Monday 1 March 2021

माझी शाळा | शताब्दी वर्ष

#माझीशाळा #फाटकहायस्कूल 

       नव्या नोकरीतल्या सहकार्यांकडून आईला रत्नागिरीतील तेव्हाच्या प्रसिद्ध शाळांची नावे कळली. आणि त्यापैकी एका शाळेत मला प्रवेश मिळावा यासाठी नोकरी सांभाळून आईची धडपड चालू होती. एका प्रसिध्द शाळेने आमची कौटूंबिक परिस्थिती बघून ( चारचौघांसाऱखी  कौटूंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे) मला प्रवेश नाकारला होता.  त्यामुळे आई काळजीत होती. बालवाडीचे पहिले वर्ष असेच १-२ शाळेत गेले आणि बालवाडीच्या दुसऱ्या वर्षात मात्र मला 'फाटक हायस्कूल' मध्ये ( प्राथमिक शाळेचे नाव वेगळे आहे ) प्रवेश मिळाला. 
       घरात मला सांभाळण्यासाठी आणि शाळेत पोहोचवण्यासाठी कोणी नाही म्हणून माझ्या आईने शाळेजवळ फ्लॅट घेतला. सकाळी १० वाजले की आई नोकरीवर जाताना  मला घराजवळच्या पतित पावन मंदिरात सोडायची. शाळेची वेळ होइपर्यंत मी मंदिराच्या आवारात रहायचो. वेळ झाली की रस्ता ओलांडून शाळेत जायचो. शाळा सुटली की परत मंदिरात मग तिथे आई नोकरीवरून  आली की तिच्याबरोबर घरी. 
त्यामुळे शाळा , शाळेतले शिक्षक , मित्र , पतित पावन मंदिराच्या आवारातले रहिवासी आणि जवळच असलेले  'जनसेवा ग्रंथालय ' हेच माझे जग होते. आणि या सगळ्यानी माझे बालपण समृद्ध केले. सगळे शिक्षक चांगले भेटले. सर्वांची नावे आठवत नाहीत आणि सर्वांची नावे  लिहिणे शक्यही नाही. प्राथमिक शाळेच्या भावे बाई , घाणेकर बाई , रायकर बाई , नारकर सर , हायस्कूल मधल्या खांचे बाई , नितीन गावकर सर , शेट्ये बाई , प्रभुदेसाई बाई , परीट सर , टिकेकर सर , देवऱूखकर सर , सावर्डेकर सर , कीर सर , भाट्ये सर , सावंत सर , गोगटे सर , भाताडे सर , श्रीखंडे बाई , बोपर्डीकर बाई , मुळ्ये बाई सर्वांची आठवण येते. त्यांच्या तासाच्या गमती जमती  आठवतात. मैदानावरचे खेळ आठवतात. NCC चे भिवरे सर आणि NCC ची दोन वर्षे आठवतात. पांढरे शुभ्र कपडे घालून केलेली दर शनिवार - रविवार ची परेड आठवते. सगळ्या सहली आठवतात. दहावी पर्यंत मी एकही शालेय सहल चुकवली नाही.  २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट साठीची लेझीम ची प्रॅक्टिस आठवते. या शाळेने खूप काही दिले. सगळे शब्दात मांडणे कठीण आहे. 
     आज जो काही मी आहे , जसं आयुष्य जगतोय त्याचे सारे क्रेडिट या शाळेचे , तिथल्या शिक्षकांचे , पतित पावन मंदिरातल्या भगवान लक्ष्मी नारायणाचे आणि तेथील  रहिवाश्यांचे ( त्यानी मला आणि माझ्या आईला प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे खूप आधार दिला ; खरतरं हा स्वतंत्र पोस्ट चा विषय आहे  ) आणि जनसेवा ग्रंथालयातील पुस्तकांचे आहे. चौथी पासून रत्नागिरीतून बाहेर पडेपर्यंत या वाचनालयात मी जायचो. या वाचनानेच माझे वैचारिक जग बदलत गेले.

     आजपासून शाळेचे शताब्दी वर्ष सुरू होतेय. (स्थापना ०१ मार्च १९२२) गुरूवर्य कै. फाटक सर यांच्या संकल्पामुळे शाळा उभी राहिली आणि वटवृक्षाप्रमाणे वाढत जाताना आज वयाची शंभरी गाठतेय.  ज्ञानदानाचे  कार्य हे अभिनव कार्य आहे ते असेच या वास्तूतून अव्याहत पणे येणाऱ्या काळात चालू राहूदे. आणि त्याद्वारे आमच्या सारख्या असंख्य  मातीच्या गोळ्याना योग्य तो आकार मिळू दे या सदिच्छा! 

     लहानपणी आईबरोबर बालवाडीतल्या प्रवेशासाठी गेलेलो असताना ज्या सरानी / बाईनी माझा interview घेतला आणि मला प्रवेश दिला त्यांच्यापासून दहावीचा रीझल्ट काढून देणाऱ्या क्लार्क पर्यंत ज्यानी ज्यानी माझे चांगलेच योजले आणि त्यासाठी आपल्या आयुष्यातील वेळ दिला त्या सर्वांच्या चरणी मनापासून कृतज्ञता. 

- अनिकेत शेटे ( दहावी- अ - २००२ बॅच )
*#माझी_शाळा #फाटक_हायस्कूल #शताब्दी_वर्ष*
Image sources: Facebook groups