  विचार करायला भाग पाडतात. 

- अनिकेत 
पिंपरी चिंचवड 
फाल्गुन शु १३ 
दि: २३-०३-२०२४

Monday 4 March 2024

अयोध्या दर्शन २०२४

नमस्कार !

  आज अयोध्या दर्शन करून पुण्यात परत आलो. गेले पाच दिवस इतके चांगले गेले की ही ट्रिप संपूच नये असे वाटत होते. मी लहानपणी म्हणजे चौथीत असताना अयोध्येला गेलो आहे. तेव्हाची अयोध्या , शरयू नदी आणि एकूण उत्तर प्रदेश ची भयंकर स्थिती अजूनही डोळ्यासमोर आहे. 
  आणि आज अयोध्या आणि उत्तर प्रदेश चे बदललेले रूप बघून योगीजींच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश हा सगळ्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे जाणार आहे हे जाणवतेय. मराठी म्हणून ह्या गोष्टीचे वाईट वाटतेय पण आपल्याच देशातील एक राज्य इतकी सर्वांगीण प्रगती करतेय याचा आनंद पण आहे. आपापसात Healthy competition असणे गरजेचे आहे. आपण मराठी माणसे देखील कशातही कमी नाही ; ठरवले तर आपण काहीही करू शकतो , मिळवू शकतो हा आपला इतिहास आहे. पण नेतृत्व सक्षम , ताकदवान आणि दूरदृष्टी असलेले असेल तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश राज्य आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राला असेच ताकदवान , स्थिर आणि vision oriented सरकार मिळणे गरजेचे आहे. येणार्या राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या निवडणूकान्मध्ये हिंदूनी आग्रहाने मतदान करणे गरजेचे आहे. आपण स्वत: , आपल्या घरातील सदस्य , आणि नातेवाईक , शेजारी- पाजारी याना मतदानच्या दिवशी  मतदान करण्यासाठी आग्रह करणे गरजेचे आहे. 
  तर आता अयोध्या नगरीकडे वळूया. ठरल्याप्रमाणे  सकाळी ९:३० ला आस्था ट्रेन ने आम्ही दर्शन नगर स्टेशन वर पोहोचलो. ( आस्था ट्रेन बद्दल ची माहिती या लेखाखाली स्वतंत्रपणे दिली आहे )  देश भरातून सुमारे १००० आस्था ट्रेंन्स अयोध्येच्या दिशेने धावत आहेत. या सर्व गाड्यांचे नियोजन सोपे व्हावे म्हणून अयोध्या कॅंटोन्मेंट या स्टेशन सोबत सलारपूर आणि दर्शन नगर ही नवीन स्टेशन तयार करण्यात आली. आणि एकाच स्टेशन वर गर्दी टाळण्यासाठी  आस्था ट्रेन या तीन स्टेशन वरून सोडल्या जातात.
  स्टेशन वर पोहोचताच रामनामाच्या जयघोषात यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करून आमचे  स्वागत करण्यात आले. स्टेशन नवीन असले तरी भरपूर जागा ताब्यात घेउन बांधले आहे. स्टेशन च्या बाहेर UP govt च्या electricity वर चालणार्या  बस आम्हाला न्यायला उभ्या होत्या. ही बस सेवा यात्रेकरूंसाठी स्टेशन ते टेंट सिटी , टेंट सिटी ते श्रीराम मंदिर आणि टेंट सिटी ते स्टेशन अशी  UP govt ने पूर्णपणे मोफत दिलेली आहे. 
  टेंट सिटी ही  शहराबाहेरील  एका मोठ्या मैदानात यात्रेकरूना रहाण्यासाठी केलेली सोय आहे. साधारण २५० ते ३०० एकर वर ही सिटी वसवली आहे आणि अशा अजून अनेक टेंट सिटी शहरात वसवण्याचे नियोजन चालू आहे असे समजले.
  इथे जागोजागी पोलिस संपर्क कक्ष , पिण्याचे पाणी, हरवले - सापडले कक्ष, फिरती शौचालये, आहेत. रहाण्यासाठी चित्रकूट , प्रयागराज अशा रामयणासंबंधित नावांचे मोठे विभाग केलेले आहेत. आस्था ट्रेन च्या ओळखपत्राचा जो belt आहे त्याला colour coding केले असून प्रत्येक राज्याला ठराविक रंग देण्यात आला आहे. यानुसारच प्रत्येक राज्यातील यात्रेकरूंची रहाण्याची सोय केली आहे. या coding मुळे विविध राज्यातून आलेले यात्रेकरू समजणे सोपे जाते. कर्नाटक , तनिळनाडू , बंगाल , आसाम , महाराष्ट्र , गुजरात या राज्यातले यात्रेकरू प्रामुख्याने दिसले. वर विभागांचा उल्लेख केला त्या प्रत्येक विभागात  एक , दोन किंवा काही विभागात तीन असे मोठे जेवणासाठी तंबू उभारले आहेत. एका तंबूत सुमारे ६०० ते ७०० यात्रेकरू एकावेळी जेवण करू शकतात. विभागात आत गेल्यावर हे जेवणाचे तंबू मध्यभागी आहेत त्यामुळे रहायच्या तंबू पासून ते सारख्या  अंतरावर आहेत. या तंबूमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चहा आणि सकाळी नऊ वाजल्यापसून रात्री १२ पर्यंत पोट्भर महाप्रसाद चालू असतो.
  या जेवणाच्या तंबूंच्या आजूबाजूला रहायचे मोठे तंबू आहेत. त्यात सुद्धा एकावेळी ४००-५०० माणसे झोपू शकतील अशी सोय आहे. प्रत्येकाला बेड , गादी, बेडशीट , ब्लॅंकेट ची सोय आहे. तंबू मध्ये mobile charging ची सोय आहे. या तंबूंच्या मागे portable toilets आणि baathrooms आहेत. इथे २४ तास पाणी आहे. यांची संख्या पण खूप आहे. याशिवाय दहा जणांसाठी एक अशा छोट्या तंबूंची सोय पण आहे त्याना toilet / bath attached आहेत. 
  या सगळ्या विभागात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सगळे विभाग आणि सगळे तंबू speaker ने जोडले असून महत्वाच्या सूचना नियंत्रण कक्षातून  वेळोवेळी दिल्या  जातात. मैदानात जरी हे तंबू उभारले असले तरी ८०% मैदानावर  ताडपत्री आहे. त्यामुळे चालताना त्रास होत नाही. टेंट सिटी  च्या सुरूवातीला बस पार्किंग चा डेपो आहे. तिथे तीनही स्टेशन वरून येणार्या आणि तिथे जाणार्या बस ची जागा तसेच टेंट सिटी ते श्रीराम मंदिर दर्शनासाठी जाणार्या आणि तिथून येणार्या बस ची जागा नक्की केलेली आहे. तसे बोर्ड तिथे लावलेले आहेत.  त्यामुळे जाउन उभे राहिले की पाच मिनिटात बस मिळते. या बस पार्किंग पासून आपला विभाग आणि तिथून पुढे आपला रहायचा तंबू हे अंतर जरा जास्त आहे त्यामुळे बस पार्किंग पासून विभागाच्या प्रवेशद्वारापर्यंत वृद्ध आणि विकलांग व्यक्तींसाठी बस सेवा पण आहे. त्याना चालत जायची गरज पडत नाही. 
  १०:३० पर्यंत आम्ही आमच्या तंबूत पोहोचलो. १ वाजेपर्यंत आंघोळ आणि जेवण करून तयार व्हायचे असे ठरले होते. जेवण झाल्यावर आम्ही श्रीराम दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो. अयोध्येत स्व.लता मंगेशकर यांच्या नावाने नवा चौक उभारल्याचे आपण सर्वानी टीव्ही वर पाहिले आहे. या चौकापासून राम मंदिर पर्यंतचा रस्ता हा  "रामपथ" या नावाने ओळखला जातो. या चौकाजवळच "राम की पैडी", "काळा राम आणि गोरा राम मंदिर" , "माता शरयू मंदिर" , "नया घाट हा शरयू नदीवरचा घाट ही ठिकाणे  आहेत. आणि या चौकापासून सुरू होणार्या "रामपथा"वर सुमारे 2.5 किमी अंतरावर हनुमान गढी आणि श्रीराम मंदिर आहे. या रामपथावर रिक्षा ना परवानगी नाही. टेंट सिटी वरून येणार्या बस या लता मंगेशकर चौकात येतात तिथे आपल्याला सोडतात आणि तिथूनच आपल्याला घेउन परत टेंट सिटी मध्ये जातात. श्रीराम मंदिराजवळील गर्दीचे नियोजन करण्यासाठी राम पथावर वाहनाची वाहतून मर्यादित केली आहे. यामुळे या चौकात उतरले  की 2.5 किमी चालत जाउन श्रीरामाचे दर्शन घेउन परत 2.5 किमी चालत परत चौकात यावे लागते. हा रस्ता खूप चांगला आहे. विविध प्रकारची दुकाने दोन्ही बाजूला आहेत पण ज्याना एवढे चालणे शक्य नाही ते शेअर रिक्षा चा वापर करून शहराच्या बाहेरून छोट्या मोठ्या  गल्लीतून हनुमान गढीपर्यंत पोहोचू शकतात. 
  प्रथेनूसार हनुमान गढी चे दर्शन झाल्यावर आम्ही  मुख्य मंदिराकडे वळतो. पूर्वी गेलो तेव्हा अरूंद  रस्ते , जागोजागी असणार्या  सुरक्षा चौक्या आणि केवळ पडद्यामध्ये असलेले श्रीराम लला असे तेव्हाचे चित्र आता इतिहास जमा झालेय आणि अयोध्या नगरी नव्या वधू सारखी सजली आहे. सगळीकडे रामभक्तांच्या स्वागताचे बोर्ड , हार , तोरणे , वातावरणात सकारात्मक बदल घडवत होते. पोलिस , सुरक्षा व्यवस्था , सीसी टीव्ही कॅमेरे भरपूर आहेत पण या व्यवस्थेचा पूर्वीसारखा दबाव किंवा ताण जाणवत नव्हता. हिंदूना त्यांच्या आराध्याचे सुखाने दर्शन घेता यावे म्हणून ही यंत्रणा उभी आहे याची जाणीव दिलासा देणारी होती. कोणीही पोलिस उगाचच कोणाला अडवणे , प्रश्न विचारणे , टोकणे असले प्रकार करत नव्हते. 
  आत गेल्यावर जसे airport वर checking terminal असते तसे इथेही एक terminal बांधले आहे. तिथे आपली आणि आपल्याकडील सामानाची metal detector द्वारे तपासणी होते. ती झाली की आत चप्पल ठेवण्यासाठी स्टॅंड आहेत. ते झाले की आपल्याकडील सामान आणि मोबाईल ठेवण्यासाठी locker rooms आहेत. फक्त खिशातील पैसे आणि ओळखपत्रे आत नेण्याची मूभा आहे. या सर्व सेवा मोफत आहेत. हे झाले की आपण मुख्य दर्शनाच्या रांगेत लागतो. इथे परत एकदा cheking होते. इथे कर्मचारी प्रत्यक्ष हाताने आपले खिसे तपासतात आणि त्यात गुटखा, तंबाखू , मावा , चूना , कंगवा असल्या गोष्टी असतील तर तिथेच काढून  फेकतात. कोणी मुद्दाम / चूकून मोबाईल सोबत आणला असेल तर येथून परत मागे जावे लागते. हे बघून खूप आनंद झाला. नांदेड आणि अमृतसर च्या गुरुद्वारा मध्ये असेच checking होते आणि कोणालाही कसलेही नशेचे पदार्थ सोबत घेउन आत जायला परवानगी नाहीये. तेव्हाच अशी पद्धत आपल्या मंदिरात का नाही ?असा विचार मनात आला होता. आता श्रीराम मंदिराचे अनुसरण देशातील सर्व मंदिरानी करावे आणि मंदिरांचे पावित्र्य जपावे. आत जातानाच्या परिसरात विविध मंदिरांचे चालू असलेले काम दिसते आणि हेच मुख्य मंदिर असावे असे वाटते आणि याच रस्त्यावरून मोदी जी २२ जानेवारीला मंदिरात प्रवेशकरते झाले असे वाटते ;पण मुख्य मंदिर जरा आतल्या बाजूला असून लांबून ते एकदा दिसले की मनात आता राम ललाचे  दर्शन होणार म्हणून मन  आनंदाने भरून येते. जसजसे मंदिराजवळ जातो आणि आत जातो तसतसे मनाचे उत्सूकता वाढत जाते आणि मंदिराच्या पहिल्या  दालनातूनच दूरून श्री राम ललाचे दर्शन होते. दुसर्या दालनात गेलो की अजून जवळून दर्शन होते. आणि तिसर्या दालनात एकदम जवळून दर्शन होते. तरी मोदीजीनी जिथे बसून पूजा केली तिथपर्यंत आत जायला मिळत नही. साधारण २० फूटांवरून दर्शन मिळते. २०-२५ सेकंद तिथे थांबता येते. त्यापेक्षा जास्त काळ थांबू देत नाहीत. या वेळात श्रीरामाकडे काय बघू आणि किती बघू असे होते. श्रीरामाची ती प्रसन्न बाल रूपातील मूर्ती मनात साठवून आपण बाहेर पडतो आणि प्रसाद घेउन चप्पल स्टॅंड आणि लॉकर रूम्स च्या मागल्या बाजूला येतो. तिथून या गोष्टी ताब्यात घेता येतात. संपूर्ण मंदिर परिसरात विविध कामे चालू आहेत. पण भाविकाना या कामाचा कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय , toilets ची सोय आहे. इथे गर्दी मुळे लहान मुलांसोबत मोठी माणसे ही हरवण्याचे प्रमाण आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मद्त कक्ष आहेत. स्पीकर वरून हरवलेल्यांच्या नावाचा सतत पुकार होत असतो. आणि त्याना ठराविक ठिकाणी येण्याचे आवाहन केले जाते.  
  मंदिरातून बाहेर आलो की समोरच श्रीराम जानकीचे बिर्ला मंदिर आहे. संगमरवरातील सुंदर मूर्ती इथे आहेत. नंतर राम पथावरून खाली स्व. लता मंगेशकर चौकाकडे चालत निघालो. वाटेत दोन्ही बाजूला खाण्यापिण्याची , मिठाईची , पुस्तकांची , कलाकुसरीच्या वस्तूंची , श्रीरामच्या मूर्तीच्या फोटोंची , प्रसादाची दुकाने आहेत. सगळी दुकाने गर्दीने ओसंडून वहाताना दिसतात. सर्वाना घरी आठवण म्हणून नेण्यासाठी काही ना काही घ्यायचे असते. चौका जवळ पोहोचलो की एका बाजूला "नया घाट" आहे. शरयू नदीच्या काठावर हा घाट बांधला आहे. इथेच संध्याकाळी माता शरयूची आरती होते. इथे नदीत बोटींग ची सुविधा पण आहे. नया घाट वरून परत मागे चौकाजवळ आलो की "राम की पैडी" म्हणून भाग आहे , इथे शरयू नदीचे पाणी कालव्यासारखे फिरवले आहे. याच किनारी शरयू मातेचे मंदिर , नागेश्वर महादेव मंदिर , कालेराम मंदिर ( या श्रीराम पंचायतानच्या मूळ  मूर्ती आक्रमणकर्त्यांपासून वाचाव्या म्हणून नदीत लपवल्या आणि पुढे अनेक वर्षानी त्या सुस्थितीत सापडल्या ), गोरा राम मंदिर ही मंदिरे आहेत. याच किनारी मोठी screen लावली आहेत त्यावर रामायणातील प्रसंग दाखवले जातात. सोबत पाण्यात विविध रंगांची कारंजी पण आहेत. इथेच संध्याकाळी लाईट आणि साउंड शो होतो. 
हे सगळे बघून झाल्यावर परत चौकात येउन आम्ही टेंट सिटी ची गाडी पकडून मुक्कामी गेलो. 
अयोध्या आणि आसपास च्या भागात बघण्यासाठी अजून खूप ठिकाणे आहेत पण वेळेअभावी अत्ता आम्हाला जास्त काही शक्य नव्हते. दुसर्या दिवशी आस्था ट्रेन ने परतीचा प्रवास सुरू होणार होता. दुसर्या दिवशी सकाळी थोडा वेळ होता तेव्हा परत मंदिराजवळ जाउन 'जानकी महाल' चे दर्शन घेतले आणि 'श्रीराम जन्म भूमी निर्माण कार्यशाळा' या ठिकाणी जाउन नेपाळ वरून आलेले शाळिग्राम तसेच राजस्थान आणि कर्नाटक येथून आलेल्या विशिष्ठ शिळांचे सर्शन घेतले आणि परत टेंट सिटी मध्ये आलो. तोपर्यंत स्पीकर वरून महाराष्ट्रातून आलेल्या आणि परतीचा प्रवास सुरू करणार्या माझ्यासारख्या  यात्रेकरूंसाठी स्पीकर वरून उधघोषणा  होत होती. स्टेशन वर जाण्यासाठी बस उभ्या असल्याचे कळवण्यात आले. बस मधून आम्ही स्टेशन वर पोहोचलो. गाडी सुटायला वेळ होता. या दरम्यान च्या काळात प्लॅट्फॉर्म वर गर्दी होवू नये आणि सर्वाना बसता यावे म्हणून सुमारे ५०० लोकं बसतील असा मोठा तंबू स्टेशन जवळ उभारला आहे . पाठीमागे पिण्याच्या पाण्याची आणि toilets ची सोय आहे. या तंबूमध्ये  आम्ही निवांतपणे बसू शकलो. याच वेळी पाऊस आणि वादळ ही झाले. तंबू असल्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. गाडी आल्यावर आम्ही गाडीत बसलो. जागा आणि सीट नंबर आधीच ठरलेले असल्यामुळे कसलीही घाई , आरडाओरड नव्हती. सगळे बसल्यावर ठरल्या वेळी श्रीरामाचा उद्घोष करत गाडी सुटली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. 

- अनिकेत विलास शेटे. चिंचवड
04-03-2024

"आस्था ट्रेन : केंद्र सरकारचे उत्कृष्ट नियोजन"

नुकतेच आस्था ट्रेन ने अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. श्रीराम प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरातून विविध शहरातून अयोध्येसाठी खास 'आस्था ट्रेन' सोडण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या या नियोजनाबाबतचे महत्वाचे मुद्दे :-

१) सध्या पुण्यातून दुसरी डायरेक्ट अयोध्येसाठी ट्रेन नाहीये; आस्था ट्रेन ही डायरेक्ट अयोध्येपर्यंत असल्यामुळे सोयीची आहे.

२) देशाने यापूर्वी रेल्वेतील कारसेवकांवर झालेल्या अमानूष हल्ल्याच्या जखमा सोसल्या आहेत त्यामुळे या गाड्यांबाबत विशेष सुरक्षा बाळगली जाते. यामुळेच आस्था गाडीचे तिकीट बूकिंग रेल्वेच्या ॲप वर किंवा साईट वर उपलब्ध नाहीये.

३) ह्या गाडीचा मार्ग आधी कळत नाही. तसेच ती कुठल्याही ॲप वरून live track होत नाही.

४) प्रत्येक गाडीत बंदूकधारी महिला आणि पुरूष पोलिस अधिकारी सोबत असतात. त्यांचे गाडीत दिवसा आणि रात्री नियमित पेट्रोलिंग चालू असते.

५) ह्या गाडीला pantry car नाहीये. खाणे , चहा- पाणी, ठराविक स्टेशन वरून गाडीत चढवले जाते. हे चढवताना सुद्धा तिथे पोलिस बंदोबस्त असतो. हे खाणे आधी सबंधित अधिकार्यांकडून चेक केले जाते.

६) या गाडीला सगळे डबे हे सेकंड क्लास स्लीपर चे असून प्रत्येक प्रवाश्याला एक ओळखपत्र दिले जाते. त्यावर त्याचे नाव , फोन नंबर आणि प्रवासाची तारीख , वेळ, सीट नंबर आणि बोगी नंबर तसेच परतीच्या प्रवासाची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. सीट आणि बोगी नंबर हे दोन्ही प्रवासाठी एकच असतात. याशिवाय अयोध्येला तीन स्टेशन्स आहेत , त्यापैकी कुठल्या स्टेशन ला गाडी जाणार हे पण लिहिलेले असते.

७) प्रवासात प्रत्येक प्रवाश्याला एक स्वछ बेडशीट , उशी आणि ब्लॅंकेट दिले जाते.

८) प्रवासात दोन वेळा चहा , एक नाष्ता , आणि दोन जेवणे आणि दर वीस तासांसाठी एक पाण्याची बाटली रेल्वेकडून दिली जाते.

९) बाहेरच्या कुठल्याही व्हेंडर ला या गाडीत चढायची आणि विक्री करायची परवानगी नाही.

१०) स्टेशन वर गाडी येताना "ही विशेष आस्था गाडी असून या गाडीत कोणीही चढू नये" अशा सूचना स्पीकर वरून दिल्या जातात.

११) गाडी स्टेशन वर येण्यापूर्वी त्या फलाटावर ठराविक अंतरावर स्टेशन वरचे बंदूकधारी पोलिस उभे असतात. गाडी जाईपर्यंत ते कोणालाही गाडीजवळ फिरकू देत नाहीत.

१२) देशभरातून येणार्या गाड्या एकाच स्टेशन वर येउन गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने अयोध्या कॅंटॉन्मेंट , सलारपूर , आणि दर्शन नगर अशी जवळची तीन स्टेशन्स या आस्था गाडीसाठी नियोजित केली आहेत. प्रत्येक स्टेशन वर रामभक्तांचे फुले उधळून उत्साहात स्वागत होते आणि तिथून पुढे उत्तर प्रदेश च्या बस ने टेंट सिटी मध्ये नेले जाते.

१३) गाडीत प्रत्येक बोगीत ठराविक संख्येने अटेंडंट्स आणि स्वछता कर्मचारी असतात. प्रवाशाना ब्लॅंकेट्स , उशी , बेडशीट देणे , त्याची नोंद ठेवणे , बोगी आणि प्रसाधन गृहे नियमित स्वछ करणे ही कामे त्यांच्याकडून केली जातात.

अत्तापर्यंत या देशात हिंदूंना तीर्थक्षेत्री जाण्यासाठी अशी खास सोय आणि इतके छान नियोजन केलेले माझ्या पहाण्यात नाही. या सर्व सोयींसाठी रेल्वे कर्मचारी , रेल्वे पोलिस , उत्तर प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश पोलिस आणि मोदी सरकार यांचे मनापासून आभार.

- अनिकेत विलास शेटे. चिंचवड 
04-03-2024

Saturday 4 March 2023

ANDAMAN DIARIES / AIRPORT LOUNGE ACCESS 4/4

#Andamantrip2023 4/4
#creditcardtips 
#AirportLoungeAccess 

   मित्रानो , नुकताच अंदमान ट्रिप करून आलो. विमान प्रवासादरम्यान दोनदा  लेओव्हर होते. म्हणजे दोन विमानांच्या मधला काळ. हा काळ असा असतो की ज्यात तुम्ही विमानतळाबाहेर जाऊन फिरून परत येउ शकता. माझा पहिला लेओव्हर कोलकात्याला रात्रीचा होता. आणि दुसरा बेंगरूळू ला दिवसा होता. दोन्ही वेळेस मी विमानतळाच्या बाहेर जाणे टाळले. एक तर सामान लॉकर मध्ये ठेवा आणि परत आल्यावर चेकींग चे सगळे सोपस्कार करा आणि मिळणार्या तीन ते चार तासात फिरण्यापेक्षा परत जायचे आहे याचेच जास्त बंधन मनात रहाते. 

   पण विमानतळावर बसून रहाणे पण कंटाळवाणे असते. काही खायचे प्यायचे म्हटले तरी ते खूप महाग असते. दोन सामोसे आणि कोल्ड्रिंक चा कप ३९९/ + कर  किंवा दोन पऱाठे आणि ताक ४९९/ + कर असे इथे दर असतात. 

   तर या दोन्ही लेओव्हर मध्ये मी विमानतळावरील लॉंज सेवेचा कसा फायदा घेतला ; त्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. ही सुविधा तुमच्याकडे ठराविक ( म्हणजे lounge access देण्याची सुविधा असणारे ) क्रेडिट कार्ड असेल तर वापरू शकता. प्रत्येक विमानतळावर असे lounges आहेत जिथे प्रवासी ज्यांच्या connecting flights आहेत किंवा flights delayed आहेत अशांसाठी मधला वेळ सुसह्य व्हावा म्हणून या सुविधा देण्यात येतात.
   या lounge मध्ये अमर्यादित खाणे , पिणे , बसणे , आराम करणे , wi-fi , washrooms या सेवा असतात. ज्यांच्याकडे वर उल्लेख केलेली कार्ड्स आहेत त्याना प्रतिव्यक्ती केवळ २ रूपये ( हो ! फक्त २ रूपये!! ) मध्ये इथे प्रवेश मिळतो. ज्यांच्याकडे ही कार्डस नसतील त्याना प्रतिव्यक्ती सुमारे १२००/- ते १५००/- ( प्रत्येक lounge वर अवलंबून ) दर आकारण्यात येतो. प्रत्येक eligible कार्ड वर एक व्यक्ती याप्रमाणे आपण आपल्या नातेवाईकांना / मित्राना पण इथे नेउ शकता. माझ्याकडे दोन कार्ड्स असल्याने मी सोबत आईला इथे नेउ शकलो. 

   इथे खाण्याचे असंख्य प्रकार उपलब्ध  असतात. शाकाहारी / मांसाहारी दोन्ही प्रकार असतात. कालच जाऊन आल्यामुळे काल काय होते ते सांगतो. कांदे पोहे, पॅटीस ,  पनीर बटर , दाल मखनी , वेज पनीर , पनीर लबाबदार , रोटी , भात, मसाले भात , चणा मसाला , फिश करी , चिकन च्या डिश असे असंख्य प्रकार बूफे मध्ये होते. आपल्याला हवे ते आणि हवे तितके आपण घेउ शकतो. याशिवाय फळे , सॅलड , ज्यूस , चहा , कॉफी , कोल्ड्रिंक, पेस्ट्रीस , डेझर्ट्स हेही असते. 
   या lounge मध्ये तुमच्या departure timing च्या आधी तीन तासापर्यंत प्रवेश मिळतो. त्याआधी नाही. एकदा प्रवेश मिळाला की इथे खाण्यापिण्यावर , आराम करण्यावर कसलेही बंधन नाही. आहे ना कमाल ?

   ह्या सुविधा काही कार्ड्सवर दर तिमाहीला दोनदा असतात तर काही कार्ड्स वर वर्षाला आठ वेळा ( म्हणजे तिमाही चे बंधन नसते ) असतात. काही कार्डस वर international lounge access सुद्धा असतो. 

   क्रेडिट  कार्ड हे खूप उपयोगी financial instrument आहे; पण त्याला दुधारी धार आहे. ते वापरायचे कसे हे माहित नसेल तर आर्थिक नुकसान होते. पण ज्याना त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसते , त्याचे फायदे माहित नसतात  किंवा चुकीच्या वापरामुळे ज्यांचे नुकसान झालेय , आणि ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणारे हेच लोक क्रेडिट कार्ड ला नावे ठेवत असतात. मी गेले कित्येक वर्षे क्रेडिट कार्डस वापरतोय आणि आजपर्यंत एकही रूपया व्याजच्या स्वरूपात भरला नाहीये.  

   त्यामुळे आपल्या क्रेडिट कार्ड्स वर काय काय सुविधा आहेत याचा परत एकदा मागोवा घ्या. आणि अशा सुविधांचा अवश्य फायदा घ्या. 

   आता जगात काहीच फुकट नसते हे आपल्याला माहित आहे. इथे हे lounge वापरल्याने प्रत्यक्ष आपल्याकडून काही न घेता जरी सेवा पुरवली जाते तरी आपल्याकडून अप्रत्यक्षपणे काय घेतले जाऊ शकते ? त्या traps मधून कसे वाचायचे याबद्दल परत कधीतरी लिहिन. अत्ता इथेच थांबतो. 
सोबत बेंगळूरूच्या lounge चे फोटो जोडतोय.
- अनिकेत शेटे. ©️
आर्थिक सल्लागार
पिंपरी चिंचवड.

ANDAMAN DIARIES / CELLULAR JAIL 1/4

#AndamanTrip2023 1/4
#cellularjail 
#Savarkar 
#portblair 

आज दि. 26.02.2023 , तात्यारावांचा तारखेने  स्मृतीदिन!

   गेले काही महिने ह्या दिवशी अंदमान मध्ये सेल्यूलर जेल ला भेट द्यायचा केलेला मानस आज पूर्ण होतोय. 
   लहानपणापासून म्हणजे रत्नागिरीत पतित पावन मंदिरात जात असल्यापासून , तिथला माघी गणेशोत्सव असो किंवा शिवजयंतीचे कार्यक्रम असोत , सावरकरांविषयी काही कार्यक्रम झाला नाही असे कधी झाले नाही. नाटक असो , व्याख्यान असो , देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम असो सावरकर या धगधगत्या कुंडाची ओळख तेव्हापासून होण्यास सुरूवात झाली. यात  माघी गणेशोत्सवात आणि इतर प्रसंगी झालेली  श्री आफळे बुवांची कीर्तने फार वरच्या क्रमांकावर आहेत. 
    पुढे जरा वय वाढल्यावर " माझी जन्मठेप " हातात आले. आजपर्यंत त्याची अनेक पारायणे झाली. आणि 'अंदमान' हा शब्द्च मनात कायमचे घर करून गेलाय. पुढे आणखी वय वाढल्यावर ह्या द्वीपाबद्दल , याच्या भौगोलिक स्थानाबद्दल , रचनेबद्दल मनात खूप कुतुहल वाढले. आणि तेव्हाच मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली की इथे एकदा तरी भेट द्यायचीच. आज तो योग आलाय.

   सध्याचे सेल्यूलर जेल हे मूळ जेल च्या ३०% ते ३५%  शिल्लक आहे. पण जे शिल्लक आहे ते सुस्थितीत आहे. आत प्रवेश केल्यावर लगेच उजवीकडे आणि डावीकडे दोन मोठी दालने आहेत; एकात अंदमानात शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांची नावे आणि कुठल्या खटल्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. दुसऱ्यात काळे पाणी म्हणजे काय ? कुठल्या कुठल्या शिक्षा केल्या जात ? अंदमानचा थोडक्यात इतिहास , इंग्रजांच्या काळातील अंदमानचे काही दुर्मिळ फोटो अशा गोष्टी आहेत. आणखी एक तिसरे दालन जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदमान भेटीचे फोटो आहेत. हे पाहून आत आल्यावर डावीकडे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील ज्ञान अज्ञात वीरांचे स्मृती स्मारक आहे. सेल्यूलर जेल हा स्टार फिश च्या आकारात म्हणजे केंद्रभागी एक tower आणि त्याला विविध दिशेत सात  ( आपण पाकळ्या म्हणूया ) लांबच्या लांब कोठड्यांच्या इमारती  अशी रचना होती. त्यावेळी इथे सुमारे ७०० कैदी ठेवायची क्षमता होती. 
सध्या या सातपैकी केवळ तीन पाकळ्या शिल्लक आहेत. यांची पण रचना अशी आहे की एका पाकळीतल्या कोठडीतील  कैद्याला समोरच्या पाकळीतील तसेच आपल्या पाकळीतल्या कुठल्याही कोठडीतील  कैदी दिसता कामा नये. तळ मजल्यावरील काही कोठड्या उघड्या आहेत. आपण आतून त्या पाहू शकतो. आम्ही त्या पाहिल्या ;  पण आता आम्हाला तात्यारावांची कोठडी पहायची होती. जेल मध्ये आत गेल्यावर उजवीकडील पाकळीवर दुसर्या मजल्यावरील सर्वात शेवटची कोठडी त्यांची आहे. तिथे जाताना पाय अक्षरश : थरथरत होते. " माझी जन्मठेप " मध्ये लिहिलेले अत्याचार डोळ्यासमोर येत होते. आज स्मृतीदिन असल्यामुळे गर्दी खूप होती. कोठडीत पण गर्दी होती ; जरा गर्दी ओसरल्यावर आम्ही आत गेलो आणि तात्यारावांच्या तसबीरीकडे पाहून थिजून गेलो. त्याच कोठडीत दोन्ही हात वर भिंतीला बांधून तासनतास उभे असलेले तात्याराव डोळ्यासमोर येउ लागले , कैद्यांचे हात - पाय ताठ रहावेत ( bend करता येउ नयेत ) म्हणून बनवलेल्या बेड्यान्मधले तात्याराव दिसायला लागले. त्या बेड्या तशाच हातात घेउन घासत चालणारे तात्याराव, कोळशाने भिंतीवर " कमला " लिहिणारे तात्याराव , कोलू ओढणारे तात्याराव , असोला नारळ हाताने सोलणारे तात्याराव , बारी सारख्या नराधमाकडून अपमान सहन करणारे तात्याराव , " अनादि मी , अनंत मी " हे अजरामर गीत रचण्यापूर्वीचे विमनस्क तात्याराव अशी अनेक रूपे डोळ्यासमोर आली आणि एकाच वेळी आपल्या शरिरात असंख्य सूया कोणीतरी टोचतयं अशा वेदना जाणवल्या. किती वेळ गेला हे कळले नाही. तिथली फुले तात्यारावांच्या तसबीरीवर अर्पण करून बाहेर आलो. 
संध्याकाळी तिथे एक लाईट आणि साउंड शो असतो. बघण्यासारखा आहे. जेलच्या दोन पाकळ्यांच्या भव्य पार्श्वभूमीवर हा शो दाखवला जातो. इंग्रजानी आमच्याच जमिनीवर , आमच्याच माणसांचे कष्ट वापरून , आमच्याच पैशाने , आमच्याच क्रांतीकारकांवर अत्याचार करण्यासाठी हा जेल बांधला. निर्दयीपणाची किती  परिसिमा गाठली गेली याची साक्ष म्हणजे हा तुरूंग आहे. आईपासून तिचे लेकरू क्षणभर दूर झाले तर तिचा जीव वर खाली होतो ; इथे भारत मातेचे किती सुपुत्र किती वर्षे खितपत पडले होते. त्यांच्या बद्दल , त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बातम्या तर सोडा साधी कुजबूज कोठडीबाहेर होत नव्हती. असे काय पाप केले होते त्यानी ? त्याना स्वतःबद्दल , कुटूंबाबद्दल स्वप्ने नसतील ? प्रपंच करावा नेटका असे वाटले नसेल ? देश वाचवायची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी ; मला संसार आहे असे का वाटले नसेल ? या असंख्य वीरांचे  ऋण आपल्यावर  आहेत जे आपण कधीच फेडू शकत नाही. 
    यानंतर कैद्याना फाशी देण्याची जागा , कोलू ओढण्याची जागा  पाहिल्या. जेल च्या बाहेर एका बागेत इथे ज्यांचे प्राण गेले अशा वीरांचे पुतळे आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. 
लाईट आणि साउंड शो पाहिल्यावर मनाला एक खिन्नता येते. आज इतक्या वर्षानीसुद्धा मन त्याच काळात जाते आणि आपला देश दीडशे वर्षांच्या गुलामीत का अडकला ? आपण हे टाळू शकलो नसतो का ? असे विचार मनात यायला लागले. सोबत आजही सावरकरांवर होणारे आरोप ऐकून अजून चिडायला होते. हे सर्व आरोप करणार्यानी , शंका घेणार्यानी आपल्या घरात डोक्यावर छप्पर असताना , फॅन / एसी  वगैरे सोयी असताना एका जागेवर फक्त  एक तास न हलता उभे राहून कसे वाटते ते बघावे. सावरकरानी दहा वर्षे परकियांचा छळ इथे सोसलाय ; त्यांच्यावर शंका घेताना आपली जीभ झडत कशी नाही ? भरल्या पोटी आपली नसलेली बुद्धी दाखवणे हे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या व्यक्तीची देशाचा पहिला पंतप्रधान होण्याची योग्यता होती त्याना साधे सरकारी ध्वजारोहणाचे आमंत्रण मिळाले नाही ; त्यानी अत्यंत साधेपणाने आपल्या घरात ध्वजारोहण केले. आणि अशाच कृतघ्न लोकांच्या अवलादी आजही तात्यारावांच्या त्यागावर शंका घेतात ? अजून किती अपमान करणार आहोत आपण सावरकरांचा ? डोके सुन्न होते हे सगळे आठवून ..
शेवडे गुरूजीनी उल्लेख केल्याप्रमाणे अंदमान हे "राष्ट्रतीर्थ" आहे ; प्रत्येक भारतीयाने इथे भेट दिलीच पाहिजे. 
आज आता अजून दुसरे काही पहाण्याची इच्छा नाहीये. बाकी अंदमान बाबत नंतर लिहेन ...

(सोबत काही फोटो / विडिओ जोडतोय. खरं तर ही जागा आनंदाने फोटो काढण्याची नाहीये ; पण काही वेळा स्थळ , काळ , वेळ आणि मनस्थिती अनुकूल नसली तरीही फोटो काढावे लागतात आणि त्या प्रतिकूलतेचेही साक्षीदार आपल्याजवळ कायम असावेत असे प्रकाशचित्रकार म्हणून माझे मत आहे.)

- अनिकेत शेटे. २६-०२-२०२३ 
पोर्ट ब्लेअर , अंदमान

ANDMAN DIARIES / SCUBA DIVING 2/4

#AndamanTrip2023 2/4
#scubadiving 
#underwaterworld 
#swarajdveep 
#govindnagarbeach 
#watersportsactivities 

Scuba Diving

स्वराज ( पूर्वीचे Havlok island) द्वीपवरील किनारा हा scuba diving साठी देशात फार वरच्या क्रमांकावर आहे. इथे scuba diving करायला मिळणे म्हणजे एक पर्वणी असते. अतिशय सुरक्षित आणि coral reef ने समृद्ध असा किनारा भारत सरकारनेच Scuba Diving साठी योग्य असा घोषित केलेला आहे. 

जेव्हा अंदमान ट्रिप ची तयारी चालू होती तेव्हा Scuba Diving करायचे आणि ते स्वराज द्वीप वरच करायचे असे ठरवले होते. अंदमान ला जवळपास ५-६ वेगवेगळे किनारे आहेत जिथे Scuba Diving करता येते ; पण सगळ्यात उत्तम स्वराज द्वीप आहे.

Diving साठी गर्दी टाळावी आणि गर्दी झाली की पाणी गढूळ होते हे टाळण्यासाठी पहाटे ५ ला Scuba Diving करायचे नियोजन केले. याआधी कधीही हा आनंद घेतला नव्हता ; त्यामुळे खूप उत्सूकता होती. Diving साठी इथले नियम कडक आहेत.  वय ५० च्या पुढल्या व्यक्ती , हार्ट , बीपी चे आजार असलेल्या व्यक्ती , नुकताच को#ड होवून गेलेल्या व्यक्ती छातीचे , श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्ती याना हा खेळ खेळण्यास मनाई आहे. 

'विविध प्रकारचे आजार मला नाहीत आणि हा साहसी खेळ खेळताना मला काही झाले तर माझा मीच जबाबदार असेन' हे declaration लिहून दिल्यावर मी पाण्यात उतरायला तयार झालो. Diving साठी खास रबऱी पोशाख आणि शरीर पाण्यात बूडावे म्हणून पोटावर लोखंडी वजन असलेला belt चढवला. डोळे आणि नाक झाकले जाईल असा mask घातला आणि कंबरे एवढ्या पाण्यात उतरलो. इथे माझे training होणार होते. Training देणारा मुलगा चांगली माहिती देत होता. पाण्यात श्वास कसा घ्यायचा ? मास्क मध्ये किंवा तोंडात पाणी गेले तर काय करायचे ? खाली गेल्यावर बोलता येणे शक्य नाही म्हणून कुठल्या खूणा हाताने कधी करायच्या ? हे सगळे त्याने समजावले. माझ्याकडून तिथे २-३ वेळा हे सगळे करून घेतले. आणि मग माझ्या पाठीवर nitrogen चा मोठा Cylinder चढवला आणि आम्ही दोघे खोल पाण्यात जायला तयार झालो.

अंदमान चे किनारे हे इथल्या स्वच्छ पाण्यासाठी आणि coral reef साठी प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारचे , विविध रंगांचे , आकाराचे reef इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यासोबत रंगीबेरंगी मासे , आणि इतर समुद्री जीवन पाण्यात खोल जाऊन प्रत्यक्ष बघायला खूप मजा येते. 
आपण सर्वानी हा एक मस्त अनुभव एकदातरी नक्की घ्या आणि हे पाण्याखालचे जीवन जवळून पहा. सोबत काही फोटो आणि विडिओ जोडत आहे. 
- अनिकेत शेटे 
पिंपरी चिंचवड

ANDAMAN DIARIES / BARATANG LIMESTONE CAVES

#AndamanTrip2023 3/4
#Baratang
#Baratang_limestone_caves
#Limestonecaves

   अंदमान ला येण्यासाठी आकृष्ट करणारे अजून एक  ठिकाण म्हणजे बाराटांग बेटावरील लाखो वर्षापूर्वीच्या नैसर्गिक चूनखडीच्या ( Limestones) गुहा.
बाराटांग हे बेट मध्य अंदमानात पोर्ट ब्लेअर पासून १०० किमी अंतरावर , पोर्ट ब्लेअर - दिग्लीपूर या NH-4 वर आहे. पण इथे मनात आले आणि जाऊन आलो असा विषय नाहीये. इथे जाण्यासाठी खास तयारी करावी लागते. ह्या भागात पोर्ट ब्लेअर पासून ४८ किमी वर " जरावा " आदिवासींची वस्ती आहे.  'जरावा' हे इथल्या मूळ रहिवाश्यांपैकी एक आहेत. पण आता त्यांची संख्या खूप कमी आहे ; म्हणून भारत सरकार ने त्यांच्या वस्तीला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. कोणीही भारतीय तिथे पूर्वपरवानगी शिवाय जाऊ शकत नाही. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन हे भारत सरकारचे उद्दीष्ट आहे. पूर्वी हे लोक हिंस्र होते आता तसे नाहीत , आता कपडे घालतात , हिंदी बोलतात , को#ड काळात टोचून पण घेतले. पण आपल्यात मिक्स होत नाहीत, ते त्यांच्याच वस्तीत खूष असतात. त्यांची शरीराची ठेवण आफ्रिकेतील निग्रोंसारखी आहे.
    तर बाराटांग ला जाताना या ' जरावा' वस्तीवरून जावे लागते. आणि तिथले नियम फार कडक आहेत. त्यांच्या वस्तीच्या आधी २० किमी वर एक गेट आहे ते सकाळी ६ ला उघडते. त्यावेळी तिथे ज्या गाड्या पुढे म्हणजे बाराटांग , दिग्लीपूर , मायाबाजार या ठिकाणी जाण्यासाठी रांगेत असतील त्यानाच तिथून प्रवेश दिला जातो. पण प्रवेश देण्यापूर्वी गाडी नम्बर , प्रवासी संख्या , त्यांची kyc हे सगळे करावे लागते. त्या गेट वर ६ च्या आधी पोहोचण्यासाठी आम्हाला पोर्ट ब्लेअर सकाळी ३ ला सोडावे लागले , त्याआधी रात्री २ ला उठावे लागले!
    ४:१५ ला आम्ही त्या गेट जवळ पोहोचलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत गाडी लावावी लागते. आणि कागतपत्रांची पूर्तता करावी लागते. तिथेच चहा - नाश्त्याची छोट्या टपर्या आहेत. बरोबर ५:४५ ला स्पीकर वरून तिथले नियम सांगायला सुरूवात झाली . 'जरावा' वस्तीतून जाताना सगळ्या गाड्या एका मागोमागच जातील. कोणीही overtake करायचा नाही . गाडीचा वेग ४० प्रति तास पेक्षा जास्त नसेल. दोन गाड्यान्मध्ये २५-३० मीटर अंतर असेल. वाटेत कोणीही थांबायचे नाही. ' जरावा ' दिसले तर कोणीतरी वेगळा प्राणी दिसला असे समजून आरडाओरड अजिबात करायचा नाही , त्यांच्याकडे बोटं दाखवायची नाहीत , त्यांचे फोटो काढायचे नाहीत , त्याना खायला काही द्यायचे नाहीत , विचारपूस करायची नाही , त्याना कपडे किंवा इतर वस्तू द्यायची नाही. वाटेत plastic फेकायचे नाही , सुट्टा ब्रेक , selfie point, आडोश्याला जाणे  वगैरे काहीही करायचे नाही.
   आणि यातले काही केले तर सरळ ॲट्रोसिटी कायद्याखाली कारवाई होते. म्हणजे सरकार या बाबतीत किती गंभीर आहे हे लक्षात येते.

    बरोबर ६ वाजता आमचा त्या गेट मधून प्रवास सुरू झाला. लोकल driver सगळे नियम पाळत होते. कोणीही आगाऊपणे overtake करणे , हॉर्न वाजवणे असले प्रकार करत नव्हता. सुमारे २०० वाहने याच शिस्तीत जात होती. वाटेत २-३ वेळा  'जरावा' दिसले. आपल्याप्रमाणेच माणसे आहेत ती. शांतपणे आमच्या जाणाऱ्या गाड्या बघत होते. मनूष्याला आपल्या कातडीच्या रंगाचा उगाचच अहंकार असतो. आपल्या कातडीचा जो काही रंग आहे त्यात आपले काय कर्तुत्व असते ? आणि दुसऱ्याकडे तो रंग नसेल तर त्यात त्याचा काय दोष किंवा कमीपणा  असतो ? असो.


    हा सगळा प्रवास घनदाट जंगलातून आहे. विविध पक्ष्यांचे मंजूळ आवाज , झाडांची सळसळ , नुकत्याच झालेल्या सुर्योदयाने पसरलेला प्रकाश असं मस्त वातावरण होते. अंदमानात हिंस्र श्वापदे म्हणजे वाघ, सिंह वगैरे नाहीयेत ; त्यामुळे इथे भिती वाटत नाही. बेट असल्यामुळे ही इथली सुरक्षितता आहे. दूरून कुठून कोणी प्राणी स्थलांतर करून येण्याची पण शक्यता नाही. जोपर्यंत इथे बाहेरून आणून कोणी प्राणी सोडत नाही तोपर्यंत भिती नाही.

 
    ७:३० ला आम्ही ' जरावा ' वस्तीच्या दुसऱ्या बाजूच्या गेट ला पोहोचलो. इथे नदी आहे. ज्या गाड्या पुढे दिगलीपूर किंवा मायाबाजार ला जाणार आहेत त्या गाड्या मोठ्या बोटीत चढवल्या जातात. मला कोकणातील  धोपावे - दाभोळ फेरी बोट ची आठवण झाली. ज्याना फक्त बाऱाटांग इथे जायचे आहे त्यानी आपल्या गाड्या इथेच ठेवून फक्त बोटीवर चढायचे आणि पलीकडे जायचे. त्याप्रमाणे दहा मिनिटात आम्ही पलीकड्च्या किनार्यावर पोहोचलो. तिथे बाराटांग ला जाण्यासाठी speed boat सुटतात. त्यांचे पण आधीच booking करावे लागते. दहा जणांच्या गृप ला एक याप्रमाणे त्या बोटी सुटतात. मी गेलो तेव्हा महाराष्ट्रातील बरेच गृप आले होते त्यामुळे बोट मिळणे जरा अवघड होते. पण माझ्या driver ने सगळे सोपस्कार आधीच पुरे केले असल्याने आम्हाला बोट मिळाली. या बोटीसोबत जो captain असतो तोच पुढे गुहेपर्यंत सोबतीला येणारा गाईड असतो. हा अर्धा तासाचा प्रवास आहे. एका बाजूला प्रसिध्द अशी mangroove forest मऱाठीत ज्याला आपण खारफुटी म्हणतो ती जंगले आहेत. अर्ध्या तासाने दाट अशा खारफुटीच्या जंगलात बोट थांबते आणि आपण बारटांग बेटावर पोहोचलेलो असतो. तिथून पायी प्रवास सुरू होतो. सुमारे दीड किलोमीटर चालायचे आहे. थोडे चढणे - उतरणे आहे. वयस्कर लोकाना त्रास होवू शकतो. आणि शेवटी आपण जगप्रसिद्ध अशा limestone खाणी जवळ पोचतो. दोन्ही बाजूला उंच पण अरूंद अशा limestones च्या  खिंडीसारख्या रचनेच्या मार्गातून चालावे लागते. सुमारे १२० चौ मी मध्ये या गुहा आहेत. यातील ४० चौ मी सजीव म्हणजे त्यावर चून्याचे formation चालू आहे. बाकीच्या dead आहेत. या कशा बनतात ? किती वर्षे लागतात ? याबद्दल लेखन सीमेमुळे मी इथे लिहित नाही; google वर ही माहिती आहे.
पण या गुहेत गेल्यावर लाखो वर्ष जूने असे limestone चे formations बघायला मिळतात. त्यांचे हत्ती , मगर , श्री गणेश असे विविध आकार बघायला मिळतात. सरकारने या गुहा हल्लीच काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी मोकळ्या केल्या आहेत. तूलनेने त्या आपल्यासाठी नव्याच आहेत. गाईडच्या माहितीनुसार जिथे वरून सूर्यप्रकाश आणि पावसाचे पाणी पडते तिथले खडक वाढायचे थांबतात ; त्यालाच ते dead म्हणतात. असे dead खडक बाहेरून गुहेत आत येताना बरेच बघायला मिळतात. त्यांचे रंग राखाडी पिवळसर झालेला आहे. जे खडक अजून जिवंत आहेत ते पांढरे शुभ्र दिसतात. त्यानासुद्धा मनुष्याच्या स्पर्ष नाही झाला तर येणार्या काही हजार वर्षात त्यांचे सुद्धा मोठमोठाले formations बनतील. आपण आजपर्यंत कधीही न पाहिलेला निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहातोय याची जाणीव होते.
    पाहून झाल्यावर परत परतीचा प्रवास चालू कारण वेळ काढून चालणार नसते ; जिथे गाडी ठेवली आहे तेथील ' जरावांचे' गेट परत दुपारी १२:३० ला उघडणार असते. त्याआधी दोन जलप्रवास करून तिथे पोचणे आवश्यक असते. ते झाले की परत सगळ्या गाड्यांचा एका रांगेत परतीचा प्रवास आणि पोर्ट ब्लेअर ला पोचायला दुपारचे ३:१५ वाजतात.
बारा तासांचा प्रवास आहे पण ज्याना निसर्गाच्या आविष्कारान्ममध्ये रस आहे त्यांच्यासाठी बाराटांग च्या गुहा या not to miss catagory मध्ये येतात.
- अनिकेत शेटे
पिंपरी चिंचवड.


Thursday 14 April 2022

दैनंदिन जीवनातील व्यावसायिकतेचे धडे - १

दिवस : कालचा 
स्थळ: पिंपरी- चिंचवड
वेळ : रात्री १०:४५ 

     घरातील एक कडधान्य संपले असल्याने आणि तेच रात्री भिजत घालायचे असल्याने ते विकत घ्यायला मी घराखाली उतरलो. घराजवळ दोन राजस्थानी लोकांची दुकाने आहेत. याना इथे छोटी सुपर मार्केट म्हणतात. जवळ गेलो तर दोन्ही दुकाने उघडी होती. त्यातील नेहमीच्या दुकानात गेलो तर त्या घरातील २५-२७ वयाची सून जी सकाळपासून दुकानात असते ती आनंदी चेहर्याने काऊंटर मागे उभी होती. मी मला हवे असलेले कडधान्य आहे का विचारले. तिने आहे म्हटले आणि मला आणून दिले. ( आजपर्यंत इथे  मला " नाही " हा शब्द ऐकायला मिळाला नाही ; नाही म्हणायची वेळ आली तर तो त्याना अपमान वाटतो ; लगेच आपल्या डायरीत नोंद करून ती गोष्ट मागवून घेतात )
     त्या सूनेला मी विचारले की मी खाली येताना जरा साशंक होतो की दुकान चालू असेल की नाही, त्यावर ती म्हणाली , अजून थोडा वेळ आहे बंद करायला. शेजार्याने अजून बंद केले नाही. मला काही समजले नाही. त्यावर ती म्हणाली की शेजारचे दुकान बंद होण्याआधी आम्ही आमचे दुकान बंद केले तर आमची गिर्हाइके त्यांच्याकडे जातात ; दोघानी एका वेळी बंद करूया असे आम्ही सांगितलें तर तो शेजारी ऐकत नाही म्हणून मग आम्ही त्याचे दुकान बंद झाल्याशिवाय आमचे दुकान बंद करत नाही.
      सकाळी ५:३० ला चालू झालेले दुकान रात्री १०:४५ ला  का बंद केले नाही यामागचे तिचे कारण मी थक्क होवून ऐकत होतो. व्यवसाय किती आत मुरला आहे या लोकांच्या  हे परत एकदा जाणवले. तिच्या वयाच्या आमच्या मुलीबाळी काय विचार करतात ? तिच्या वयाचा मी असताना काय विचार करायचो? आणि आमच्या मूळगावी आमचा मराठी दुकानदार एव्हाना दुकान बंद करून अडीच तास होवून गेले असतील या गोष्टींचा  विचार करत मी घरी आलो. 
     दुकानामागे दुकानापेक्षा निम्म्या जागेत यांचा संसार असतो. याच जागेत त्यांची लग्ने होतात. दीर असतो , आई - वडील येउन जाऊन असतात. गावावरून आलेला आपल्याच बिरादारीचा एक  मुलगा असतो जो पुढे जाऊन २-३ वर्षानी आपले स्वतःचे दुकान काढायचे म्हणून उमेदवारी करायची म्हणून इथे आलेला असतो. इथेच याना मुले होतात , इथेच ती लहानाची मोठी होतात , व्यवहारापुरते शालेय शिक्षण घेतात. पण सर्वात महत्वाचे शिक्षण , व्यावसाईक शिक्षण आईच्या पोटात असल्यापासूनच चालू झालेले असते. त्यांचा १२-१४ वर्षांचा मुलगा आपल्या पदवी घेतलेल्या मूलाला व्यवसाय समजावू शकतो. पैशाने पैसा कसा वाढवायचा हे त्याना बरोबर समजते. 
     वर्षातून एकदा १५-२० दिवसांसाठी गावी जातात. ते सुद्धा नाईलाज म्हणून जात असावेत. एवढ्या दिवसांचा व्यवसाय जाणार याचे दु:ख त्याना असते. 
     वर उल्लेख केलेली सून नावापुरते शिकलेली आहे. पण पहाटेपासून रात्रीपर्यंत ती दुकान आणि घर व्यवस्थित सांभाळते. सगळ्यांची जेवणे , मूलांचे डबे , त्यांच्या आंघोळी , त्यांचा अभ्यास , घरातले कपडे भांडी हे सगळे तीच करते. आणि दुकान पण सांभाळते. सांभाळते म्हणजे नुसते कॉउंटर ला उभी रहात नाही तर संपलेला माल मागवणे , तो मोजून घेणे , तो नीट लावणे , त्याची payments करणे , लोकांच्या उधार्या लिहून ठेवणे , त्या वेळेवर वसूल करणे , बॅंक व्यवहार बघणे हे सगळे ती करते. सगळे कुटूंब प्रचंड कष्ट करते. गिर्हाईके जोडून ठेवण्यासाठी उधारी देणे , थोडा discount देणे , मालाची home delivery देणे ह्या गोष्टी पण करतात.  मॉल संस्कृती आणि घरपोच माल मिळण्याच्या जमान्यात यांच्या व्यवसायावर पण परिणाम होतोय पण त्यांची जिद्द , चिकाटी आणि कष्ट कमालीचे आहेत. एवढे करून स्वतः मात्र आपल्याला हव्या असलेल्या वस्तू / सेवा स्वतःच्या जातभाईकडूनच घेणार. मिठाई , कपडे , फर्निचर, हार्डवेअर, डेअरी , फळे , टायर , रीयल इस्टेट ई सगळ्या व्यवसायात हे लोक आहेत. आणि एकमेकांशी चांगले संबंध ठेवून आहेत . वेळी अवेळी आपल्या माणसाच्या मदतीला पुढे असतात. आपला पैसा आपल्या समाजातच राहिला पाहिजे हा अलिखित नियम आवर्जून पाळतात. 
     स्वतःचे पूर्ण आयुष्य त्यानी व्यवसायाला वाहून घेतलेले असते. आयुष्य आणि व्यवसाय वेगळे काढणे कठीण जाते. मराठी लोकानी यांचे खूप गुण घेण्यासारखेच आहेत . सुरूवातीला भाड्याच्या जागेत सुरू झालेला त्यांचा व्यवसाय अल्पावधीत स्वतःच्या जागेत जाऊन संपत्तीचे साम्राज्य कसे निर्माण करतो याचे गुपित त्यांच्या व्यवसायाप्रती असलेल्या commitment मध्ये आणि लहानपणापासूनच घरात मिळणाऱ्या व्यावसाईक बाळकडू मध्ये आहे.

© अनिकेत शेटे.
पिंपरी- चिंचवड
चैत्र. शु. १३, शके १९४३ 
दि: १४ एप्रिल २०२२ 

Thursday 15 July 2021

अमृतसर भाग १

अमृतसर डायरी # भाग १

जानेवारी २०२०

माझ्याबद्दल थोडेसे :
मला कधीच टूर ऑपरेटर्स बरोबर फिरायला जायला आवड्त नाही. त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे फिरायचे , ते देतील ते खायचे , त्यांच्या वेळा पाळायच्या , ते देतील त्या हॉटेल मध्ये रहायचे , लौकिक अर्थाने जे प्रसिद्ध आहे ते घाई घाईमध्ये पहायचे आणि घरी यायचे. आणि यासाठी भरपूर पैसे मोजायचे हे मनाला पटत नाही. त्यामुळे माझ्या ट्रिपस मलाच arrange करायला आवड्तात. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे वेळेचे नियोजन करता येते. एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबावेसे वाटले तर थांबू शकतो. जिथे हवे तिथे राहू - खाऊ शकतो. हव्या त्या पर्यायाने प्रवास करू शकतो आणि यात मला भरपूर मजा येते . यात पैशांची सुद्धा बचत होते. फिरायला गेल्यावर प्रत्यक्ष फिरण्यात म्हणजे प्रवासखर्च , entry tickets, तिथले लोकल खाणे पिणे यावर खर्च करायला मी अजिबात मागेपुढे पहात नाही पण फिरायला गेल्यावर मला महागड्या हॉटेल वर खर्च करणे पटत नाही. 2star , 3star हॉटेल्स मध्ये जाऊन रहाणे म्हणजे निव्वळ पैसा फुकट घालवणे आहे . रात्रीची शांत झोप आणि सकाळचे प्रातर्विधी हे सोडून आपण त्या खोलीचा काहीही वापर करत नाही मग भरमसाठ भाड्याच्या खोल्या कशाला हव्यात ? टूऱ ऑपरेटर बरोबर जायचे म्हणजे या रहाण्यावर खूप खर्च केलेला असतो .त्यामुळे साधा homestay, किंवा धर्मशाळा असली तरी मला चालते फक्त रहाण्याचे ठिकाण सुरक्षित पाहिजे . पैसे वाचवायचे म्हणून कुठेही राहून चालत नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात कुठेही 2star, 3star हॉटेल बूक केले तर तिथले वातावरण हे सारखेच असते. पण आपण धर्मशाळा , homestay, किंवा छोटी हॉटेल्स try केली तर तिथले वातावरण वेगवेगळे असते. त्या त्या राज्यातील संस्कृतीचा फील असतो.

पंजाब प्रवासाची तयारी :

माझी देशातील बर्यापैकी राज्ये फिरून झाली आहेत . पण पंजाब चा योग अजून आला नव्हता. लहानपणी हरितक्रांती मुळे भूगोलातून या राज्याची ओळख झाली. नंतर चित्रपट , शीख समुदाय बहुसंख्य असलेले राज्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत पाक सीमेवरचे राज्य म्हणून पंजाब बद्दल उत्सुकता होती. आणि बरेच दिवसात लांब कुठे गेलो नव्हतो म्हणून पंजाब ला जायचे नक्की केले. पंजाब राज्य मोठे आहे आणि बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत ; पण माझ्याकडे जास्ती दिवस नसल्यामुळे यावेळी मी फक्त अमृतसर लाच जायचे ठरवले . अटारी बॉर्डर चा बीटिंग रीट्रीट चा कार्यक्रम आणि सुवर्णमंदिर हे खास आकर्षण होते माझ्यासाठी. आई आणि मी असे दोघेच जाणार होतो .

#पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे तिकीट बुकिंग:

फक्त अमृतसर ला जायचे असल्यामुळे पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे अश्या प्रवासाचे नियोजन करायचे होते. वेगवेगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स , ट्रिप ॲडवासर यावर माहिती घेउन मी अमृतसर मधील प्रेक्षणीय स्थळांची यादी काढली. बऱ्याच जणानी अमृतसर ला फिरायला दोन दिवस पुष्कळ झाले असे लिहिले होते. मी काढलेली प्रेक्षणीय स्थळांची यादी आणि त्या ठिकाणांचे सुवर्णमंदिर पासूनचे अंतर मी गूगल मॅप वर पाहून लिहून काढले आणि प्रत्येक दिवशी आपण साधारण किती ठिकाणे करू शकतो याचा अंदाज बांधला आणि तीन दिवसांचा प्लॅन ( itinary) तयार केला यात आणखी एक दिवस जास्तीचा ठेवला कारण माझ्या सोबत आई असणार होती. अमृतसरच्या थंडीत तिला adjust व्हायला एक दिवस लागू शकतो किंवा अटारी बॉर्डर च्या कार्यक्रमात जर सरकार कडून / सैन्याकडून ऐनवेळी काही बदल झाला ( अभिनंदन वर्थमान ला परत आणायच्या दिवशी बिटिंग रीट्रीट चा कार्यक्रम रद्द केला होता ; सामान्य नागरीकाना त्यादिवशी तिथे प्रवेश नव्हता )तर एक दिवस राखीव ठेवला होता. असे प्रवास सोडून 3+1=4 दिवसांचे नियोजन मी केले . जर या जास्तीच्या दिवसाची गरज लागली नाही तर त्यादिवशी कुठे फिरायचे ह्याचे पण नियोजन केले .

पुणे ते अमृतसर अशी डायरेक्ट ट्रेन नाहीये . पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमृतसर असा ब्रेक जर्नी केला तर साधारण ३६ ते ३८ तासांचा प्रवास आहे .
आई सोबत असल्यामुळे मला ट्रेन चा प्रवास टाळायचा होता . एवढा ट्रेनचा प्रवास केल्यावर परत तिथे कमी तापमानात फिरायचे होते. म्हणून मी विमान प्रवास करायचे ठरवले. पण पुणे ते अमृतसर डायरेक्ट फ्लाईट पण नाहीये. मुबंईहून डायरेक्ट फ्लाईट आहे. पण ती सकाळी १०:३० ची आहे म्हणजे त्यासाठी पहाटे लवकर पुण्यातून निघावे लागणार होते. म्हणून मी पुणे ते दिल्ली असा विमानप्रवास करायचा ठरवले. पुण्याहून दुपारी १:३० चे डायरेक्ट विमान आहे ते ०३:४५ ला दिल्लील पोहोचते आणि दिल्लीतून संध्याकाळी ७ ला अमृतसरसाठी ट्रेन आहे . मुम्बई सेंट्रल ते अमृतसर अशी ट्रेन आहे( Train no : 02903) ती संध्याकाळी ७ ला दिल्लीत पोहोचते . तिची तिकीटे मी काढली. येताना पण अमृतसर ते दिल्ली ट्रेन आणि दिली ते पुणे असा विमानप्रवासाची तिकिटे काढली.
हे बूकिंग मी Oct 2019 मध्ये केले आणि प्रवासासाठी Jan 2020 चा पहिला आठवडा निवडला. कारण नोव्हेंबर- डिसेंबर हे थंडीचे महिने टाळायचे होते . तसेच या महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे बरेच पर्यटक बाहेर पडतात. त्यामुळे सगळीकडे गर्दी असते. सगळीकडे दर जास्त असतात पण जानेवारी मध्ये नाताळ ची सुट्टी संपून शाळा सुरू झालेल्या असतात , थंडी थोडी अवाक्यात असते आणि सीझन संपल्यामुळे रिक्षावाले , लॉजवाले बार्गेनिंग च्या मूड मध्ये असतात . आणि आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात छान होते.

# प्रवासाची तयारी :
प्रवासाच्या तयारीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तिथल्या थंडीचा अन्दाज बांधणे. नेट वरून गेल्या २-३ वर्षांचा हवामानाचा trend बघितला आणि प्रत्येकी हातमोजे , पायमोजे, शाली २ जोड , आणि प्रत्येकी एक स्वेटर घेतला. जानेवारी मध्ये हवामान ३° ते ६ ° च्या आसपास असते .
थोड्र सुके खाणे बरोबर घेतले. एक मोठी बॅग check in luggage मध्ये आणि एक सॅक cabin baggage मध्ये घेतली. क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , ट्रेन ची तिकिटे सर्व सोबत घेतले.
अमृतसर ला उतरायचे कुठे हा प्रश्न होता. नेट वरून एवढे समजले होते की शहर फार मोठे नाहीये. आणि सुवर्ण मंदिरापासून बाकीचे spot जवळ आहेत . मग सुवर्ण मंदिराजवळ च रहायचे मी ठरवले. नेट वर सुवर्ण मंदिराच्या भक्त निवासाबद्दल समजले. तिथले बूकिंग online करता येते . ( www.sgpcsarai.com
) भक्त निवास ला तेथे सराई म्हणतात. पण हे online booking फक्त दोन दिवसांसाठीच मिळते. परत वाढवून मिळते का ते माहित नव्हते. आणि त्यावेळी पाच जणांच्या rooms उपलब्ध होत्या. ज्याची मला गरज नव्हती. त्यामुळे मी काही online booking केले नाही. इथले check in time 1300 hrs & check out time 1200 hrs(noon) आहे . त्याबाबतीत इथे शिस्त आहे. वेळ मागेपुढे झाली तर पूर्ण दिवसाचा charge द्यावा लागतो . आणि इथे फक्त कुटुंब आणि विवाहित जोडप्यानाच जागा देतात .
याशिवाय private rooms देणारे सुद्धा बरेच आहेत. नेट वर सगळी माहिती आहे. room मिळायला अडचण येणार नाही हे कळल्यावर मी तिथे जाऊनच room घ्यायचा विचार केला. क्रमश:

Monday 21 June 2021

नवीन सुरूवात

    कोर्टरूम मध्ये त्याने दिलेला DD हातात घेउन आपल्या लालची डोळ्यानी ती त्याकडे बघत होती. तो तिच्या मागेच उभा होता. DD वरचा आकडा एकदा बघून रक्कम किती आहे हे समजायची बौद्धिक कुवत नसल्याने ती  लहान मुलासारखे एक एक शून्य मोजत खात्री करत होती. त्याला मात्र  गेल्या साडे चार वर्षांच्या घडामोडीमुळे आलेला मानसिक ताण असह्य होत होता. तसेच ही रक्कम गोळा करताना त्याची  आणि त्याच्या आईची झालेली परवड , लोकांकडे पसरावे लागलेले हात , मध्ये आलेल्या सुट्ट्यान्मुळे झालेली घाई , दरम्यान lockdown लागायची भिती या सगळ्या पळापळीमुळे ते दोघेही खूप थकले  होते ; पण ह्या एका दुष्ट चक्रातून सुटका होणार ही  एकमेव दिलासा देणारी गोष्ट होती.
    हे लग्न करताना मुलीच्या घरच्यांची परिस्थिती नाही आणि आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न म्हणून सारा खर्च त्याच्या आईने एकटीने केला होता.आता  आज यातून बाहेर पडण्यासाठी पण त्यालाच  आणि आईलाच  पैसे गोळा करून द्यावे लागले. या देशात मुलगा म्हणून जन्म घेणे हा शाप झालाय. 
    न्यायाधीश महाराजानी दोघाना हा निर्णय घेताना कोणाचा दबाव नाही ना याची खात्री केली. तसेच ती या  रकमेत समाधानी आहे ना ? याची त्यानी तिच्याकडून खात्री केली. आणि शेवटी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. 
    जे नाते दोघान्मध्ये कधी निर्माणच झाले नव्हते पण कायद्यामुळे पती पत्नी हा शिक्का बसला होता तो आज न्यायाधीश महाराजांच्या सहीमुळे पुसला गेला. आणि तो  त्याचे  आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळा झाला.
ही भावना किती सुखकारक आहे याची कल्पना जो कोणी या प्रसंगातून गेलाय त्यालाच समजू शकते. गेली साडे चार वर्षे संयमाची कठोर परीक्षा घेणारी गेली. आयुष्याला पुरतील असे अनुभव देउन गेली. काही नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी ,  वकील, आपली महान न्यायव्यवस्था, यांची आगळीवेगळी रूपे , तसेच परमेश्वराची कृपा असली तर काय काय होवू शकते याची जाणीव देणारी ही वर्षे होती. 
     त्या दोघांच्या नात्यात काही बिनसले आहे हे जेव्हा पहिल्यांदा  नातेवाईकांना कळले तेव्हासुद्धा  काही जणांकडून इतक्या मिश्र प्रति क्रीया उमटल्या की त्या समजल्यावर त्याला आपण या सर्वाना आपले नातेवाईक म्हणून इतके वर्षे का समजत होतो असे वाटायला लागले. काय झाले आहे हे माहित करून न घेता काही जणानी पैसे देउन मोकळे व्हा असे सल्ले दिले. काहीनी आपल्या कुठल्यातरी खटल्यात आपल्याला किती द्यावे लागले मग त्यामानाने तुम्हाला काहीच द्यावे लागत नाहीये अशी तुलनाही केली. काहीना त्याच्या बाबतीत असे घडले याचा विकृत आनंद पण झाला आणि आता याची मजा बघायची असे ठरवून चेहऱ्यावर दु:खी भाव आणून खोटे सांत्वन केले. काहीनी पाठिमागे त्याच्यात आणि त्याच्या आईत काहीतरी दोष असणार नाहीतर एवढी सोन्यासारखी मुलगी घर सोडून का जाईल? असे तर्क लावले. काहीना मात्र खरोखर वाईट वाटले. "जी काही मदत लागेल ती सांग" असे काहीनी मनापासून सांगितले. त्याला "तुझे सगळे चांगले होइल" असे आशीर्वादही दिले. त्याला आणि त्याच्या आईला या  नातेवाईकांच्या या भूमिका नवीन नव्हत्या. याआधीही असे अनुभव आलेच होते. फक्त आता निमित्त नवीन होते. त्या नातेवाईकांबद्दलचे आपले ठोकताळे बरोबरच आहेत आणि ही लढाई सुद्धा आपल्या दोघानाच लढायची आहे याची जाणीव  वेळेत झाल्याचे  दोघाना त्यातल्या त्यात समाधान होते. आता सुद्धा हा विषय पूर्ण झाल्यावर त्या ठराविक नातेवाईकांच्या काय प्रतिक्रीया येणार याची त्याला कल्पना आहे. "आम्ही म्हणालो होतो ; पैसे द्यावेच लागणार. तेव्हा आमचे ऐकले असते तर कमी द्यावे लागले असते आणि लवकर सुटका झाली असती",  "तरी फार काही द्यावे लागले नाहीत अमक्याच्या तमकीने एवढे मागितले होते", "या दोघाना आमचे ऐकायला नको ; शेवटी मुलाची ४ वर्षे गेली ना फुकट ? " , " शेवटी दिलेच ना एवढे पैसे ? मग कशाला पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून रडत होते ?" इत्यादी इत्यादी. 
    न्यायव्यवस्थेत  'वकील' हा महत्वाचा  दुवा आहे . त्याने  आपल्या अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडून त्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करायचे असतात. त्या साठी त्याला अशिलाकडून फी मिळत असते . पण काही वकील असे आहेत  की ते आपल्या अशिलाना बरोबर उलटे सल्ले देतात. त्याचे परिणाम अशिलावर होतात, कोर्ट  अशिलावर नाराज होते . अशिलाची बाजू कोर्टापुढे मांडलीच जात नाही. मग एकतर्फी  काही आर्थिक निर्णय घेतले जातात.त्याचे  वकिलाना काहीच वाटत नाही .अशीलाची आर्थिक परिस्थिती, मानसिक स्थिती याने त्याना काहीही फरक पडत नाही. माणुसकी तर दूरच पण आपले वकील म्हणून असलेले कर्तव्य  सुद्धा  वकील विसरतात .  आपल्या चुकीच्या सल्यामुळे समोरच्याचे काय काय नुकसान होवू शकते याचे त्याना अजिबात भान नसते. आणि आपण वकील आहोत म्हणजे अशीलाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा. अशीलाने प्रश्न विचारलेले त्याना आवडत नाही.त्याचे फोन उचलले जात नाहीत . अशीलाने आपल्या केस बद्दल अभ्यास केलेला त्याना चालत नाही. आणि आपण मागू तेवढे आणि मागू तेव्हा पैसे त्याने द्यावेत याच त्यांच्या अपेक्षा असतात. बदल्यात आपण काय लायकीच्या सेवा देतोय याची त्याना फिकीर  नसते. या वकीलांच्या चुकीच्या सल्ल्यामुळेच त्याचे नुकसान झाले होते. आपल्या कर्मांपासून कोणाचीच सुटका नसते. वकीलांच्या बाबतीत तर त्यांची कर्मे त्यांची तिसरी पिढी भोगते असे म्हणातात. 
    आता त्याच्यासाठी नवीन आयुष्य सुरू होतेय. साडे चार वर्षांचा अनुभव आयुष्यभर सोबतीला रहाणार आहे. आज त्याच्यासारखे असंख्य पुरूष एकतर्फी कायद्याचे शिकार झाले आहेत. कित्येक जण तुरूंगात आहेत , कित्येकांचे पालक उतारवयात कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. कित्येक जण आपल्या पोटच्या गोळ्याचे दर्शन व्हावे म्हणून विनवण्या करत आहेत आणि कित्येक जण असे आहेत ज्याना हा ताण सहन  होत नाही , आई वडिलांचे हाल पहावत नाहीत , समाजाच्या विखारी जीभा असह्य होतात ; ते आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण त्याची तरी कोणाला फिकीर आहे ? एक पुरूष गेला म्हणून कोणाला काहीच फरक पडत नाही. कारण आपल्याला फक्त महिलांचे सबलीकरण करायचे आहे. असे किती पुरूष रोज जातात. कोणालाही त्याचे काही वाटत नाही. मुळात महिला सबलीकरणाच्या पाशवी उत्साहाच्या नादात समाज पुरूषालाही मन असते, आत्मसन्मान असतो , त्यालाही प्रेमाची , गरज असते , त्यालाही काही अधिकार असतात हेच विसरून गेलोय. पुरूष म्हणजे घाण्याला जुंपलेला बैल झालाय ; काहीही  करून त्याने कुटूंबाच्या सतत वाढत्या गरजा भागवायच्या आणि त्यातच आपले आयुष्य खर्ची पाडायचे. यात कधीही कसूर करायची त्याला परवानगी नाही ; तसे झाले तर लगेच  समाज त्याचे लचके तोडायला तयारच आहे. 
    राज्यकर्त्यांनी विवाह संदर्भातले कायदे इतके एकतर्फी करून ठेवले आहेत की मुली त्याचा एक पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून वापर करू लागल्या आहेत. कायद्यांच्या  मूळ उद्देशाला हरताळ फासला जातोय ;पण त्याची दखल  कुठेही घेतली जात नाहीये. आपली काही चूक नसताना केवळ आपण मुलगा आहोत म्हणून आपल्या आयुष्यातील ५ वर्षे मनस्तापाची गेली आणि वर आर्थिक भुर्दंड बसला ही सल त्याच्या मनातून काही केल्या जाणार नाही. महिला सशक्तीकरणाच्या नकली ओझ्याखाली दबलेल्या व्यवस्थेने आज आणखी एक बळी मिळवला.

Monday 1 March 2021

माझी शाळा | शताब्दी वर्ष

#माझीशाळा #फाटकहायस्कूल 

       नव्या नोकरीतल्या सहकार्यांकडून आईला रत्नागिरीतील तेव्हाच्या प्रसिद्ध शाळांची नावे कळली. आणि त्यापैकी एका शाळेत मला प्रवेश मिळावा यासाठी नोकरी सांभाळून आईची धडपड चालू होती. एका प्रसिध्द शाळेने आमची कौटूंबिक परिस्थिती बघून ( चारचौघांसाऱखी  कौटूंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे) मला प्रवेश नाकारला होता.  त्यामुळे आई काळजीत होती. बालवाडीचे पहिले वर्ष असेच १-२ शाळेत गेले आणि बालवाडीच्या दुसऱ्या वर्षात मात्र मला 'फाटक हायस्कूल' मध्ये ( प्राथमिक शाळेचे नाव वेगळे आहे ) प्रवेश मिळाला. 
       घरात मला सांभाळण्यासाठी आणि शाळेत पोहोचवण्यासाठी कोणी नाही म्हणून माझ्या आईने शाळेजवळ फ्लॅट घेतला. सकाळी १० वाजले की आई नोकरीवर जाताना  मला घराजवळच्या पतित पावन मंदिरात सोडायची. शाळेची वेळ होइपर्यंत मी मंदिराच्या आवारात रहायचो. वेळ झाली की रस्ता ओलांडून शाळेत जायचो. शाळा सुटली की परत मंदिरात मग तिथे आई नोकरीवरून  आली की तिच्याबरोबर घरी. 
त्यामुळे शाळा , शाळेतले शिक्षक , मित्र , पतित पावन मंदिराच्या आवारातले रहिवासी आणि जवळच असलेले  'जनसेवा ग्रंथालय ' हेच माझे जग होते. आणि या सगळ्यानी माझे बालपण समृद्ध केले. सगळे शिक्षक चांगले भेटले. सर्वांची नावे आठवत नाहीत आणि सर्वांची नावे  लिहिणे शक्यही नाही. प्राथमिक शाळेच्या भावे बाई , घाणेकर बाई , रायकर बाई , नारकर सर , हायस्कूल मधल्या खांचे बाई , नितीन गावकर सर , शेट्ये बाई , प्रभुदेसाई बाई , परीट सर , टिकेकर सर , देवऱूखकर सर , सावर्डेकर सर , कीर सर , भाट्ये सर , सावंत सर , गोगटे सर , भाताडे सर , श्रीखंडे बाई , बोपर्डीकर बाई , मुळ्ये बाई सर्वांची आठवण येते. त्यांच्या तासाच्या गमती जमती  आठवतात. मैदानावरचे खेळ आठवतात. NCC चे भिवरे सर आणि NCC ची दोन वर्षे आठवतात. पांढरे शुभ्र कपडे घालून केलेली दर शनिवार - रविवार ची परेड आठवते. सगळ्या सहली आठवतात. दहावी पर्यंत मी एकही शालेय सहल चुकवली नाही.  २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट साठीची लेझीम ची प्रॅक्टिस आठवते. या शाळेने खूप काही दिले. सगळे शब्दात मांडणे कठीण आहे. 
     आज जो काही मी आहे , जसं आयुष्य जगतोय त्याचे सारे क्रेडिट या शाळेचे , तिथल्या शिक्षकांचे , पतित पावन मंदिरातल्या भगवान लक्ष्मी नारायणाचे आणि तेथील  रहिवाश्यांचे ( त्यानी मला आणि माझ्या आईला प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे खूप आधार दिला ; खरतरं हा स्वतंत्र पोस्ट चा विषय आहे  ) आणि जनसेवा ग्रंथालयातील पुस्तकांचे आहे. चौथी पासून रत्नागिरीतून बाहेर पडेपर्यंत या वाचनालयात मी जायचो. या वाचनानेच माझे वैचारिक जग बदलत गेले.

     आजपासून शाळेचे शताब्दी वर्ष सुरू होतेय. (स्थापना ०१ मार्च १९२२) गुरूवर्य कै. फाटक सर यांच्या संकल्पामुळे शाळा उभी राहिली आणि वटवृक्षाप्रमाणे वाढत जाताना आज वयाची शंभरी गाठतेय.  ज्ञानदानाचे  कार्य हे अभिनव कार्य आहे ते असेच या वास्तूतून अव्याहत पणे येणाऱ्या काळात चालू राहूदे. आणि त्याद्वारे आमच्या सारख्या असंख्य  मातीच्या गोळ्याना योग्य तो आकार मिळू दे या सदिच्छा! 

     लहानपणी आईबरोबर बालवाडीतल्या प्रवेशासाठी गेलेलो असताना ज्या सरानी / बाईनी माझा interview घेतला आणि मला प्रवेश दिला त्यांच्यापासून दहावीचा रीझल्ट काढून देणाऱ्या क्लार्क पर्यंत ज्यानी ज्यानी माझे चांगलेच योजले आणि त्यासाठी आपल्या आयुष्यातील वेळ दिला त्या सर्वांच्या चरणी मनापासून कृतज्ञता. 

- अनिकेत शेटे ( दहावी- अ - २००२ बॅच )
*#माझी_शाळा #फाटक_हायस्कूल #शताब्दी_वर्ष*
Image sources: Facebook groups

Wednesday 19 February 2020

"1917" - By Sam Mendes

"1917" - By Sam Mendes (Skyfall वाला )
अप्रतिम cinematography पहायची  असेल तर "1917" पहायलाच हवा ...!! यावर्षीचे cinematography साठी Oscar , "1917" ला मिळालेच आहे ( Best sound mixing साठी पण मिळालेय !) Roger Deakins ने अक्षरशः जीव ओतून कॅमेरा हाताळलाय .
पण चुकूनही हा सिनेमा Normal multiplex / single screen theatre ला बघू नये.  Imax technology ला पर्याय नाही . आता आपल्याकडे खरी imax नाहीत ; जी आहेत ती liemax आहेत पण तरी तिथेच बघावा . म्हणूम मुद्दाम औंध च westend cinepolis गाठले.

 युध्द पट म्हटले की माझ्या मनात स्पीलबर्ग चा saving private Rion फार वरच्या क्रमांकावर आहे . Story, screenplay, editing, music, casting , या सगळ्या बाजूत हा  सिनेमा अव्वल आहे . त्यात भर म्हणजे स्वतः स्पीलबर्ग चे दिग्दर्शन! युद्धातला इतका जबरदस्त रक्तपात मी इतर कुठल्याही सिनेमात पाहिलेला नाही.आजही हा सिनेमा मुद्दाम पहावासा वाटतो . त्यामुळे 1917, पहाताना मनात saving private Rion शी तूलना होइल की काय अशी भिती होती. पण प्रत्यक्षात तसे अजिबात झाले नाही . याचे कारण म्हणजे Roger Deakins चा कॅमेरा ! 

सरळ एकसंघ शॉट म्हणजे काय ते हा सिनेमा पाहून कळते . त्याचे सौंदर्य बघतच रहावेसे वाटते . चित्रपटाची कथा फक्त दोन शॉट मध्ये आहे . चित्रपटाच्या कथेत  सकाळी सुरू झालेला शॉट त्यादिवशी संध्याकाळी संपतो ( तब्बल एक तास सहा मिनिटानी ) आणि दुसरा शॉट रात्री  सुरू होवून दुसऱ्या दिवशी संपतो . बहूदा जगात असा प्रयोग फार कमी वेळा झालाय . आपण स्वतः त्या कथेत उपस्थित आहोत असे शेवटपर्यंत जाणवते याचे श्रेय Roger Deakins ला आहे ( आणि Imax ला पण!) 

युध्दातले front line वरचे बंकर , नदी , नाले , झाडे , पाने - फुले , गेलेल्या सैनिकांची प्रेते , चिखल , काट्याकुट्यांचे रस्ते , हिरवी माळराने , भकास गावे इतकी सुंदर रित्या चित्रीत केली आहेत की बऱ्याच वेळेला या ठिकाणी कॅमेरा कसा adjust केला असेल,  त्याची trolly कुठल्या angle ला set केली असेल असे प्रश्न पडतात पण या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या आत Roger ने आपल्या जादूयी कलेने पुढचा आणखी एक  सुखद धक्का दिलेला असतो . 
बाकी सिनेमाच्या कथेबद्दल , नटांच्या कामाबद्दल इथे लिहायची गरज नाही . भारतात १७ जानेवारीला रीलीझ झालाय ; त्यानंतर खूप जणानी  यावर लिहिले आहे .

काही दृष्ये मात्र परत परत बघावीत अशी आहेत :

1) बंकर मधला उंदरामुळे होणारा स्फोट आणि त्यानंतरचा background track

२) विमान क्रॅश होण्याचा सीन 

३) George Mackay ट्रक मधून जात असताना , त्याच्या समोरच्या सैनिकांच्यापाठून फिरवलेला कॅमेरा 

४) Dean chapman जेव्हा मरणासन्न असतो आणि तो george ला विचारतो की मरणार आहे का ? आणि यावर george हो असे उत्तर देतो तो प्रसंग .

५) नदीच्या पाण्यात खूप थकून पोहत जात असताना पाण्यात पडलेली पांढरी फुले पाहून George ,  conscious ती सीन.

६) गलितात्र झालेला George जेव्हा जंगलात प्रार्थना करत असलेल्या बटालियनजवळ पोचतो तो सीन .. हे प्रार्थना गीत सुद्धा अप्रतिम आहे .. I am a poor wayfaring stranger...

एकूणच Roger Deakins आणि Sam Mendes ची ही दोन तासांची  Race Against Time अप्रतिम ट्रीट आहे दर्दींसाठी ..!
- अनिकेत शेटे - चिंचवड ( 19/02/2020)
pics- From google