Saturday 4 March 2023

ANDAMAN DIARIES / AIRPORT LOUNGE ACCESS 4/4

#Andamantrip2023 4/4
#creditcardtips 
#AirportLoungeAccess 

   मित्रानो , नुकताच अंदमान ट्रिप करून आलो. विमान प्रवासादरम्यान दोनदा  लेओव्हर होते. म्हणजे दोन विमानांच्या मधला काळ. हा काळ असा असतो की ज्यात तुम्ही विमानतळाबाहेर जाऊन फिरून परत येउ शकता. माझा पहिला लेओव्हर कोलकात्याला रात्रीचा होता. आणि दुसरा बेंगरूळू ला दिवसा होता. दोन्ही वेळेस मी विमानतळाच्या बाहेर जाणे टाळले. एक तर सामान लॉकर मध्ये ठेवा आणि परत आल्यावर चेकींग चे सगळे सोपस्कार करा आणि मिळणार्या तीन ते चार तासात फिरण्यापेक्षा परत जायचे आहे याचेच जास्त बंधन मनात रहाते. 

   पण विमानतळावर बसून रहाणे पण कंटाळवाणे असते. काही खायचे प्यायचे म्हटले तरी ते खूप महाग असते. दोन सामोसे आणि कोल्ड्रिंक चा कप ३९९/ + कर  किंवा दोन पऱाठे आणि ताक ४९९/ + कर असे इथे दर असतात. 

   तर या दोन्ही लेओव्हर मध्ये मी विमानतळावरील लॉंज सेवेचा कसा फायदा घेतला ; त्याबद्दल आज माहिती सांगणार आहे. ही सुविधा तुमच्याकडे ठराविक ( म्हणजे lounge access देण्याची सुविधा असणारे ) क्रेडिट कार्ड असेल तर वापरू शकता. प्रत्येक विमानतळावर असे lounges आहेत जिथे प्रवासी ज्यांच्या connecting flights आहेत किंवा flights delayed आहेत अशांसाठी मधला वेळ सुसह्य व्हावा म्हणून या सुविधा देण्यात येतात.
   या lounge मध्ये अमर्यादित खाणे , पिणे , बसणे , आराम करणे , wi-fi , washrooms या सेवा असतात. ज्यांच्याकडे वर उल्लेख केलेली कार्ड्स आहेत त्याना प्रतिव्यक्ती केवळ २ रूपये ( हो ! फक्त २ रूपये!! ) मध्ये इथे प्रवेश मिळतो. ज्यांच्याकडे ही कार्डस नसतील त्याना प्रतिव्यक्ती सुमारे १२००/- ते १५००/- ( प्रत्येक lounge वर अवलंबून ) दर आकारण्यात येतो. प्रत्येक eligible कार्ड वर एक व्यक्ती याप्रमाणे आपण आपल्या नातेवाईकांना / मित्राना पण इथे नेउ शकता. माझ्याकडे दोन कार्ड्स असल्याने मी सोबत आईला इथे नेउ शकलो. 

   इथे खाण्याचे असंख्य प्रकार उपलब्ध  असतात. शाकाहारी / मांसाहारी दोन्ही प्रकार असतात. कालच जाऊन आल्यामुळे काल काय होते ते सांगतो. कांदे पोहे, पॅटीस ,  पनीर बटर , दाल मखनी , वेज पनीर , पनीर लबाबदार , रोटी , भात, मसाले भात , चणा मसाला , फिश करी , चिकन च्या डिश असे असंख्य प्रकार बूफे मध्ये होते. आपल्याला हवे ते आणि हवे तितके आपण घेउ शकतो. याशिवाय फळे , सॅलड , ज्यूस , चहा , कॉफी , कोल्ड्रिंक, पेस्ट्रीस , डेझर्ट्स हेही असते. 
   या lounge मध्ये तुमच्या departure timing च्या आधी तीन तासापर्यंत प्रवेश मिळतो. त्याआधी नाही. एकदा प्रवेश मिळाला की इथे खाण्यापिण्यावर , आराम करण्यावर कसलेही बंधन नाही. आहे ना कमाल ?

   ह्या सुविधा काही कार्ड्सवर दर तिमाहीला दोनदा असतात तर काही कार्ड्स वर वर्षाला आठ वेळा ( म्हणजे तिमाही चे बंधन नसते ) असतात. काही कार्डस वर international lounge access सुद्धा असतो. 

   क्रेडिट  कार्ड हे खूप उपयोगी financial instrument आहे; पण त्याला दुधारी धार आहे. ते वापरायचे कसे हे माहित नसेल तर आर्थिक नुकसान होते. पण ज्याना त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसते , त्याचे फायदे माहित नसतात  किंवा चुकीच्या वापरामुळे ज्यांचे नुकसान झालेय , आणि ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणारे हेच लोक क्रेडिट कार्ड ला नावे ठेवत असतात. मी गेले कित्येक वर्षे क्रेडिट कार्डस वापरतोय आणि आजपर्यंत एकही रूपया व्याजच्या स्वरूपात भरला नाहीये.  

   त्यामुळे आपल्या क्रेडिट कार्ड्स वर काय काय सुविधा आहेत याचा परत एकदा मागोवा घ्या. आणि अशा सुविधांचा अवश्य फायदा घ्या. 

   आता जगात काहीच फुकट नसते हे आपल्याला माहित आहे. इथे हे lounge वापरल्याने प्रत्यक्ष आपल्याकडून काही न घेता जरी सेवा पुरवली जाते तरी आपल्याकडून अप्रत्यक्षपणे काय घेतले जाऊ शकते ? त्या traps मधून कसे वाचायचे याबद्दल परत कधीतरी लिहिन. अत्ता इथेच थांबतो. 
सोबत बेंगळूरूच्या lounge चे फोटो जोडतोय.
- अनिकेत शेटे. ©️
आर्थिक सल्लागार
पिंपरी चिंचवड.

ANDAMAN DIARIES / CELLULAR JAIL 1/4

#AndamanTrip2023 1/4
#cellularjail 
#Savarkar 
#portblair 

आज दि. 26.02.2023 , तात्यारावांचा तारखेने  स्मृतीदिन!

   गेले काही महिने ह्या दिवशी अंदमान मध्ये सेल्यूलर जेल ला भेट द्यायचा केलेला मानस आज पूर्ण होतोय. 
   लहानपणापासून म्हणजे रत्नागिरीत पतित पावन मंदिरात जात असल्यापासून , तिथला माघी गणेशोत्सव असो किंवा शिवजयंतीचे कार्यक्रम असोत , सावरकरांविषयी काही कार्यक्रम झाला नाही असे कधी झाले नाही. नाटक असो , व्याख्यान असो , देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम असो सावरकर या धगधगत्या कुंडाची ओळख तेव्हापासून होण्यास सुरूवात झाली. यात  माघी गणेशोत्सवात आणि इतर प्रसंगी झालेली  श्री आफळे बुवांची कीर्तने फार वरच्या क्रमांकावर आहेत. 
    पुढे जरा वय वाढल्यावर " माझी जन्मठेप " हातात आले. आजपर्यंत त्याची अनेक पारायणे झाली. आणि 'अंदमान' हा शब्द्च मनात कायमचे घर करून गेलाय. पुढे आणखी वय वाढल्यावर ह्या द्वीपाबद्दल , याच्या भौगोलिक स्थानाबद्दल , रचनेबद्दल मनात खूप कुतुहल वाढले. आणि तेव्हाच मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली की इथे एकदा तरी भेट द्यायचीच. आज तो योग आलाय.

   सध्याचे सेल्यूलर जेल हे मूळ जेल च्या ३०% ते ३५%  शिल्लक आहे. पण जे शिल्लक आहे ते सुस्थितीत आहे. आत प्रवेश केल्यावर लगेच उजवीकडे आणि डावीकडे दोन मोठी दालने आहेत; एकात अंदमानात शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांची नावे आणि कुठल्या खटल्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. दुसऱ्यात काळे पाणी म्हणजे काय ? कुठल्या कुठल्या शिक्षा केल्या जात ? अंदमानचा थोडक्यात इतिहास , इंग्रजांच्या काळातील अंदमानचे काही दुर्मिळ फोटो अशा गोष्टी आहेत. आणखी एक तिसरे दालन जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदमान भेटीचे फोटो आहेत. हे पाहून आत आल्यावर डावीकडे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील ज्ञान अज्ञात वीरांचे स्मृती स्मारक आहे. सेल्यूलर जेल हा स्टार फिश च्या आकारात म्हणजे केंद्रभागी एक tower आणि त्याला विविध दिशेत सात  ( आपण पाकळ्या म्हणूया ) लांबच्या लांब कोठड्यांच्या इमारती  अशी रचना होती. त्यावेळी इथे सुमारे ७०० कैदी ठेवायची क्षमता होती. 
सध्या या सातपैकी केवळ तीन पाकळ्या शिल्लक आहेत. यांची पण रचना अशी आहे की एका पाकळीतल्या कोठडीतील  कैद्याला समोरच्या पाकळीतील तसेच आपल्या पाकळीतल्या कुठल्याही कोठडीतील  कैदी दिसता कामा नये. तळ मजल्यावरील काही कोठड्या उघड्या आहेत. आपण आतून त्या पाहू शकतो. आम्ही त्या पाहिल्या ;  पण आता आम्हाला तात्यारावांची कोठडी पहायची होती. जेल मध्ये आत गेल्यावर उजवीकडील पाकळीवर दुसर्या मजल्यावरील सर्वात शेवटची कोठडी त्यांची आहे. तिथे जाताना पाय अक्षरश : थरथरत होते. " माझी जन्मठेप " मध्ये लिहिलेले अत्याचार डोळ्यासमोर येत होते. आज स्मृतीदिन असल्यामुळे गर्दी खूप होती. कोठडीत पण गर्दी होती ; जरा गर्दी ओसरल्यावर आम्ही आत गेलो आणि तात्यारावांच्या तसबीरीकडे पाहून थिजून गेलो. त्याच कोठडीत दोन्ही हात वर भिंतीला बांधून तासनतास उभे असलेले तात्याराव डोळ्यासमोर येउ लागले , कैद्यांचे हात - पाय ताठ रहावेत ( bend करता येउ नयेत ) म्हणून बनवलेल्या बेड्यान्मधले तात्याराव दिसायला लागले. त्या बेड्या तशाच हातात घेउन घासत चालणारे तात्याराव, कोळशाने भिंतीवर " कमला " लिहिणारे तात्याराव , कोलू ओढणारे तात्याराव , असोला नारळ हाताने सोलणारे तात्याराव , बारी सारख्या नराधमाकडून अपमान सहन करणारे तात्याराव , " अनादि मी , अनंत मी " हे अजरामर गीत रचण्यापूर्वीचे विमनस्क तात्याराव अशी अनेक रूपे डोळ्यासमोर आली आणि एकाच वेळी आपल्या शरिरात असंख्य सूया कोणीतरी टोचतयं अशा वेदना जाणवल्या. किती वेळ गेला हे कळले नाही. तिथली फुले तात्यारावांच्या तसबीरीवर अर्पण करून बाहेर आलो. 
संध्याकाळी तिथे एक लाईट आणि साउंड शो असतो. बघण्यासारखा आहे. जेलच्या दोन पाकळ्यांच्या भव्य पार्श्वभूमीवर हा शो दाखवला जातो. इंग्रजानी आमच्याच जमिनीवर , आमच्याच माणसांचे कष्ट वापरून , आमच्याच पैशाने , आमच्याच क्रांतीकारकांवर अत्याचार करण्यासाठी हा जेल बांधला. निर्दयीपणाची किती  परिसिमा गाठली गेली याची साक्ष म्हणजे हा तुरूंग आहे. आईपासून तिचे लेकरू क्षणभर दूर झाले तर तिचा जीव वर खाली होतो ; इथे भारत मातेचे किती सुपुत्र किती वर्षे खितपत पडले होते. त्यांच्या बद्दल , त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बातम्या तर सोडा साधी कुजबूज कोठडीबाहेर होत नव्हती. असे काय पाप केले होते त्यानी ? त्याना स्वतःबद्दल , कुटूंबाबद्दल स्वप्ने नसतील ? प्रपंच करावा नेटका असे वाटले नसेल ? देश वाचवायची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी ; मला संसार आहे असे का वाटले नसेल ? या असंख्य वीरांचे  ऋण आपल्यावर  आहेत जे आपण कधीच फेडू शकत नाही. 
    यानंतर कैद्याना फाशी देण्याची जागा , कोलू ओढण्याची जागा  पाहिल्या. जेल च्या बाहेर एका बागेत इथे ज्यांचे प्राण गेले अशा वीरांचे पुतळे आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. 
लाईट आणि साउंड शो पाहिल्यावर मनाला एक खिन्नता येते. आज इतक्या वर्षानीसुद्धा मन त्याच काळात जाते आणि आपला देश दीडशे वर्षांच्या गुलामीत का अडकला ? आपण हे टाळू शकलो नसतो का ? असे विचार मनात यायला लागले. सोबत आजही सावरकरांवर होणारे आरोप ऐकून अजून चिडायला होते. हे सर्व आरोप करणार्यानी , शंका घेणार्यानी आपल्या घरात डोक्यावर छप्पर असताना , फॅन / एसी  वगैरे सोयी असताना एका जागेवर फक्त  एक तास न हलता उभे राहून कसे वाटते ते बघावे. सावरकरानी दहा वर्षे परकियांचा छळ इथे सोसलाय ; त्यांच्यावर शंका घेताना आपली जीभ झडत कशी नाही ? भरल्या पोटी आपली नसलेली बुद्धी दाखवणे हे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या व्यक्तीची देशाचा पहिला पंतप्रधान होण्याची योग्यता होती त्याना साधे सरकारी ध्वजारोहणाचे आमंत्रण मिळाले नाही ; त्यानी अत्यंत साधेपणाने आपल्या घरात ध्वजारोहण केले. आणि अशाच कृतघ्न लोकांच्या अवलादी आजही तात्यारावांच्या त्यागावर शंका घेतात ? अजून किती अपमान करणार आहोत आपण सावरकरांचा ? डोके सुन्न होते हे सगळे आठवून ..
शेवडे गुरूजीनी उल्लेख केल्याप्रमाणे अंदमान हे "राष्ट्रतीर्थ" आहे ; प्रत्येक भारतीयाने इथे भेट दिलीच पाहिजे. 
आज आता अजून दुसरे काही पहाण्याची इच्छा नाहीये. बाकी अंदमान बाबत नंतर लिहेन ...

(सोबत काही फोटो / विडिओ जोडतोय. खरं तर ही जागा आनंदाने फोटो काढण्याची नाहीये ; पण काही वेळा स्थळ , काळ , वेळ आणि मनस्थिती अनुकूल नसली तरीही फोटो काढावे लागतात आणि त्या प्रतिकूलतेचेही साक्षीदार आपल्याजवळ कायम असावेत असे प्रकाशचित्रकार म्हणून माझे मत आहे.)

- अनिकेत शेटे. २६-०२-२०२३ 
पोर्ट ब्लेअर , अंदमान

ANDMAN DIARIES / SCUBA DIVING 2/4

#AndamanTrip2023 2/4
#scubadiving 
#underwaterworld 
#swarajdveep 
#govindnagarbeach 
#watersportsactivities 

Scuba Diving

स्वराज ( पूर्वीचे Havlok island) द्वीपवरील किनारा हा scuba diving साठी देशात फार वरच्या क्रमांकावर आहे. इथे scuba diving करायला मिळणे म्हणजे एक पर्वणी असते. अतिशय सुरक्षित आणि coral reef ने समृद्ध असा किनारा भारत सरकारनेच Scuba Diving साठी योग्य असा घोषित केलेला आहे. 

जेव्हा अंदमान ट्रिप ची तयारी चालू होती तेव्हा Scuba Diving करायचे आणि ते स्वराज द्वीप वरच करायचे असे ठरवले होते. अंदमान ला जवळपास ५-६ वेगवेगळे किनारे आहेत जिथे Scuba Diving करता येते ; पण सगळ्यात उत्तम स्वराज द्वीप आहे.

Diving साठी गर्दी टाळावी आणि गर्दी झाली की पाणी गढूळ होते हे टाळण्यासाठी पहाटे ५ ला Scuba Diving करायचे नियोजन केले. याआधी कधीही हा आनंद घेतला नव्हता ; त्यामुळे खूप उत्सूकता होती. Diving साठी इथले नियम कडक आहेत.  वय ५० च्या पुढल्या व्यक्ती , हार्ट , बीपी चे आजार असलेल्या व्यक्ती , नुकताच को#ड होवून गेलेल्या व्यक्ती छातीचे , श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्ती याना हा खेळ खेळण्यास मनाई आहे. 

'विविध प्रकारचे आजार मला नाहीत आणि हा साहसी खेळ खेळताना मला काही झाले तर माझा मीच जबाबदार असेन' हे declaration लिहून दिल्यावर मी पाण्यात उतरायला तयार झालो. Diving साठी खास रबऱी पोशाख आणि शरीर पाण्यात बूडावे म्हणून पोटावर लोखंडी वजन असलेला belt चढवला. डोळे आणि नाक झाकले जाईल असा mask घातला आणि कंबरे एवढ्या पाण्यात उतरलो. इथे माझे training होणार होते. Training देणारा मुलगा चांगली माहिती देत होता. पाण्यात श्वास कसा घ्यायचा ? मास्क मध्ये किंवा तोंडात पाणी गेले तर काय करायचे ? खाली गेल्यावर बोलता येणे शक्य नाही म्हणून कुठल्या खूणा हाताने कधी करायच्या ? हे सगळे त्याने समजावले. माझ्याकडून तिथे २-३ वेळा हे सगळे करून घेतले. आणि मग माझ्या पाठीवर nitrogen चा मोठा Cylinder चढवला आणि आम्ही दोघे खोल पाण्यात जायला तयार झालो.

अंदमान चे किनारे हे इथल्या स्वच्छ पाण्यासाठी आणि coral reef साठी प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारचे , विविध रंगांचे , आकाराचे reef इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यासोबत रंगीबेरंगी मासे , आणि इतर समुद्री जीवन पाण्यात खोल जाऊन प्रत्यक्ष बघायला खूप मजा येते. 
आपण सर्वानी हा एक मस्त अनुभव एकदातरी नक्की घ्या आणि हे पाण्याखालचे जीवन जवळून पहा. सोबत काही फोटो आणि विडिओ जोडत आहे. 
- अनिकेत शेटे 
पिंपरी चिंचवड

ANDAMAN DIARIES / BARATANG LIMESTONE CAVES

#AndamanTrip2023 3/4
#Baratang
#Baratang_limestone_caves
#Limestonecaves

   अंदमान ला येण्यासाठी आकृष्ट करणारे अजून एक  ठिकाण म्हणजे बाराटांग बेटावरील लाखो वर्षापूर्वीच्या नैसर्गिक चूनखडीच्या ( Limestones) गुहा.
बाराटांग हे बेट मध्य अंदमानात पोर्ट ब्लेअर पासून १०० किमी अंतरावर , पोर्ट ब्लेअर - दिग्लीपूर या NH-4 वर आहे. पण इथे मनात आले आणि जाऊन आलो असा विषय नाहीये. इथे जाण्यासाठी खास तयारी करावी लागते. ह्या भागात पोर्ट ब्लेअर पासून ४८ किमी वर " जरावा " आदिवासींची वस्ती आहे.  'जरावा' हे इथल्या मूळ रहिवाश्यांपैकी एक आहेत. पण आता त्यांची संख्या खूप कमी आहे ; म्हणून भारत सरकार ने त्यांच्या वस्तीला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. कोणीही भारतीय तिथे पूर्वपरवानगी शिवाय जाऊ शकत नाही. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन हे भारत सरकारचे उद्दीष्ट आहे. पूर्वी हे लोक हिंस्र होते आता तसे नाहीत , आता कपडे घालतात , हिंदी बोलतात , को#ड काळात टोचून पण घेतले. पण आपल्यात मिक्स होत नाहीत, ते त्यांच्याच वस्तीत खूष असतात. त्यांची शरीराची ठेवण आफ्रिकेतील निग्रोंसारखी आहे.
    तर बाराटांग ला जाताना या ' जरावा' वस्तीवरून जावे लागते. आणि तिथले नियम फार कडक आहेत. त्यांच्या वस्तीच्या आधी २० किमी वर एक गेट आहे ते सकाळी ६ ला उघडते. त्यावेळी तिथे ज्या गाड्या पुढे म्हणजे बाराटांग , दिग्लीपूर , मायाबाजार या ठिकाणी जाण्यासाठी रांगेत असतील त्यानाच तिथून प्रवेश दिला जातो. पण प्रवेश देण्यापूर्वी गाडी नम्बर , प्रवासी संख्या , त्यांची kyc हे सगळे करावे लागते. त्या गेट वर ६ च्या आधी पोहोचण्यासाठी आम्हाला पोर्ट ब्लेअर सकाळी ३ ला सोडावे लागले , त्याआधी रात्री २ ला उठावे लागले!
    ४:१५ ला आम्ही त्या गेट जवळ पोहोचलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत गाडी लावावी लागते. आणि कागतपत्रांची पूर्तता करावी लागते. तिथेच चहा - नाश्त्याची छोट्या टपर्या आहेत. बरोबर ५:४५ ला स्पीकर वरून तिथले नियम सांगायला सुरूवात झाली . 'जरावा' वस्तीतून जाताना सगळ्या गाड्या एका मागोमागच जातील. कोणीही overtake करायचा नाही . गाडीचा वेग ४० प्रति तास पेक्षा जास्त नसेल. दोन गाड्यान्मध्ये २५-३० मीटर अंतर असेल. वाटेत कोणीही थांबायचे नाही. ' जरावा ' दिसले तर कोणीतरी वेगळा प्राणी दिसला असे समजून आरडाओरड अजिबात करायचा नाही , त्यांच्याकडे बोटं दाखवायची नाहीत , त्यांचे फोटो काढायचे नाहीत , त्याना खायला काही द्यायचे नाहीत , विचारपूस करायची नाही , त्याना कपडे किंवा इतर वस्तू द्यायची नाही. वाटेत plastic फेकायचे नाही , सुट्टा ब्रेक , selfie point, आडोश्याला जाणे  वगैरे काहीही करायचे नाही.
   आणि यातले काही केले तर सरळ ॲट्रोसिटी कायद्याखाली कारवाई होते. म्हणजे सरकार या बाबतीत किती गंभीर आहे हे लक्षात येते.

    बरोबर ६ वाजता आमचा त्या गेट मधून प्रवास सुरू झाला. लोकल driver सगळे नियम पाळत होते. कोणीही आगाऊपणे overtake करणे , हॉर्न वाजवणे असले प्रकार करत नव्हता. सुमारे २०० वाहने याच शिस्तीत जात होती. वाटेत २-३ वेळा  'जरावा' दिसले. आपल्याप्रमाणेच माणसे आहेत ती. शांतपणे आमच्या जाणाऱ्या गाड्या बघत होते. मनूष्याला आपल्या कातडीच्या रंगाचा उगाचच अहंकार असतो. आपल्या कातडीचा जो काही रंग आहे त्यात आपले काय कर्तुत्व असते ? आणि दुसऱ्याकडे तो रंग नसेल तर त्यात त्याचा काय दोष किंवा कमीपणा  असतो ? असो.


    हा सगळा प्रवास घनदाट जंगलातून आहे. विविध पक्ष्यांचे मंजूळ आवाज , झाडांची सळसळ , नुकत्याच झालेल्या सुर्योदयाने पसरलेला प्रकाश असं मस्त वातावरण होते. अंदमानात हिंस्र श्वापदे म्हणजे वाघ, सिंह वगैरे नाहीयेत ; त्यामुळे इथे भिती वाटत नाही. बेट असल्यामुळे ही इथली सुरक्षितता आहे. दूरून कुठून कोणी प्राणी स्थलांतर करून येण्याची पण शक्यता नाही. जोपर्यंत इथे बाहेरून आणून कोणी प्राणी सोडत नाही तोपर्यंत भिती नाही.

 
    ७:३० ला आम्ही ' जरावा ' वस्तीच्या दुसऱ्या बाजूच्या गेट ला पोहोचलो. इथे नदी आहे. ज्या गाड्या पुढे दिगलीपूर किंवा मायाबाजार ला जाणार आहेत त्या गाड्या मोठ्या बोटीत चढवल्या जातात. मला कोकणातील  धोपावे - दाभोळ फेरी बोट ची आठवण झाली. ज्याना फक्त बाऱाटांग इथे जायचे आहे त्यानी आपल्या गाड्या इथेच ठेवून फक्त बोटीवर चढायचे आणि पलीकडे जायचे. त्याप्रमाणे दहा मिनिटात आम्ही पलीकड्च्या किनार्यावर पोहोचलो. तिथे बाराटांग ला जाण्यासाठी speed boat सुटतात. त्यांचे पण आधीच booking करावे लागते. दहा जणांच्या गृप ला एक याप्रमाणे त्या बोटी सुटतात. मी गेलो तेव्हा महाराष्ट्रातील बरेच गृप आले होते त्यामुळे बोट मिळणे जरा अवघड होते. पण माझ्या driver ने सगळे सोपस्कार आधीच पुरे केले असल्याने आम्हाला बोट मिळाली. या बोटीसोबत जो captain असतो तोच पुढे गुहेपर्यंत सोबतीला येणारा गाईड असतो. हा अर्धा तासाचा प्रवास आहे. एका बाजूला प्रसिध्द अशी mangroove forest मऱाठीत ज्याला आपण खारफुटी म्हणतो ती जंगले आहेत. अर्ध्या तासाने दाट अशा खारफुटीच्या जंगलात बोट थांबते आणि आपण बारटांग बेटावर पोहोचलेलो असतो. तिथून पायी प्रवास सुरू होतो. सुमारे दीड किलोमीटर चालायचे आहे. थोडे चढणे - उतरणे आहे. वयस्कर लोकाना त्रास होवू शकतो. आणि शेवटी आपण जगप्रसिद्ध अशा limestone खाणी जवळ पोचतो. दोन्ही बाजूला उंच पण अरूंद अशा limestones च्या  खिंडीसारख्या रचनेच्या मार्गातून चालावे लागते. सुमारे १२० चौ मी मध्ये या गुहा आहेत. यातील ४० चौ मी सजीव म्हणजे त्यावर चून्याचे formation चालू आहे. बाकीच्या dead आहेत. या कशा बनतात ? किती वर्षे लागतात ? याबद्दल लेखन सीमेमुळे मी इथे लिहित नाही; google वर ही माहिती आहे.
पण या गुहेत गेल्यावर लाखो वर्ष जूने असे limestone चे formations बघायला मिळतात. त्यांचे हत्ती , मगर , श्री गणेश असे विविध आकार बघायला मिळतात. सरकारने या गुहा हल्लीच काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी मोकळ्या केल्या आहेत. तूलनेने त्या आपल्यासाठी नव्याच आहेत. गाईडच्या माहितीनुसार जिथे वरून सूर्यप्रकाश आणि पावसाचे पाणी पडते तिथले खडक वाढायचे थांबतात ; त्यालाच ते dead म्हणतात. असे dead खडक बाहेरून गुहेत आत येताना बरेच बघायला मिळतात. त्यांचे रंग राखाडी पिवळसर झालेला आहे. जे खडक अजून जिवंत आहेत ते पांढरे शुभ्र दिसतात. त्यानासुद्धा मनुष्याच्या स्पर्ष नाही झाला तर येणार्या काही हजार वर्षात त्यांचे सुद्धा मोठमोठाले formations बनतील. आपण आजपर्यंत कधीही न पाहिलेला निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहातोय याची जाणीव होते.
    पाहून झाल्यावर परत परतीचा प्रवास चालू कारण वेळ काढून चालणार नसते ; जिथे गाडी ठेवली आहे तेथील ' जरावांचे' गेट परत दुपारी १२:३० ला उघडणार असते. त्याआधी दोन जलप्रवास करून तिथे पोचणे आवश्यक असते. ते झाले की परत सगळ्या गाड्यांचा एका रांगेत परतीचा प्रवास आणि पोर्ट ब्लेअर ला पोचायला दुपारचे ३:१५ वाजतात.
बारा तासांचा प्रवास आहे पण ज्याना निसर्गाच्या आविष्कारान्ममध्ये रस आहे त्यांच्यासाठी बाराटांग च्या गुहा या not to miss catagory मध्ये येतात.
- अनिकेत शेटे
पिंपरी चिंचवड.