Saturday 23 March 2024

रणदीप हूडांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' :- सर्वानी अवश्य पहावा.



  काल प्रदर्शित झालेला रणदीप हूडा यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  हा सिनेमा पाहिला. 
लहानपणापासून सावरकर हे खूप वेळा वाचलेले असले आणि त्यांचा सारा जीवनपट आपल्या समोर असला तरी  कोणीतरी नव्याने त्यांच्यावर आधारीत कलाकृती बनवतेय हे समजल्यापासून मन या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. चित्रपटाचे दिग्दर्शक , निर्माता  आणि अभिनेता या महत्वाच्या तीनही जबाबदारी पेलेणार्या अभिनेता रणदीप हूडा यानी एक चांगला चित्रपट बनवला त्याबद्दल यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे. अमराठी माणसाने सावरकर समजून घेणे , त्यांचा अभ्यास करणे , आणि त्यावर चित्रपट बनवून त्यात सावरकरांची भूमिका करणे हे अजिबात सोपे नाहीये. एका मुलाखतीत रणदीप यानी या चित्रपटासाठी त्याना त्यांचे घर गहाण ठेवावे लागल्याचे सांगितले आहे.

  सावरकरांचा जीवनपट केवळ तीन तासात पडद्यावर दाखवणे कठीण आहे. पण रणदीप नी आपले कसब पणाला लावून हे आव्हान स्वीकारले आहे आणि सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक  महत्वाची बाजू दाखवण्याचाप्रयत्न केला आहे. सावरकरानी आयुष्यात सुमारे १४ वर्षांचा प्रत्यक्ष सश्रम कारावास आणि १३ वर्षे नजरकैद भोगली. अंदमानचा सश्रम कारावास काय होता ह्याचे  चित्रण प्रत्येक भारतीयाने बघणे गरजेचे आहे. मी स्वत: अंदमानची सावरकरांची कोठडी आणि तेव्हा देण्यात येणार्या शिक्षांची प्रारूपे प्रत्यक्ष पाहिली आहेत. ती रिकामी कोठडी बघूनच माझा मेंदू तेव्हा जड झाला होता. तिथे सावरकरानी ११ वर्षे छळ सोसला होता , तिथेच त्यानी कोलू ओढला होता , तिथेच त्यानी हाताने नारळ सोलले होते आणि तिथेच त्याना "कमला" काव्यसंग्रह स्फुरला होता. त्यानी देशासाठी हालअपेष्टा भोगल्या म्हणजे नक्की काय काय सहन केले असेल याची जाणीव ह्या चित्रपटातून येते. एका प्रसंगात भूक हरताळावर असलेल्या कैद्याशी बोलताना सावरकर म्हणतात ,  "अरे तुझ्या उपाशी मरण्याने कोणाला कसलाही फरक पडणार नाही ; क्रांतीची ज्वाला पेटती ठेवण्यासाठी साम , दाम , दंड , भेद याचा वापर करून जिवंत रहाणे आणि इथून बाहेर पडणे आणि परत इंग्रजांविरूद्ध जोमाने लढणे हे आपले ध्येय असले पाहिजे." दुसर्या प्रसंगात अंदमानमधील मुसलमान वॉर्डन छळकपटाने आणि धाकटपशाने हिंदू कैद्याना बाटवणे आणि त्यांना धर्मांतरीत करण्याचे प्रकार करी. यामुळे दु:खी झालेल्या हिंदू कैद्याला समजवताना सावरकर म्हणतात ,  "मुसलमान का खाना क्या, पुरा मुसलमान खाओगे फिर भी मुसलमान नहीं बनोगे! "
गांधी हत्येनंतर संपूर्ण देशात जी ब्राम्हण  विरोधी दंगल झाली ज्यात अनेक ब्राम्हणाना मारण्यात आले , त्यांची घरदारं लुटली गेली , त्यातच विनायकरावांचे धाकटे बंधू , नारायणराव यांची सुद्धा हत्या झाली,हेही चित्रपटात दाखवून अहिंसेचे तत्वज्ञान त्या काळात देखील  किती तकलादू होते यावर प्रकाश टाकला आहे. सावरकरांचे ' हिंदुत्व ' हे केवळ हिंदूंसाठी नसून सर्वसमावेशक होते. देशाची फाळणी कुठल्या परिस्थित झाली ? त्यामागे कोणाचे हट्ट होते ? फाळणी नंतर ५५ कोटी भारताने का दिले ? लाहोर ते ढाका अस रस्ता बनवायला कोण उत्सुक होते ? हे आणि असे अनेक प्रसंग आपल्याला आपले स्वातंत्र्य मिळताना किती चुका केल्या गेल्या आणि सावरकरांचे ऐकले असते तर त्या टाळत्या आल्या असत्या याची जाणीव करून देतात.

  जी व्यक्ती देश स्वतंत्र झाल्यावर देशाची पंतप्रधान व्हायला हवी होती त्याना दिल्लीच्या स्वतंत्र भारताच्या  पहिल्या ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळाले नाही. तेव्हापासून आजपर्यंत सावरकराना या देशात सरकारी पातळीवर उपेक्षितच ठेवले गेले. त्यांच्यावर नको नको ते आरोप आजही केले जातात. त्यानी अंगिकारलेल्या विविध नितींवर टीका केली जाते. पण सावरकर किती द्रष्टे होते याची जाणीव ही काळच आपल्याला करून देतो. त्यांची तरूणाना सक्तीचे सैनिकी शिक्षण देण्याची कल्पना किती गरजेची होती हे आपल्याला १९६२ मध्ये चीनकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यावर झाली. "देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात ; चरख्यावरच्या सूताने नाही" हे त्यांचे लिखाण किती महत्वपूर्ण होते आणि आपण किती दुर्लक्षित केले ते आज आपल्या सीमा पाहून लक्षात येते. दुर्दैवाने आज आपली एकही सीमा सुरक्षित नाही. राज्यकर्ते काळाच्या  पुढे विचार करणार्या सावरकरांचे ऐकत नाहीत आणि त्याचे फटके आपल्या देशाला-देशातील सामान्य जनतेला भोगावे लागतात.

   राजकीय दरबारी कायम उपेक्षित राहिलेले हे तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व समाजमनामध्ये मात्र कायम जागृत राहिले पाहिजे. आणि ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. समाजमनाच्या दबावापुढे कुठलीही सत्ता झुकू शकते. आणि समाजमन घडवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. ऱणदीप हूडा यानी यानिनित्ताने जो प्रयत्न केला आहे त्याला आपण सर्वानी साथ दिली पाहिजे. हा चित्रपट घरातील लहानमोठ्या सगळ्या  सदस्याना घेउन बघितला पाहिजे. त्यावर घरी येउन चर्चा केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपल्याला हव्या त्या कृती आज आपण सहजपणे करतो. कारण आज आपण स्वतंत्र आहोत.पण त्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढीने किती भीषण दिवस काढले आहेत, केवढा संघर्ष आणि पराकोटीचा त्याग केला आहे याची जाणीव आणि त्याबद्दल सदैव  कृतज्ञ राहिले पाहिजे. 

  चित्रपटातील  'कधीच कुठल्या कॉंग्रेस सदस्याला काळ्यापाण्याची शिक्षा का झाली नाही ?' हा सावरकरांचा प्रश्न आणि आयुष्यभर अहिंसेचे तत्वज्ञान सांगणार्या गांधींचा वध गोळी घालून होतो आणि आयुष्यभर सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करणारे सावरकर मात्र प्रायोपवेशन करून देह त्याग करतात या दोन विसंगती आपल्याला  विचार करायला भाग पाडतात. 

- अनिकेत 
पिंपरी चिंचवड 
फाल्गुन शु १३ 
दि: २३-०३-२०२४

Monday 4 March 2024

अयोध्या दर्शन २०२४

नमस्कार !

  आज अयोध्या दर्शन करून पुण्यात परत आलो. गेले पाच दिवस इतके चांगले गेले की ही ट्रिप संपूच नये असे वाटत होते. मी लहानपणी म्हणजे चौथीत असताना अयोध्येला गेलो आहे. तेव्हाची अयोध्या , शरयू नदी आणि एकूण उत्तर प्रदेश ची भयंकर स्थिती अजूनही डोळ्यासमोर आहे. 
  आणि आज अयोध्या आणि उत्तर प्रदेश चे बदललेले रूप बघून योगीजींच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश हा सगळ्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे जाणार आहे हे जाणवतेय. मराठी म्हणून ह्या गोष्टीचे वाईट वाटतेय पण आपल्याच देशातील एक राज्य इतकी सर्वांगीण प्रगती करतेय याचा आनंद पण आहे. आपापसात Healthy competition असणे गरजेचे आहे. आपण मराठी माणसे देखील कशातही कमी नाही ; ठरवले तर आपण काहीही करू शकतो , मिळवू शकतो हा आपला इतिहास आहे. पण नेतृत्व सक्षम , ताकदवान आणि दूरदृष्टी असलेले असेल तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश राज्य आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राला असेच ताकदवान , स्थिर आणि vision oriented सरकार मिळणे गरजेचे आहे. येणार्या राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या निवडणूकान्मध्ये हिंदूनी आग्रहाने मतदान करणे गरजेचे आहे. आपण स्वत: , आपल्या घरातील सदस्य , आणि नातेवाईक , शेजारी- पाजारी याना मतदानच्या दिवशी  मतदान करण्यासाठी आग्रह करणे गरजेचे आहे. 
  तर आता अयोध्या नगरीकडे वळूया. ठरल्याप्रमाणे  सकाळी ९:३० ला आस्था ट्रेन ने आम्ही दर्शन नगर स्टेशन वर पोहोचलो. ( आस्था ट्रेन बद्दल ची माहिती या लेखाखाली स्वतंत्रपणे दिली आहे )  देश भरातून सुमारे १००० आस्था ट्रेंन्स अयोध्येच्या दिशेने धावत आहेत. या सर्व गाड्यांचे नियोजन सोपे व्हावे म्हणून अयोध्या कॅंटोन्मेंट या स्टेशन सोबत सलारपूर आणि दर्शन नगर ही नवीन स्टेशन तयार करण्यात आली. आणि एकाच स्टेशन वर गर्दी टाळण्यासाठी  आस्था ट्रेन या तीन स्टेशन वरून सोडल्या जातात.
  स्टेशन वर पोहोचताच रामनामाच्या जयघोषात यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करून आमचे  स्वागत करण्यात आले. स्टेशन नवीन असले तरी भरपूर जागा ताब्यात घेउन बांधले आहे. स्टेशन च्या बाहेर UP govt च्या electricity वर चालणार्या  बस आम्हाला न्यायला उभ्या होत्या. ही बस सेवा यात्रेकरूंसाठी स्टेशन ते टेंट सिटी , टेंट सिटी ते श्रीराम मंदिर आणि टेंट सिटी ते स्टेशन अशी  UP govt ने पूर्णपणे मोफत दिलेली आहे. 
  टेंट सिटी ही  शहराबाहेरील  एका मोठ्या मैदानात यात्रेकरूना रहाण्यासाठी केलेली सोय आहे. साधारण २५० ते ३०० एकर वर ही सिटी वसवली आहे आणि अशा अजून अनेक टेंट सिटी शहरात वसवण्याचे नियोजन चालू आहे असे समजले.
  इथे जागोजागी पोलिस संपर्क कक्ष , पिण्याचे पाणी, हरवले - सापडले कक्ष, फिरती शौचालये, आहेत. रहाण्यासाठी चित्रकूट , प्रयागराज अशा रामयणासंबंधित नावांचे मोठे विभाग केलेले आहेत. आस्था ट्रेन च्या ओळखपत्राचा जो belt आहे त्याला colour coding केले असून प्रत्येक राज्याला ठराविक रंग देण्यात आला आहे. यानुसारच प्रत्येक राज्यातील यात्रेकरूंची रहाण्याची सोय केली आहे. या coding मुळे विविध राज्यातून आलेले यात्रेकरू समजणे सोपे जाते. कर्नाटक , तनिळनाडू , बंगाल , आसाम , महाराष्ट्र , गुजरात या राज्यातले यात्रेकरू प्रामुख्याने दिसले. वर विभागांचा उल्लेख केला त्या प्रत्येक विभागात  एक , दोन किंवा काही विभागात तीन असे मोठे जेवणासाठी तंबू उभारले आहेत. एका तंबूत सुमारे ६०० ते ७०० यात्रेकरू एकावेळी जेवण करू शकतात. विभागात आत गेल्यावर हे जेवणाचे तंबू मध्यभागी आहेत त्यामुळे रहायच्या तंबू पासून ते सारख्या  अंतरावर आहेत. या तंबूमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चहा आणि सकाळी नऊ वाजल्यापसून रात्री १२ पर्यंत पोट्भर महाप्रसाद चालू असतो.
  या जेवणाच्या तंबूंच्या आजूबाजूला रहायचे मोठे तंबू आहेत. त्यात सुद्धा एकावेळी ४००-५०० माणसे झोपू शकतील अशी सोय आहे. प्रत्येकाला बेड , गादी, बेडशीट , ब्लॅंकेट ची सोय आहे. तंबू मध्ये mobile charging ची सोय आहे. या तंबूंच्या मागे portable toilets आणि baathrooms आहेत. इथे २४ तास पाणी आहे. यांची संख्या पण खूप आहे. याशिवाय दहा जणांसाठी एक अशा छोट्या तंबूंची सोय पण आहे त्याना toilet / bath attached आहेत. 
  या सगळ्या विभागात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सगळे विभाग आणि सगळे तंबू speaker ने जोडले असून महत्वाच्या सूचना नियंत्रण कक्षातून  वेळोवेळी दिल्या  जातात. मैदानात जरी हे तंबू उभारले असले तरी ८०% मैदानावर  ताडपत्री आहे. त्यामुळे चालताना त्रास होत नाही. टेंट सिटी  च्या सुरूवातीला बस पार्किंग चा डेपो आहे. तिथे तीनही स्टेशन वरून येणार्या आणि तिथे जाणार्या बस ची जागा तसेच टेंट सिटी ते श्रीराम मंदिर दर्शनासाठी जाणार्या आणि तिथून येणार्या बस ची जागा नक्की केलेली आहे. तसे बोर्ड तिथे लावलेले आहेत.  त्यामुळे जाउन उभे राहिले की पाच मिनिटात बस मिळते. या बस पार्किंग पासून आपला विभाग आणि तिथून पुढे आपला रहायचा तंबू हे अंतर जरा जास्त आहे त्यामुळे बस पार्किंग पासून विभागाच्या प्रवेशद्वारापर्यंत वृद्ध आणि विकलांग व्यक्तींसाठी बस सेवा पण आहे. त्याना चालत जायची गरज पडत नाही. 
  १०:३० पर्यंत आम्ही आमच्या तंबूत पोहोचलो. १ वाजेपर्यंत आंघोळ आणि जेवण करून तयार व्हायचे असे ठरले होते. जेवण झाल्यावर आम्ही श्रीराम दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो. अयोध्येत स्व.लता मंगेशकर यांच्या नावाने नवा चौक उभारल्याचे आपण सर्वानी टीव्ही वर पाहिले आहे. या चौकापासून राम मंदिर पर्यंतचा रस्ता हा  "रामपथ" या नावाने ओळखला जातो. या चौकाजवळच "राम की पैडी", "काळा राम आणि गोरा राम मंदिर" , "माता शरयू मंदिर" , "नया घाट हा शरयू नदीवरचा घाट ही ठिकाणे  आहेत. आणि या चौकापासून सुरू होणार्या "रामपथा"वर सुमारे 2.5 किमी अंतरावर हनुमान गढी आणि श्रीराम मंदिर आहे. या रामपथावर रिक्षा ना परवानगी नाही. टेंट सिटी वरून येणार्या बस या लता मंगेशकर चौकात येतात तिथे आपल्याला सोडतात आणि तिथूनच आपल्याला घेउन परत टेंट सिटी मध्ये जातात. श्रीराम मंदिराजवळील गर्दीचे नियोजन करण्यासाठी राम पथावर वाहनाची वाहतून मर्यादित केली आहे. यामुळे या चौकात उतरले  की 2.5 किमी चालत जाउन श्रीरामाचे दर्शन घेउन परत 2.5 किमी चालत परत चौकात यावे लागते. हा रस्ता खूप चांगला आहे. विविध प्रकारची दुकाने दोन्ही बाजूला आहेत पण ज्याना एवढे चालणे शक्य नाही ते शेअर रिक्षा चा वापर करून शहराच्या बाहेरून छोट्या मोठ्या  गल्लीतून हनुमान गढीपर्यंत पोहोचू शकतात. 
  प्रथेनूसार हनुमान गढी चे दर्शन झाल्यावर आम्ही  मुख्य मंदिराकडे वळतो. पूर्वी गेलो तेव्हा अरूंद  रस्ते , जागोजागी असणार्या  सुरक्षा चौक्या आणि केवळ पडद्यामध्ये असलेले श्रीराम लला असे तेव्हाचे चित्र आता इतिहास जमा झालेय आणि अयोध्या नगरी नव्या वधू सारखी सजली आहे. सगळीकडे रामभक्तांच्या स्वागताचे बोर्ड , हार , तोरणे , वातावरणात सकारात्मक बदल घडवत होते. पोलिस , सुरक्षा व्यवस्था , सीसी टीव्ही कॅमेरे भरपूर आहेत पण या व्यवस्थेचा पूर्वीसारखा दबाव किंवा ताण जाणवत नव्हता. हिंदूना त्यांच्या आराध्याचे सुखाने दर्शन घेता यावे म्हणून ही यंत्रणा उभी आहे याची जाणीव दिलासा देणारी होती. कोणीही पोलिस उगाचच कोणाला अडवणे , प्रश्न विचारणे , टोकणे असले प्रकार करत नव्हते. 
  आत गेल्यावर जसे airport वर checking terminal असते तसे इथेही एक terminal बांधले आहे. तिथे आपली आणि आपल्याकडील सामानाची metal detector द्वारे तपासणी होते. ती झाली की आत चप्पल ठेवण्यासाठी स्टॅंड आहेत. ते झाले की आपल्याकडील सामान आणि मोबाईल ठेवण्यासाठी locker rooms आहेत. फक्त खिशातील पैसे आणि ओळखपत्रे आत नेण्याची मूभा आहे. या सर्व सेवा मोफत आहेत. हे झाले की आपण मुख्य दर्शनाच्या रांगेत लागतो. इथे परत एकदा cheking होते. इथे कर्मचारी प्रत्यक्ष हाताने आपले खिसे तपासतात आणि त्यात गुटखा, तंबाखू , मावा , चूना , कंगवा असल्या गोष्टी असतील तर तिथेच काढून  फेकतात. कोणी मुद्दाम / चूकून मोबाईल सोबत आणला असेल तर येथून परत मागे जावे लागते. हे बघून खूप आनंद झाला. नांदेड आणि अमृतसर च्या गुरुद्वारा मध्ये असेच checking होते आणि कोणालाही कसलेही नशेचे पदार्थ सोबत घेउन आत जायला परवानगी नाहीये. तेव्हाच अशी पद्धत आपल्या मंदिरात का नाही ?असा विचार मनात आला होता. आता श्रीराम मंदिराचे अनुसरण देशातील सर्व मंदिरानी करावे आणि मंदिरांचे पावित्र्य जपावे. आत जातानाच्या परिसरात विविध मंदिरांचे चालू असलेले काम दिसते आणि हेच मुख्य मंदिर असावे असे वाटते आणि याच रस्त्यावरून मोदी जी २२ जानेवारीला मंदिरात प्रवेशकरते झाले असे वाटते ;पण मुख्य मंदिर जरा आतल्या बाजूला असून लांबून ते एकदा दिसले की मनात आता राम ललाचे  दर्शन होणार म्हणून मन  आनंदाने भरून येते. जसजसे मंदिराजवळ जातो आणि आत जातो तसतसे मनाचे उत्सूकता वाढत जाते आणि मंदिराच्या पहिल्या  दालनातूनच दूरून श्री राम ललाचे दर्शन होते. दुसर्या दालनात गेलो की अजून जवळून दर्शन होते. आणि तिसर्या दालनात एकदम जवळून दर्शन होते. तरी मोदीजीनी जिथे बसून पूजा केली तिथपर्यंत आत जायला मिळत नही. साधारण २० फूटांवरून दर्शन मिळते. २०-२५ सेकंद तिथे थांबता येते. त्यापेक्षा जास्त काळ थांबू देत नाहीत. या वेळात श्रीरामाकडे काय बघू आणि किती बघू असे होते. श्रीरामाची ती प्रसन्न बाल रूपातील मूर्ती मनात साठवून आपण बाहेर पडतो आणि प्रसाद घेउन चप्पल स्टॅंड आणि लॉकर रूम्स च्या मागल्या बाजूला येतो. तिथून या गोष्टी ताब्यात घेता येतात. संपूर्ण मंदिर परिसरात विविध कामे चालू आहेत. पण भाविकाना या कामाचा कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय , toilets ची सोय आहे. इथे गर्दी मुळे लहान मुलांसोबत मोठी माणसे ही हरवण्याचे प्रमाण आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मद्त कक्ष आहेत. स्पीकर वरून हरवलेल्यांच्या नावाचा सतत पुकार होत असतो. आणि त्याना ठराविक ठिकाणी येण्याचे आवाहन केले जाते.  
  मंदिरातून बाहेर आलो की समोरच श्रीराम जानकीचे बिर्ला मंदिर आहे. संगमरवरातील सुंदर मूर्ती इथे आहेत. नंतर राम पथावरून खाली स्व. लता मंगेशकर चौकाकडे चालत निघालो. वाटेत दोन्ही बाजूला खाण्यापिण्याची , मिठाईची , पुस्तकांची , कलाकुसरीच्या वस्तूंची , श्रीरामच्या मूर्तीच्या फोटोंची , प्रसादाची दुकाने आहेत. सगळी दुकाने गर्दीने ओसंडून वहाताना दिसतात. सर्वाना घरी आठवण म्हणून नेण्यासाठी काही ना काही घ्यायचे असते. चौका जवळ पोहोचलो की एका बाजूला "नया घाट" आहे. शरयू नदीच्या काठावर हा घाट बांधला आहे. इथेच संध्याकाळी माता शरयूची आरती होते. इथे नदीत बोटींग ची सुविधा पण आहे. नया घाट वरून परत मागे चौकाजवळ आलो की "राम की पैडी" म्हणून भाग आहे , इथे शरयू नदीचे पाणी कालव्यासारखे फिरवले आहे. याच किनारी शरयू मातेचे मंदिर , नागेश्वर महादेव मंदिर , कालेराम मंदिर ( या श्रीराम पंचायतानच्या मूळ  मूर्ती आक्रमणकर्त्यांपासून वाचाव्या म्हणून नदीत लपवल्या आणि पुढे अनेक वर्षानी त्या सुस्थितीत सापडल्या ), गोरा राम मंदिर ही मंदिरे आहेत. याच किनारी मोठी screen लावली आहेत त्यावर रामायणातील प्रसंग दाखवले जातात. सोबत पाण्यात विविध रंगांची कारंजी पण आहेत. इथेच संध्याकाळी लाईट आणि साउंड शो होतो. 
हे सगळे बघून झाल्यावर परत चौकात येउन आम्ही टेंट सिटी ची गाडी पकडून मुक्कामी गेलो. 
अयोध्या आणि आसपास च्या भागात बघण्यासाठी अजून खूप ठिकाणे आहेत पण वेळेअभावी अत्ता आम्हाला जास्त काही शक्य नव्हते. दुसर्या दिवशी आस्था ट्रेन ने परतीचा प्रवास सुरू होणार होता. दुसर्या दिवशी सकाळी थोडा वेळ होता तेव्हा परत मंदिराजवळ जाउन 'जानकी महाल' चे दर्शन घेतले आणि 'श्रीराम जन्म भूमी निर्माण कार्यशाळा' या ठिकाणी जाउन नेपाळ वरून आलेले शाळिग्राम तसेच राजस्थान आणि कर्नाटक येथून आलेल्या विशिष्ठ शिळांचे सर्शन घेतले आणि परत टेंट सिटी मध्ये आलो. तोपर्यंत स्पीकर वरून महाराष्ट्रातून आलेल्या आणि परतीचा प्रवास सुरू करणार्या माझ्यासारख्या  यात्रेकरूंसाठी स्पीकर वरून उधघोषणा  होत होती. स्टेशन वर जाण्यासाठी बस उभ्या असल्याचे कळवण्यात आले. बस मधून आम्ही स्टेशन वर पोहोचलो. गाडी सुटायला वेळ होता. या दरम्यान च्या काळात प्लॅट्फॉर्म वर गर्दी होवू नये आणि सर्वाना बसता यावे म्हणून सुमारे ५०० लोकं बसतील असा मोठा तंबू स्टेशन जवळ उभारला आहे . पाठीमागे पिण्याच्या पाण्याची आणि toilets ची सोय आहे. या तंबूमध्ये  आम्ही निवांतपणे बसू शकलो. याच वेळी पाऊस आणि वादळ ही झाले. तंबू असल्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. गाडी आल्यावर आम्ही गाडीत बसलो. जागा आणि सीट नंबर आधीच ठरलेले असल्यामुळे कसलीही घाई , आरडाओरड नव्हती. सगळे बसल्यावर ठरल्या वेळी श्रीरामाचा उद्घोष करत गाडी सुटली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. 

- अनिकेत विलास शेटे. चिंचवड
04-03-2024

"आस्था ट्रेन : केंद्र सरकारचे उत्कृष्ट नियोजन"

नुकतेच आस्था ट्रेन ने अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. श्रीराम प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरातून विविध शहरातून अयोध्येसाठी खास 'आस्था ट्रेन' सोडण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या या नियोजनाबाबतचे महत्वाचे मुद्दे :-

१) सध्या पुण्यातून दुसरी डायरेक्ट अयोध्येसाठी ट्रेन नाहीये; आस्था ट्रेन ही डायरेक्ट अयोध्येपर्यंत असल्यामुळे सोयीची आहे.

२) देशाने यापूर्वी रेल्वेतील कारसेवकांवर झालेल्या अमानूष हल्ल्याच्या जखमा सोसल्या आहेत त्यामुळे या गाड्यांबाबत विशेष सुरक्षा बाळगली जाते. यामुळेच आस्था गाडीचे तिकीट बूकिंग रेल्वेच्या ॲप वर किंवा साईट वर उपलब्ध नाहीये.

३) ह्या गाडीचा मार्ग आधी कळत नाही. तसेच ती कुठल्याही ॲप वरून live track होत नाही.

४) प्रत्येक गाडीत बंदूकधारी महिला आणि पुरूष पोलिस अधिकारी सोबत असतात. त्यांचे गाडीत दिवसा आणि रात्री नियमित पेट्रोलिंग चालू असते.

५) ह्या गाडीला pantry car नाहीये. खाणे , चहा- पाणी, ठराविक स्टेशन वरून गाडीत चढवले जाते. हे चढवताना सुद्धा तिथे पोलिस बंदोबस्त असतो. हे खाणे आधी सबंधित अधिकार्यांकडून चेक केले जाते.

६) या गाडीला सगळे डबे हे सेकंड क्लास स्लीपर चे असून प्रत्येक प्रवाश्याला एक ओळखपत्र दिले जाते. त्यावर त्याचे नाव , फोन नंबर आणि प्रवासाची तारीख , वेळ, सीट नंबर आणि बोगी नंबर तसेच परतीच्या प्रवासाची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. सीट आणि बोगी नंबर हे दोन्ही प्रवासाठी एकच असतात. याशिवाय अयोध्येला तीन स्टेशन्स आहेत , त्यापैकी कुठल्या स्टेशन ला गाडी जाणार हे पण लिहिलेले असते.

७) प्रवासात प्रत्येक प्रवाश्याला एक स्वछ बेडशीट , उशी आणि ब्लॅंकेट दिले जाते.

८) प्रवासात दोन वेळा चहा , एक नाष्ता , आणि दोन जेवणे आणि दर वीस तासांसाठी एक पाण्याची बाटली रेल्वेकडून दिली जाते.

९) बाहेरच्या कुठल्याही व्हेंडर ला या गाडीत चढायची आणि विक्री करायची परवानगी नाही.

१०) स्टेशन वर गाडी येताना "ही विशेष आस्था गाडी असून या गाडीत कोणीही चढू नये" अशा सूचना स्पीकर वरून दिल्या जातात.

११) गाडी स्टेशन वर येण्यापूर्वी त्या फलाटावर ठराविक अंतरावर स्टेशन वरचे बंदूकधारी पोलिस उभे असतात. गाडी जाईपर्यंत ते कोणालाही गाडीजवळ फिरकू देत नाहीत.

१२) देशभरातून येणार्या गाड्या एकाच स्टेशन वर येउन गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने अयोध्या कॅंटॉन्मेंट , सलारपूर , आणि दर्शन नगर अशी जवळची तीन स्टेशन्स या आस्था गाडीसाठी नियोजित केली आहेत. प्रत्येक स्टेशन वर रामभक्तांचे फुले उधळून उत्साहात स्वागत होते आणि तिथून पुढे उत्तर प्रदेश च्या बस ने टेंट सिटी मध्ये नेले जाते.

१३) गाडीत प्रत्येक बोगीत ठराविक संख्येने अटेंडंट्स आणि स्वछता कर्मचारी असतात. प्रवाशाना ब्लॅंकेट्स , उशी , बेडशीट देणे , त्याची नोंद ठेवणे , बोगी आणि प्रसाधन गृहे नियमित स्वछ करणे ही कामे त्यांच्याकडून केली जातात.

अत्तापर्यंत या देशात हिंदूंना तीर्थक्षेत्री जाण्यासाठी अशी खास सोय आणि इतके छान नियोजन केलेले माझ्या पहाण्यात नाही. या सर्व सोयींसाठी रेल्वे कर्मचारी , रेल्वे पोलिस , उत्तर प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश पोलिस आणि मोदी सरकार यांचे मनापासून आभार.

- अनिकेत विलास शेटे. चिंचवड 
04-03-2024