Tuesday 19 January 2016

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर.

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर, गाव : "लिंब शेरी " जि .सातारा 


फेसबुकवर बर्याच वेळा या विहिरीबद्दल वाचले होते . फोटो पाहिल्यावरच तिथे जाण्याची इच्छा झाली होती ;काल योग जुळून आला . पुण्याहून सातार्याला जाताना दुसरा टोल नाका ओलांडला ( भुईंज गावाच्या पुढे ) की दोन अडीच किलोमीटर वर डावीकडे "लिंब " गावाची कमान लागते . तिथून ५-६ किलोमीटर वर हे लिंब शेरी गाव आहे . १२ मोटेची विहीर कोणाला विचारले तरी रस्ता दाखवतात . 

ई .स. १६४० ते १६४१  च्या दरम्यान या विहिरीचे बांधकाम श्रीमंत सौ विरूबाई भोसले यांनी करवून घेतले  असे म्हणतात .विहिरीची खोली ११० फूट असून व्यास ५० फूट आहे . ही विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्रा चा  उत्कृष्ट नमुना आहे . खूप विचार करून ही विहीर बांधलेली आहे . आजही विहिरी ला भरपूर पाणी आहे . (विहिरीतले झरे  जिवंत आहेत ). पाणी काढण्यासाठी विहीरीवर १२ मोटेची सोय केलेली होती .आजही त्याचे अवशेष दिसतात  . उपसलेले पाणी सर्वत्र पोहोचवण्यासाठी दगडी हौद बांधले आहेत . 

मुख्य अष्टकोनी विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी एका महाल वजा ईमारतीतून जावे लागते. जमिनीच्या पातळीपासून खाली उतरून या ईमारतीत जाता येते . या पायर्यासुद्धा प्रशस्त, दगडी  आणि आखीव- रेखीव आहेत . खाली गेल्यावर आपण तळमजल्यावर पोहोचतो . तिथून पुढे गेल्यावर मुख्य विहीर लागते . विहिरीत आत उतरण्यासाठी पायर्या  बांधल्या आहेत . तळमजल्यावरून महालाच्या दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत . इंग्रजी एल अक्षराच्या आकारातले ह्या जिन्यातून एकावेळी एकच व्यक्ती वर जावू शकते .  वर गेल्यावर आपण चार खांब असलेल्या महालात पोहोचतो . या महालाच्या छतावर , खांबांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत . या महालातून छतावर येण्यासाठी आणखी एक अरुंद जीना आहे . इथून वर आलो की आपण परत जमीनी च्या पातळीवर येऊन पोहोचतो . वर आलो की प्रशस्त अशी  सिंहासन वजा जागा आणि त्यापुढे बैठक व्यवस्था आहे . त्याकाळी इथे महत्वाच्या बैठका होत असाव्यात . विहिरीच्या तळमजल्याखाली खलबत खाना आहे . त्याकाळी इथे गुप्त मसलती होत असाव्यात . 

विहिरीचे आणि महालाचे बांधकाम हे काळ्या दगडातले असून आजही शाबूत आहे . आज या विहिरीचा उपयोग लहान मुलामुलींना पोहायाल्या शिकवण्यासाठी आणि शेती साठी होतो .

छत्रपतींच्या काळातल्या  अदभूत आणि भव्य असा हा स्थापत्यकलेचा नमुना आजही सरकारकडून उपेक्षितच आहे . आजही या ठिकाणाची माहिती बहुसंख्य लोकाना नाही . त्यामुळे इथे पर्यटकांसाठी कसलीही सोय नाही . गावातले रस्ते कच्चे आहेत . जवळ असलेल्या शेतघरात आमची जेवणाची सोय उत्तम झाली. भाकरी - पिठलं, ताज्या मेथीची भाजी आणि आमटी भात असा मेनू त्या मावशीनी सुंदर बनवला .

कधी कधी वाटते अशी ठिकाणे प्रकाशझोतात नाहीत तेच चांगले . इतर पर्यटनस्थळान्ची विकासाच्या नावाखाली झालेली हानी आठवते . तिथे होणारी पर्यावरणाची हानी ,ऐतिहासिक वास्तूंचे विडंबन , अस्वच्छता , प्लास्टिक चा अमर्याद वापर , पैशाचा बाजार हे सगळे आठवले की इथे लोक पोहोचली नाहीयेत हेच चांगले असे वाटते . परदेशात मात्र छोट्या छोट्या ऐतिहासिक गोष्टीना खूप महत्व देवून पर्यटकांना आकृष्ट केले जाते आणि तिथल्या इतिहासाचे , शौर्याचे , पराक्रमाचे कौतुक केले जाते , ते पाहिले की मात्र मनाला खिन्नता येते . नेपोलियन , अलेक्झांडर यांच्या तोडीस तोड असे आपले पूर्वज होते ; पण त्यांचा पराक्रम सांगायला, दाखवायला आज आमच्याकडे काही नाही . जे अवशेष शिल्लक आहेत ते फक्त पिकनिक स्पॉट झाले आहेत .
अर्थात जे शिल्लक आहे ते जतन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे . आणि त्यासाठी आपल्या समृद्ध अशा वारस्याची जाणीव  असणे गरजेचे आहे .स्वराज्याच्या कालखंडातील ही अदभूत अशी विहीर याच वारस्याची भाग आहे ; प्रत्येकाने एकदातरी पहावी अशीच आहे .

- अनिकेत शेटे , पुणे .

प्रत्यक्ष विहीर .

विहिरी वरील सिंहासन आणि बैठक व्यवस्था .

विहीरीवरचा महाल .

तळमजला .

तळमजला ते विहीर जोडणारा मार्ग 

तळमजल्यावर येण्याचा मार्ग 

तळमजल्या खालील खलबतखाना

विहिरीत उतरण्यासाठी मार्ग 

विहीर, तळमजला आणि महाल 

विहिरीकडे जाण्यासाठी प्रशस्त , रुंद पायर्या 


तळमजल्यावरून वर जाण्यासाठी अरुंद जीना 




Friday 1 January 2016

क्रिष्णप्रिय गोशाळा : गायींचे नंदनवन !

    गायींबद्दल प्रेम , जिव्हाळा असणे त्यातून गोसेवा करायची इछा होवून बर्याच जणानी गोशाळा सुरू केल्याचे आपण ऐकतो . एकेकाळी गायीच्या दूध - तूपाने समृद्ध असलेला आपला देश गायीचा चामड्याचा मोठा निर्यातदार बनला , अधिकाधिक दूधासाठी म्हणजेच त्यातल्या नफ्यासाठी आपण देशी गोवंशाची जर्सी नामक प्राण्याबरोबर संकर करून आपला मूळ देशी गोवंश नासवला . अनियमित पाऊस आणि खतांच्या अमर्याद वापरामुळे जमीनीची नष्ट झालेली उत्पादन क्षमता यामुळे स्वताला अन्नधान्य मिळण्यासाठी माणसाला आज खूप धडपड करावी लागत आहे . अशात देशी गायी साम्भाळणे शेतकर्याला शक्य नाही . मग जाणते अजाणते पणी अशा गायी या कसाया पर्यंत पोचतात आणि चामडी , मांस आणि रक्तासाठी अतिशय कृरपणे या गायींची  हत्या होते . अशा पार्श्वभूमीवर गोशाळा सुरू करून गायीन्चे जीव वाचवणार्यांचे खरच कौतुक आहे .
    पण अशा गोशाळान्मध्ये सुद्धा एका ठराविक काळाने एक व्यावसायिकता येते . अत्तापर्यंत जेवढ्या गोशाळा मी पाहिल्या तिथे हा अनुभव घेतला आहे . एक तर तिथे अपुरी स्वछता असते . गायींची काळजी म्हणावी तशी नीट घेतली जात नाही . रोजचे शेण काढणे , गोमूत्र धरणे , चारा घालणे गायींची स्वछता राखणे ई कामे म्हणावी तश्या जबाबदारीने पार पाडली जात नाहीत . फक्त दूध काढणे आणि ते विकणे यावर सगळे लक्ष दिले जाते .
     पण जिथे वर उल्लेखलेल्या सगळ्या गोष्टी निस्वार्थी भावनेने आणि खरच गोसेवा म्हणून केले जाते अशा एका गोशाळेचे नाव पुढे आले ते म्हणजे किनवट येथील " क्रिष्णप्रिय गोशाळा " . मागच्याच आठवड्यात तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आणि सगळ्या गोष्टींची प्रचिती आली .
     नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरापासून 125  किमी अंतरावर किनवट हे तालुक्याचे ठिकाण आहे . तिथेच ही गोशाळा आहे . समविचारी व्यवसाय बंधूनी आपल्या व्यवसायातील नफ्याचे ठराविक प्रमाण बाजूला काढून तीन वर्षांपूर्वी  हा प्रकल्प चालू केला . आणि दिवसेंदिवस त्याचा पसारा वाढतोय . साधारण एक एकरावर हा प्रकल्प वसला आहे . कृष्णाच्या  एका मोठ्या बासरीरूपी कमानीने गोशाळेत आपले स्वागत होते आणि तिथेच आपण एका वेगळ्या ठिकाणी आल्याचे जाणवते . आत गेल्यावर उजवीकडेच " झुंजवा " गवताची लागवड दिसते . दर वीस दिवसानी हे गवत कापणी योग्य होते . " यशवंत " गवताप्रमाणे त्याला काटे नसतात त्यामुळे ते कापताना आणि खाताना त्रास होत नाही . महाराष्ट्रात हे गवत मिळत नाही . गायींसाठी मुद्दाम वातानुकूलित गाडीतून हे इथे आणले गेले . गोशाळा पहायला येणार्याना हवे असल्यास लागवडीसाठी याचे रोप दिले जाते . पुढे गेल्यावर डावीकडे साई बाबांचे तर उजवीकडे गजानन महाराजंचे मंदीर आहे . दोन मंदिरांच्या मध्ये ही गोशाळा वसली आहे . गोशाळेचे संचालक जयराम कंचरलावार  उत्साहाने गोशाळा दाखवतात . सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही सुदृढ गाय इथे आणली जात नाही . अपंग, अपघात ग्रस्त ,  जखमी , कसयांकडून सोडवलेल्या , अशाच गायी इथे साम्भाळल्या जातात . जयराम सर म्हणतात , गोशाळा हे गायींच्या समस्यांवरील उत्तर नाही . जसे वयोवृद्ध आई वडील सर्व सोयीनीयुक्त अशा वृद्धाश्रमापेक्षा आपल्या मुलाच्या झोपडीत सुखी असतात तसेच गाय ही शेतकर्याकडेच सुखी असते . आणि ती शेतकर्याकडेच राहिली पाहिजे . तिला साम्भाळण्यासाठी शेतकरी सक्षम हवा तर ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण देशी गायीच्या दूधाचा आग्रह धरला पाहिजे ,  पंचगव्य उत्पादने वापरली पाहिजेत जेणेकरून देशी गाय जगेल , वाढेल .
    इथे गायींसाठी विविध कक्ष उभारले आहेत जसे की अपंग कक्ष , अंध कक्ष , प्रसुति कक्ष , अतिदक्षता विभाग . प्रत्येक कक्षात पिण्याच्या पाण्याच्या सिमेंट च्या टाक्या बसवल्या आहेत . दर बुधवारी या टाक्याना आतून - बाहेरून चूना लावण्यात येतो. त्यामुळे पाणी पितानाच गायीची कॅल्शियम ची गरज भागते तसेच टाक्यान्मध्ये शेवाळ साचत नाही . इथे येणार्या गायी मुख्यत: आजारी किंवा जखमी असतात म्हणून त्याना बरे वाटावे म्हणून इथे रोज बासरीचे संगीत वाजवले  जाते . उपचार पध्द्तीचा भाग आहे तो . तसेच गोशाळेत जास्तीतजास्त ठिकाणी तुळशीची लागवड केलेली आहे . तुळस ही एकमेव अशी वनस्पती आहे की जी 24 तास प्राणवायू सोडते . म्हणून आजारी गायींसाठी तिची इथे जास्त लागवड केलेली आहे .
गोशाळेचे वातावरण शुद्ध रहावे म्हणून  इथे रोज दोन वेळा गायीच्या गोवर्या वापरून अग्निहोत्र केले जाते . गोशाळेत पिम्पळ , वड , औदुम्बर , शमी अशा महावृक्षांची लागवड केली आहे जेणेकरून या महावृक्षांची छाया गायीना मिळेल .
    गायींसाठी ज्या शेड बांधल्या आहेत त्या अतिशय कमी खर्चातल्या पण टिकावू असून हव्या तेव्हा मोकळ्या करता येण्यासारख्या ( dismental) आहेत . उद्या एखादी शेड हलवायची झाल्यास ते सोपे जावे हा उद्देश . या शेडची वरची रचना पिरॅमिड सारखी असून उन्हामुळे गरम झालेली हवा मधल्या शंकूच्या आकारातल्या पोकळीमध्ये रहाते आणि खाली गायीभोवती थंड हवाच खेळती रहाते . या शेड वर वेली सुद्धा लावण्यात आल्या आहेत जेणेकरून वरील तापमान थंड राहील आणि पावसात पाण्याचा तडतडण्याच्या आवाजाचा त्रास गायीला होणार नाही .
    गायीना रोज सुका आणि ओला खुराक दिला जातो . यामध्ये गव्हाचा गोंढळा, सोयाबीन , तूरीचा कूटा आणि झुंझवा गवत दिले जाते . चार्यामध्ये सैंधव मीठाचे दगड ठेवले जातात जेणेकरून गायीला खाताना चव येइल आणि ती जास्त खाईल व जास्त पाणी पिले जाईल .
    इथे कायम स्वरूपी रहाणारा कर्मचारी वर्ग आहे . त्याना रहाण्याची सोय केलेली आहे . गोशाळेच्या बायोगॅस मधून त्याना मोफत गॅस पुरवला जातो . त्यांची मोबाईलची बिले सुद्धा गोशाळाच भरते . दर महिन्याला ठराविक प्रमाणात गोमूत्र धरणे आणि शेणाच्या गोवर्या थापणे त्याना बंधनकारक आहे पण हे प्रमाणाचे आकडे खूपच कमी आहेत .
    गोशाळेतली एकही गोष्ट विकली जात नाही . अगदी दूध सुद्धा . दूधावर पूर्ण हक्क हा वासरांचाच असे मानले जाते . शेण आणि गोमूत्र कोणी मागितले तर कुठल्याही मोवदल्याची अपेक्षा न ठेवता ते दिले जाते . रोज सकाळी ताजे गोमूत्र धरून पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते . गावातली माणसे रोज गोमूत्र पिण्यासाठी इथे येतात . आज तीन वर्षात एकदाही गोशाळेने गायींसाठी चारा विकत आणलेला नाही की कोणाकडे देणगीची अपेक्षा केलेली नाही . सगळी गोमातेची कृपा आहे असे जयराम सर सांगतात . गोप्रेमीनी स्वता: हून काही देउ केले तर मात्र ते स्वीकारले जाते .
    जखमी गायींसाठी कॉट तयात केलेल्या आहेत . जर एखादी गाय उठू शकत नसेल तर तिच्या शेण आणि गोमूत्रामुळे तिच्या त्वचेला जखमा होवू नयेत याची विषेश काळजी घेतली जाते . अशा गायीना डासांचा त्रास होवू नये म्हणून मछर दाणीची सुद्धा सोय आहे . अशा गायीन्चे हातपाय मोकळे व्हावेत म्हणून विषेश पाळणा तयार करून घेतला आहे . अपघातग्रस्त  गायीला गोशाळेत आणण्यासाठी ट्रॅक्टरला जोडता येइल अशी लिफ्ट बनवली आहे . सगळ्या गायीना दर अमावास्या / पौर्णिमेला आंघोळ घातली जाते . तश्या शॉवर ची सोय केलेली आहे . एखाद्या गायीचा मृत्यू झाल्यास तिला हिरव्या साडीत गुंडाळून खड्यात पुरले जाते आणि तिथे तिची आठवण म्हणून एक झाड लावले जाते .
    या गोशाळेचा आराखडा ज्यानी बनवला ते आर्किटेक्ट रुपेन भाईंशी सुद्धा बोलण्याचा योग आला . गुजरातच्या राजघराण्यात जन्म घेतलेल्या या माणसाने आपल्या  वडिलोपार्जित सम्पत्तीचा , मानमरातबाला राम राम करून स्वताच्या गुणवत्तेवर नाव कमावले . याना जेव्हा या आराखड्याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले की पूर्वी झाडे, नद्या , नाले , पर्वत सगळा निसर्ग माणसाशी बोलायचा . आजही बोलतो पण माणसाला ते ऐकायला वेळ नाहीये . मी ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. इथे जेव्हा मला काम करण्यासाठी बोलावले गेले तेव्हा खूप वेळ या जागी मी एकटा बसून इथल्या निसर्गाशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो . इथल्या गायीना काय हवे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो . आणि त्यानंतर हा आराखडा मला सुचला . त्यांच्या या बोलण्याचा प्रत्यय ही गोशाळा बघताना येतो . आपण वास्तूशास्त्राप्रमाणे घरात ईशान्य कोपरा हा देवघरासाठी योग्य समजतो. रुपेन भाईनी ईशान्य कोपर्यात अतिदक्षता विभाग ठेवला आहे . देवाच्या दिशेला आजारी गायीना ठेवल्याने त्या बर्या होण्याचे प्रमाण इतर दिशांपेक्षा जास्त आहे असा रुपेन भाईंचा अनुभव आहे . दुसरी त्यानी केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे इथले वीटांचे फ्लोअरिंग . पूर्ण गोशाळेत वीटांची जाडी बाजू वर येइल असे फ्लोअरिंग केले आहे . आणि हे फ्लोअरिंग फक्त  माती भरून घट्ट केले  आहे . नंतर त्यावर गोमूत्र आणि शेण पडून या वीटा  आणखी घट्ट झाल्या आहेत . याचे कारण सांगताना रुपेन भाई सांगतात ; टाईल्स किंवा पेवर ब्लॉक्स चे फ्लोअरिंग केले तर गायीचे पाउल नैसर्गिक पद्धतीने जमीनीवर टेकत नाही . त्याला एक प्रकारचा वाकडेपणा येतो आणि गायीला त्याचा त्रास होतो . शिवाय यामुळे तिचे पायाचे खूर सुद्धा वाढतात . वीटांच्या अशा फ्लोअरिंग मुळे गायीला चालताना एक नैसर्गिक ग्रिप मिळते . एवढा विचार या माणसाने काम करताना केलेला आहे .
    या सम्पूर्ण गोशाळेत सी सी टीव्ही कॅमेरे लावलेले आहेत . प्रत्येक गायीला एक नम्बर देण्यात आलेला आहे .जयराम सर आपल्या मोबाईल वर हवे तेव्हा गोशाळा बघू शकतात . एवढे सगळे असून आपण काही वेगळे केले आहे असा अजिबात भाव इथे कोणाच्यातच दिसत नाही . अतिशय उत्साहाने ते गोशाळा दाखवतात , सुधारणा सुचवायची विनंती करतात . काही शंका विचारल्यास त्याचीही उत्तरे देतात .किनवट गावात गोशाळेचे विविध उपक्रम चालतात . गावात पाच  - सहा ठिकाणी गोशाळेने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत . नवरात्रीमध्ये जवळच असलेल्या माहूर गडावर गोशाळेतर्फे अखंड नऊ दिवस महाप्रसाद असतो . तिथे रोज पंचवीस ते तीस हजार पान उठते . गोशाळेत यापुढे वेदशाळा आणि अंथरूणावर खिळलेल्या रूग्णांसाठी छोटे हॉस्पिटल बांधण्याचे नियोजन आहे .
    आज महाराष्ट्रात माझ्या माहितीत गायींचा एवढा विचार करून काळजी घेणारी दुसरी गोशाळा नसावी . " क्रिष्णप्रिय गोशाळा " एक रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे . या क्षेत्रात काम करणार्यानी / करू इछिणार्यानी एकदातरी इथे भेट द्यावी . आणि आपण सगळ्यानी गायीच्या दूधाचा , पंचगव्य उत्पादनांचा आग्रह धरून वापर वाढवावा म्हणजे गोवंश टिकेल आणि जयराम सरांच्या म्हणण्याप्रमाणे गोशाळेची गरज भासणार नाही . ( म्हणजे प्रत्येक घरात गाय असेल !) -- अनिकेत शेटे , पुणे