Thursday 15 July 2021

अमृतसर भाग १

अमृतसर डायरी # भाग १

जानेवारी २०२०

माझ्याबद्दल थोडेसे :
मला कधीच टूर ऑपरेटर्स बरोबर फिरायला जायला आवड्त नाही. त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे फिरायचे , ते देतील ते खायचे , त्यांच्या वेळा पाळायच्या , ते देतील त्या हॉटेल मध्ये रहायचे , लौकिक अर्थाने जे प्रसिद्ध आहे ते घाई घाईमध्ये पहायचे आणि घरी यायचे. आणि यासाठी भरपूर पैसे मोजायचे हे मनाला पटत नाही. त्यामुळे माझ्या ट्रिपस मलाच arrange करायला आवड्तात. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे वेळेचे नियोजन करता येते. एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबावेसे वाटले तर थांबू शकतो. जिथे हवे तिथे राहू - खाऊ शकतो. हव्या त्या पर्यायाने प्रवास करू शकतो आणि यात मला भरपूर मजा येते . यात पैशांची सुद्धा बचत होते. फिरायला गेल्यावर प्रत्यक्ष फिरण्यात म्हणजे प्रवासखर्च , entry tickets, तिथले लोकल खाणे पिणे यावर खर्च करायला मी अजिबात मागेपुढे पहात नाही पण फिरायला गेल्यावर मला महागड्या हॉटेल वर खर्च करणे पटत नाही. 2star , 3star हॉटेल्स मध्ये जाऊन रहाणे म्हणजे निव्वळ पैसा फुकट घालवणे आहे . रात्रीची शांत झोप आणि सकाळचे प्रातर्विधी हे सोडून आपण त्या खोलीचा काहीही वापर करत नाही मग भरमसाठ भाड्याच्या खोल्या कशाला हव्यात ? टूऱ ऑपरेटर बरोबर जायचे म्हणजे या रहाण्यावर खूप खर्च केलेला असतो .त्यामुळे साधा homestay, किंवा धर्मशाळा असली तरी मला चालते फक्त रहाण्याचे ठिकाण सुरक्षित पाहिजे . पैसे वाचवायचे म्हणून कुठेही राहून चालत नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात कुठेही 2star, 3star हॉटेल बूक केले तर तिथले वातावरण हे सारखेच असते. पण आपण धर्मशाळा , homestay, किंवा छोटी हॉटेल्स try केली तर तिथले वातावरण वेगवेगळे असते. त्या त्या राज्यातील संस्कृतीचा फील असतो.

पंजाब प्रवासाची तयारी :

माझी देशातील बर्यापैकी राज्ये फिरून झाली आहेत . पण पंजाब चा योग अजून आला नव्हता. लहानपणी हरितक्रांती मुळे भूगोलातून या राज्याची ओळख झाली. नंतर चित्रपट , शीख समुदाय बहुसंख्य असलेले राज्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत पाक सीमेवरचे राज्य म्हणून पंजाब बद्दल उत्सुकता होती. आणि बरेच दिवसात लांब कुठे गेलो नव्हतो म्हणून पंजाब ला जायचे नक्की केले. पंजाब राज्य मोठे आहे आणि बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत ; पण माझ्याकडे जास्ती दिवस नसल्यामुळे यावेळी मी फक्त अमृतसर लाच जायचे ठरवले . अटारी बॉर्डर चा बीटिंग रीट्रीट चा कार्यक्रम आणि सुवर्णमंदिर हे खास आकर्षण होते माझ्यासाठी. आई आणि मी असे दोघेच जाणार होतो .

#पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे तिकीट बुकिंग:

फक्त अमृतसर ला जायचे असल्यामुळे पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे अश्या प्रवासाचे नियोजन करायचे होते. वेगवेगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स , ट्रिप ॲडवासर यावर माहिती घेउन मी अमृतसर मधील प्रेक्षणीय स्थळांची यादी काढली. बऱ्याच जणानी अमृतसर ला फिरायला दोन दिवस पुष्कळ झाले असे लिहिले होते. मी काढलेली प्रेक्षणीय स्थळांची यादी आणि त्या ठिकाणांचे सुवर्णमंदिर पासूनचे अंतर मी गूगल मॅप वर पाहून लिहून काढले आणि प्रत्येक दिवशी आपण साधारण किती ठिकाणे करू शकतो याचा अंदाज बांधला आणि तीन दिवसांचा प्लॅन ( itinary) तयार केला यात आणखी एक दिवस जास्तीचा ठेवला कारण माझ्या सोबत आई असणार होती. अमृतसरच्या थंडीत तिला adjust व्हायला एक दिवस लागू शकतो किंवा अटारी बॉर्डर च्या कार्यक्रमात जर सरकार कडून / सैन्याकडून ऐनवेळी काही बदल झाला ( अभिनंदन वर्थमान ला परत आणायच्या दिवशी बिटिंग रीट्रीट चा कार्यक्रम रद्द केला होता ; सामान्य नागरीकाना त्यादिवशी तिथे प्रवेश नव्हता )तर एक दिवस राखीव ठेवला होता. असे प्रवास सोडून 3+1=4 दिवसांचे नियोजन मी केले . जर या जास्तीच्या दिवसाची गरज लागली नाही तर त्यादिवशी कुठे फिरायचे ह्याचे पण नियोजन केले .

पुणे ते अमृतसर अशी डायरेक्ट ट्रेन नाहीये . पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमृतसर असा ब्रेक जर्नी केला तर साधारण ३६ ते ३८ तासांचा प्रवास आहे .
आई सोबत असल्यामुळे मला ट्रेन चा प्रवास टाळायचा होता . एवढा ट्रेनचा प्रवास केल्यावर परत तिथे कमी तापमानात फिरायचे होते. म्हणून मी विमान प्रवास करायचे ठरवले. पण पुणे ते अमृतसर डायरेक्ट फ्लाईट पण नाहीये. मुबंईहून डायरेक्ट फ्लाईट आहे. पण ती सकाळी १०:३० ची आहे म्हणजे त्यासाठी पहाटे लवकर पुण्यातून निघावे लागणार होते. म्हणून मी पुणे ते दिल्ली असा विमानप्रवास करायचा ठरवले. पुण्याहून दुपारी १:३० चे डायरेक्ट विमान आहे ते ०३:४५ ला दिल्लील पोहोचते आणि दिल्लीतून संध्याकाळी ७ ला अमृतसरसाठी ट्रेन आहे . मुम्बई सेंट्रल ते अमृतसर अशी ट्रेन आहे( Train no : 02903) ती संध्याकाळी ७ ला दिल्लीत पोहोचते . तिची तिकीटे मी काढली. येताना पण अमृतसर ते दिल्ली ट्रेन आणि दिली ते पुणे असा विमानप्रवासाची तिकिटे काढली.
हे बूकिंग मी Oct 2019 मध्ये केले आणि प्रवासासाठी Jan 2020 चा पहिला आठवडा निवडला. कारण नोव्हेंबर- डिसेंबर हे थंडीचे महिने टाळायचे होते . तसेच या महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे बरेच पर्यटक बाहेर पडतात. त्यामुळे सगळीकडे गर्दी असते. सगळीकडे दर जास्त असतात पण जानेवारी मध्ये नाताळ ची सुट्टी संपून शाळा सुरू झालेल्या असतात , थंडी थोडी अवाक्यात असते आणि सीझन संपल्यामुळे रिक्षावाले , लॉजवाले बार्गेनिंग च्या मूड मध्ये असतात . आणि आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात छान होते.

# प्रवासाची तयारी :
प्रवासाच्या तयारीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तिथल्या थंडीचा अन्दाज बांधणे. नेट वरून गेल्या २-३ वर्षांचा हवामानाचा trend बघितला आणि प्रत्येकी हातमोजे , पायमोजे, शाली २ जोड , आणि प्रत्येकी एक स्वेटर घेतला. जानेवारी मध्ये हवामान ३° ते ६ ° च्या आसपास असते .
थोड्र सुके खाणे बरोबर घेतले. एक मोठी बॅग check in luggage मध्ये आणि एक सॅक cabin baggage मध्ये घेतली. क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , ट्रेन ची तिकिटे सर्व सोबत घेतले.
अमृतसर ला उतरायचे कुठे हा प्रश्न होता. नेट वरून एवढे समजले होते की शहर फार मोठे नाहीये. आणि सुवर्ण मंदिरापासून बाकीचे spot जवळ आहेत . मग सुवर्ण मंदिराजवळ च रहायचे मी ठरवले. नेट वर सुवर्ण मंदिराच्या भक्त निवासाबद्दल समजले. तिथले बूकिंग online करता येते . ( www.sgpcsarai.com
) भक्त निवास ला तेथे सराई म्हणतात. पण हे online booking फक्त दोन दिवसांसाठीच मिळते. परत वाढवून मिळते का ते माहित नव्हते. आणि त्यावेळी पाच जणांच्या rooms उपलब्ध होत्या. ज्याची मला गरज नव्हती. त्यामुळे मी काही online booking केले नाही. इथले check in time 1300 hrs & check out time 1200 hrs(noon) आहे . त्याबाबतीत इथे शिस्त आहे. वेळ मागेपुढे झाली तर पूर्ण दिवसाचा charge द्यावा लागतो . आणि इथे फक्त कुटुंब आणि विवाहित जोडप्यानाच जागा देतात .
याशिवाय private rooms देणारे सुद्धा बरेच आहेत. नेट वर सगळी माहिती आहे. room मिळायला अडचण येणार नाही हे कळल्यावर मी तिथे जाऊनच room घ्यायचा विचार केला. क्रमश: