Friday 19 January 2018

शेगावीचे योगीराज श्री गजानन महाराज!!

शेगावीचे योगीराज श्री गजानन महाराज!!



      २०१७ मध्ये दोनदा गुरूपुष्यामृत मुहूर्तावर ' गजानन विजय ' पोथीचे पारायण करण्याचे भाग्य मिळाले आणि तेव्हापासूनच शेगाव ला स्वामींच्या चरणी दर्शनाला जावे असे मनातून वाटू लागले . असे बरेच ठिकाणी आपल्याला जावेसे वाटते किंवा कधीतरी आपण जाऊया असे आपण ठरवतो पण शेगाव च्या बाबतीत मात्र आपण लवकरात लवकर तिथे जायलाच हवे असे मनातून वाटू लागले. म्हणून रेल्वे ची तिकिटे चेक केली तर जानेवारी २०१८ मध्ये पहिल्या आठवड्यात तिकिटे उपलब्ध होती ; मी लगेच जातानाची आणि येतानाची तिकिटे बूक करून टाकली आणि मनातून निश्चिन्त झालो .

    आणि हळूहळू जाण्याचा दिवस उजाडला . पुण्यातून रोज संध्याकाळी ६:२५ ला आझाद हिंद एक्सप्रेस हावडा, कोलकत्यासाठी रवाना होते. दुसर्या दिवशी पहाटे ५ वाजता ही गाडी शेगाव ला थांबते . पुणे ते शेगाव रेल्वेचे अंतर ६०० किमी आहे. मी शेगाव बद्दल  थोडीफार माहिती फेसबूक वरून  आणि गूगलवरून घेउन ठेवली होती . सगळी माहिती सकारात्मक असल्यामुळे मन निर्धास्त होते आणि स्वामींच्या दर्शनासाठी व्याकूळ होते . 

    सकाळी ५ वाजता शेगाव ला उतरल्यावर शेगावच्या  सुप्रसिद्ध शेगाव कचोरीचे मुख्य ठिकाण दिसले ; हे स्टेशन जवळच आहे. तिथे नंतर नक्की यायचे असे ठरवून पुढे आलो तर रिक्षावाल्यांचा गराडा पडला . त्याना बाजूला करून जरा अजून बाहेर आल्यावर शेगाव संस्थान ची बस उभी असलेली दिसली. दर्शनाला येणाऱ्या भक्तांना स्टेशनवरून  भक्तनिवास / मुख्य मंदिर येथे सोडण्याची सेवा संस्थान ने विनामूल्य पुरविली आहे . स्वामीनी आमच्यासाठी  किती सोय करून ठेवलेली आहे हा विचार मनात आला . मुख्य मंदिर स्टेशनपासून फार तर २ -२.५ किमी असेल . रिक्षा करायची वेळ आली तर सिट मागे दहा रूपयात ते मंदिराजवळ आणून सोडतात . 

   मंदिराजवळ आल्यावर परत एकदा रूम पुरवणारे , फ्रेश होण्याची सोय पुरवणारे  यांचा गराडा पडला . पण फेसबूक वरील मित्रांच्या सल्ल्यानुसार भक्त निवासातच रहायचे ठरले असल्यामुळे आम्ही सरळ मंदिरात गेलो. आत प्रवेश केल्यावरच सर्वात पहिल्यांदा नजरेत भरले ते पांढरे शुभ्र सदरा आणि लेंगा आणि मस्तकावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेले सेवेकरी आणि कमालीची स्वछता आणि शांतता . या सेवेकर्यांबद्दल पुढे सविस्तर लिहिणार आहे . आत गेल्यावर चौकशी कक्षात चौकशी केल्यावर समजले की भक्तनिवास क्रमांक १ व २ मंदिर परिसरातच आहेत आणि भक्तनिवास क्रमांक ३ ते ६ मंदिराबाहेर पण जवळच आहेत . तसेच 'आनंद विहार' आणि 'आनंद विसावा' हे अजून दोन मोठे भक्तनिवास मंदिरापासून २-३ किमी अंतरावर आहेत . मंदिरातील भक्तनिवासातच सोय झाली तर बरे म्हणून भक्तनिवास १ व २ च्या चौकशी केंद्रात निघालो तर समोरच्या दोन महावृक्षावरील पक्ष्यांच्या किलबिलाटाने लक्ष वेधले. दोन्ही वृक्षांच्या बुंध्याला  खालपासून वरपर्यंत उलट्या शंकूच्या आकारात हिरवे बारीक  जाळीदार कापड बांधले होते . यामुळे पक्ष्यांची विष्ठा तसेच सुकलेली पाने जमीनीवर न पडता त्या शंकूतच जमा होण्याची सोय केलेली होती. त्या वृक्षांवर पहाटे अगणित पोपट , चिमण्या , टिटव्या यांचे अस्तित्व त्यांच्या किलबिलाटामुळे जाणवत होते ; प्रत्यक्ष डोळ्यांना कोणी दिसत नव्हते . भक्तनिवासात चौकशी केल्यावर समजले की सगळ्या रूम भरलेल्या आहेत आणि १-२ रूम तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध आहेत. आमच्या बरोबर वयस्कर व्यक्ती असल्यामुळे तिसरा मजला आम्हाला नको होता म्हणून आम्ही मंदिराबाहेर भक्तनिवास क्र ३ ते ६ मध्ये प्रयत्न करायचे ठरवले. मंदिराबाहेर सात - आठ मिनिटे चालल्यावर ही मोठी इमारत लागते . ( काळोखात ओळखायची खूण म्हणजे तिथे एक मोबाईल टॉवर आहे त्यावरचा लाल लाईट रात्री दिसतो ; त्या दिशेने जायचे.) आत प्रवेश करतानासुद्धा बाहेरच्या लॉजवाल्यांचा सुळसुळाट भेदावा लागतो . ते काहीही सांगतात की आतल्या सगळ्या रूम संपल्या आहेत , ६-७ तासांचे वेटिंग आहे वगैरे वगैरे पण आपण आत जाऊन चौकशी करून मगच निर्णय घ्यावा . आत गेल्यावर आमच्यासारखेच मंदिरातून इकडे आलेले खूप लोक तिथे होते . प्रत्येक कुटूंबातील एकाला एका रांगेत नंबर लावायला सांगून बाकीच्याना सामनासकट  बाहेर बसायला सांगितले. तिथे सुद्धा रूम उपलब्ध नव्हत्या ; जशा रूम खाली होतील तशा मिळत जातील असे सांगितले. किती वेळ थांबायला लागेल याचा काही अंदाज नव्हता . ज्याना थांबणे शक्य नाही त्यांच्यासाठी आनंद विहार व आनंद विसावा इथे सोय नक्की होवू शकते ( तिथे खूप खोल्या आहेत ) व तिथे जाण्यासाठी बस ची सुद्धा सोय आहे असे सांगण्यात आले. पण मंदिरापासून ही ठिकाणे दूर असल्यामुळे आम्ही तिथेच थांबून वाट पहाण्याचा निर्णय घेतला . थोड्या थोड्या वेळाने जशा रूम उपलब्ध होतील तशा दिल्या जायला सुरूवात झाली . प्रत्येकाला एक फॉर्म देण्यात आला . त्यात नाव / गाव / संपर्क क्रमांक ही माहिती विचारली होती . आपल्या बरोबरच्या सदस्यांशी आपले नाते, आपण किती दिवस रहाणार ई माहिती विचारली जाते. हा फॉर्म देताना सगळ्या सदस्यांचे आधार कार्ड लागते. त्यामुळे ते न विसरता बरोबर ठेवावे . हा फॉर्म जमा करतानाच मी खालच्या मजल्यावर रूम मिळाली तर बरे होइल अशी विनंती केली . तेव्हा तेथील सेवेकरी बघतो म्हणाले आणि पहिल्या मजल्यावरची रूम आम्हाला दिली . हे सगळे होइपर्यंत ७ वाजले . वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत . साधी रूम , toilet/ bath attached रूम , deluxe रूम , जास्त सदस्यांसाठी मोठ्या रूम , ज्याना रूम घेणे शक्य नाही किंवा उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी कॉमन dormitory अशा सोयी आहेत .

  आम्ही toilet / bath attached रूम घेतली . रूम अतिशय स्वच्छ , टापटीप आहेत , गरम पाण्याची सोय आहे . आम्ही आंघोळ करून खाली प्रसादालयात नाश्ता करण्यासाठी आलो . तिथे सुद्धा एकाने रांगेत उभे राहून कूपन घ्यायचे , याच रांगेत असताना मेनू सांगितला जातो. अतिशय नाममात्र दरात नाश्ता मिळतो. सगळी कामे शिस्तीने केली जातात . कुठेही कसलीही घाई गडबड नाही , वाद होण्याची शक्यता नाही . आपले खाउन झाल्यावर प्रत्येकाने आपले ताट / भांडे उचलून ठेवावे एवढी माफक अपेक्षा असते. 

   नाश्ता झाल्यावर आम्ही मंदिरात दर्शनासाठी निघालो . मंदिरात प्रवेश केल्यावर परत एकदा सेवेकर्यांचे दर्शन झाले . ठराविक अंतरावर बसून ते आपली सेवा करत होते . पुढे आत गेल्यावर चप्पल स्टॅंड लागतो . एकावेळी हजारो लोकाना चपला ठेवता याव्यात आणि त्या ठेवताना / घेताना गडबड होवू नये याची काळजी इथे घेतली आहे . क्रमवार चप्पल स्टॅंड चे बूथ एकाच छताखाली केलेले आहेत . चपला ठेवल्यावर हात - पाय धुवायची जागा आहे . इथून पुढे गेल्यावर एक डिजिटल डिस्प्ले दिसतो ; त्यावर समाधी दर्शनाला आणि मूख दर्शनाला अंदाजे  किती वेळ लागेल हे लिहिलेले असते . दोन दिवसात तीन वेळा मी दर्शन घेतले . हा अंदाज सहसा चुकत नाही हे मला कळले . समाधी दर्शानाची जागा ही तळघरात आहे . गर्दी नसल्यामुळे रांग नव्हती आणि आम्ही लगेच तळघरात पोचलो आणि स्वामींचा धवल रंगातला मुर्तीच्या  चेहर्याचे दर्शन झाले . बाकी मूर्ती फुलानी सजवली होती . अचानक स्वामींचे इतके जवळून  लोभस दर्शन झाल्यामुळे काय करू आणि काय नको असे झाले होते . इतके दिवस ज्याची आतूरतेने वाट पहात होतो तो क्षण मी प्रत्यक्ष जगत होतो . स्वामींकडे कितीही  वेळा पाहिले तरी मन तृप्त होत नव्हते . तिथून वर निघालो आणि समाधीच्या वर राम - लक्षुमण - सीता यांचे मंदिर आहे तिथे पोचलो . तिथून दर्शन घेउन शेजारी असलेल्या पारायण मंडपात गेलो तिथे असंख्य भक्तगण ' गजानन विजय ' ग्रंथाचे पारायण करत होते . इथले वातावरण खूप शांत असते . आम्हीसुद्धा तिथे थोडावेळ पारायण केले .  याच परिसरात स्वामींचे वास्तव्य होते असे नाग मंदिर व औदुम्बर वृक्ष आहेत.

   याच परिसरात दोन मोठे प्रसादालये आहेत इथे हजारो भक्तगण दररोज महाप्रसाद ग्रहण करतात . इतक्या लोकांचा इथे वावर आहे पण इथली स्वछ्ता , शिस्त वाखाणण्याजोगी आहे . कुठेही कचरा, चिखल नाही, पायाचे ठसे नाहीत, भिंतींचे कोने पानाच्या पिचकारीने रंगलेले नाहीत. सेवेकरी ही सगळी सेवा मनोभावे करतात . मंदिर परिसरात आणि बाहेरच्या भक्तनिवासात ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची सोय आहे . तसेच नवजात शिशूंच्या स्तनपानासाठी  स्वतंत्र खोल्या बांधल्या आहेत . 

   ही सगळी व्यवस्था पहायला सेवेकरी आहेत . साधारण २५ ते ४० वयोगटातील पुऱूष वर्ग सेवेकरी म्हणून इथे येतात . महिन्यातले कमीतकमी ५ दिवस सेवेला देतात . प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांचा सेवेसाठी नंबर लागतो . नेट वर कळले की संस्थान कडे असे १७००० हजार सेवेकरी नोंदणीकृत आहेत तसेच अजून खूप जिल्हे आपला नंबर लागावा म्हणून प्रतिक्षेत आहेत . पांढरा सदरा - लेंगा आणि पांढरी गांधी टोपी हा त्यांचा गणवेश आहे . स्वच्छ दाढी केलेले हसतमुख असे हे सेवेकरी भक्ताना मदत तर करतातच तसेच त्याना ठरवून दिलेल्या सेवा पार पाडतात. ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येणार नाहीत . तसेच ते एकमेकांशी सुद्धा गप्पा मारत बसलेले तुम्हाला दिसणार नाहीत . प्रत्येकाने कुठे उभे राहून काय सेवा करायची हे ठरलेले असते आणि हे सेवेकरी ती सेवा मनापासून करतात . 

  दुपारी मंदिरात महाप्रसाद असतो . त्यासाठी सुद्धा रांग असते . एका वेळी हजारो भक्त महा प्रसाद बसून  ग्रहण करू शकतात अशी सोय केलेली आहे . फक्त पानात काही टाकू नये आणि खाऊन झाल्यावर आपले ताट - वाटी उचलून ठेवावे एवढीच अपेक्षा असते . प्रसाद घेउन आम्ही आमच्या भक्तनिवासाकडे निघालो . भक्तनिवास क्र ३ ते ६ च्या प्रांगणातून आनंद विसावा आणि आनंद विहार या भक्तनिवासाकडे जाण्यासाठी संस्थानच्या बस सुटतात . तसेच या प्रांगणात रेल्वे चे वेळापत्रक लावले असून त्या नुसार स्टेशन साठी सुद्धा बस सुटतात . या सर्व बस सेवा भक्तांसाठी विनामूल्य आहेत . बस साठी नीट रांगा लावव्या लागतात.  सेवा भक्तांसाठी फुकट आहे पण संस्थान ला खर्च आहेच म्हणून पूर्ण बस भरल्याशिवाय सोडत नाहीत. बस चे चालक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत . ( साधारण १५-२० मिनिटात बस भरते.) 

   इथे यायचे ठरवल्यापासून आनंद सागर बद्दल खूप ऐकले / वाचले होते . त्यामुळे तिथे जायचेच होते . दुपारी आम्ही आनंद सागर ला जायला निघालो. भक्तनिवासापासून सुमारे ३-४ किमी अंतरावर आनंद सागर आहे . सुमारे ४०० एकरावर हा प्रकल्प वसला आहे . प्रवेश फी ५०/- आहे . प्रत्येकाने बघावाच असे हे ठिकाण आहे . लहान मूलांसाठी तसेच ज्येष्ठ नगरीकांसाठी Wheel chair ची सोय आहे. सुरूवातीलाच 'संत दर्शन ' लागते . महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील संतांच्या संगमरवरातील मूर्ती इथे पहायला मिळतात. आपल्याला फक्त महाराष्ट्रातील संत माहित असतात , इथे इतर राज्यातील संतांबद्दल माहिती मिळते . नंतर पुढे Toy train आहे. Train ने पूर्ण प्रकल्पाला फेरी मारून आणली जाते . नंतर १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळायची सोय आहे . इथले विवेकानंद स्मारक खूप सुंदर आहे. संध्याकाळी ६:३० ला  ते बंद होते म्हणून आम्ही तिकडे निघालो . हे खूप शांत ठिकाण आहे . खास ध्यान करण्याची सोय इथे आहे .  गोड्या पाण्यातील माशांचे मत्सालय पण पहाण्यासारखे आहे . संध्याकाळी ७:०० ते ७:१५ इथे कारंज्यांचा कार्यक्रम असतो . तो सुरू होण्यापूर्वी संस्थान च्या कार्याविषयी माहिती दिली जाते . आनंद सागर मध्येही ठिकठिकाणी अल्पोपहाराची / प्रसाधनगृहांची सोय केलेली आहे. रात्री  ८: ०० ला आनंद सागर बंद होते . 

  दुसर्या दिवशी सकाळी परत एकदा स्वामींचे दर्शन घेतले . गुरूवार असल्यामुळे आज गर्दी होती . बाहेर डिस्प्ले वर समाधी दर्शानाला लागणारा  वेळ ४० मिनिटे दर्शवत होता . स्वामींच्या  तेजस्वी मुद्रेवरून नजर हटत नाही . सारखे तिथेच उभे रहावे असे वाटते . पण गर्दीमुळे ते शक्य नसते . आम्ही ४५ मिनिटात दर्शन घेउन बाहेर आलो. 

 नंतर आम्ही शेगावातील चारधाम करायचे ठरविले. मंदिरापासून जवळ जवळ च आहेत ही ठिकाणे .  पहिल्यांदा लागते ते शितला मातेचे मंदिर. स्वामीना पाटलाच्या मुलानी ऊसाने मारले होते ती ही जागा . याच मुलाना स्वामीनी हाताने ऊस पिळून रस प्यायला दिला.  नंतर स्वामी प्रगट झाले ते स्थान.  मोठ्या महावृक्षाखाली ही जागा आहे . आता पार बांधून काढला आहे . इथेच पहिल्यांदा स्वामीना  उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाताना बंकट्लालने पाहिले होते . नंतर येते ते बंकटलाल यांचे घर.  इथे स्वामींचे वास्तव्य होते . अजून ही वास्तू जपून ठेवली आहे.  इथेच स्वामीनी जानराव देशमुखाना तीर्थ देउन बरे केले . आणि नंतर येते ते हरीहर (महादेव) मंदिर . इथेच टाकळीकर बूवांच्या कीर्तनाचा उत्तारार्ध स्वामींनी पूर्ण केला . तसेच त्यांचा घोडा आणि सुकलालाच्या गायीला स्वामीनी इथेच शांत केले .

 साधारण १०-१२ किमी अंतरावर नागझरी, आकोट , कोडोली , आडगाव ही धार्मिक स्थळे आहेत .

संस्थान ची जागा सोडली तर शेगाव गावाची परिस्थिती फार बेताची आहे. संस्थान ची शिस्त , स्वच्छता बाहेर कुठेही दिसत नाही .  काही  भक्त गण सुद्धा इथल्या शिस्तीला कंटाळा करत होते . प्रत्येक गोष्टीला रांगेत उभे रहावे लागते हा तक्रारीचा सूर असतो . पण ही शिस्त आहे म्हणूनच तिथे अजिबात गडबड / गोंधळ होत नाही . आपण परदेशात गेलो की तिथल्या शिस्तीने / स्वच्छतेने भारावून जातो पण आपल्या देशात सुद्धा आपण हे केले पाहिजे असे आपल्याला वाटत नाही . तसेच शेगाव मधून परतताना इतर धार्मिक ठिकाणी आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा अशी शिस्त हवी असे आपल्याला वाटायला हवे. 

  आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मंदिरात किंवा आनंद सागर मध्ये सगळे फलक मराठी/हिंदीत आहेत ;उगीच इंग्रजीचे कौतूक केलेले नाही. आमची परत निघायची वेळ झाली होती.संध्याकाळी १९:५० ची ट्रेन होती . प्रसाद घेउनच बाहेर पडलो . खरेतर पाय हलत नव्हता . पण इलाज नव्हता . परत इथे यायचेच असा निश्चय करून ,  स्वामींचे स्मरण करत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. 



सोबत शेगाव येथील काही फोटो जोडत आहे




श्रीगजानन महाराज


प्रवेशद्वार- आनंद सागर


संतदर्शन -आनंद सागर
स्वामी विवेकानंद ध्यान मंदिर -आनंद सागर
स्वामींचे प्रकटस्थान
बंकटलाल यांच्या घरातील स्वामींची प्रतिमा
भक्तनिवास सम्पर्क

रेल्वे वेळापत्रक शेगाव

3 comments:

  1. Wah khup chan ...darshan jhalyasarkha watla .

    ReplyDelete
  2. खुप छान माहिती वाचून जाण्याची ईच्छा झाली महाराजांचे आशिर्वाद आपणास लाभो

    ReplyDelete
  3. खुप छान माहिती वाचून जाण्याची ईच्छा झाली महाराजांचे आशिर्वाद आपणास लाभो

    ReplyDelete