Showing posts with label Tourism. Show all posts
Showing posts with label Tourism. Show all posts

Thursday, 15 July 2021

अमृतसर भाग १

अमृतसर डायरी # भाग १

जानेवारी २०२०

माझ्याबद्दल थोडेसे :
मला कधीच टूर ऑपरेटर्स बरोबर फिरायला जायला आवड्त नाही. त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे फिरायचे , ते देतील ते खायचे , त्यांच्या वेळा पाळायच्या , ते देतील त्या हॉटेल मध्ये रहायचे , लौकिक अर्थाने जे प्रसिद्ध आहे ते घाई घाईमध्ये पहायचे आणि घरी यायचे. आणि यासाठी भरपूर पैसे मोजायचे हे मनाला पटत नाही. त्यामुळे माझ्या ट्रिपस मलाच arrange करायला आवड्तात. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे वेळेचे नियोजन करता येते. एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबावेसे वाटले तर थांबू शकतो. जिथे हवे तिथे राहू - खाऊ शकतो. हव्या त्या पर्यायाने प्रवास करू शकतो आणि यात मला भरपूर मजा येते . यात पैशांची सुद्धा बचत होते. फिरायला गेल्यावर प्रत्यक्ष फिरण्यात म्हणजे प्रवासखर्च , entry tickets, तिथले लोकल खाणे पिणे यावर खर्च करायला मी अजिबात मागेपुढे पहात नाही पण फिरायला गेल्यावर मला महागड्या हॉटेल वर खर्च करणे पटत नाही. 2star , 3star हॉटेल्स मध्ये जाऊन रहाणे म्हणजे निव्वळ पैसा फुकट घालवणे आहे . रात्रीची शांत झोप आणि सकाळचे प्रातर्विधी हे सोडून आपण त्या खोलीचा काहीही वापर करत नाही मग भरमसाठ भाड्याच्या खोल्या कशाला हव्यात ? टूऱ ऑपरेटर बरोबर जायचे म्हणजे या रहाण्यावर खूप खर्च केलेला असतो .त्यामुळे साधा homestay, किंवा धर्मशाळा असली तरी मला चालते फक्त रहाण्याचे ठिकाण सुरक्षित पाहिजे . पैसे वाचवायचे म्हणून कुठेही राहून चालत नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात कुठेही 2star, 3star हॉटेल बूक केले तर तिथले वातावरण हे सारखेच असते. पण आपण धर्मशाळा , homestay, किंवा छोटी हॉटेल्स try केली तर तिथले वातावरण वेगवेगळे असते. त्या त्या राज्यातील संस्कृतीचा फील असतो.

पंजाब प्रवासाची तयारी :

माझी देशातील बर्यापैकी राज्ये फिरून झाली आहेत . पण पंजाब चा योग अजून आला नव्हता. लहानपणी हरितक्रांती मुळे भूगोलातून या राज्याची ओळख झाली. नंतर चित्रपट , शीख समुदाय बहुसंख्य असलेले राज्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारत पाक सीमेवरचे राज्य म्हणून पंजाब बद्दल उत्सुकता होती. आणि बरेच दिवसात लांब कुठे गेलो नव्हतो म्हणून पंजाब ला जायचे नक्की केले. पंजाब राज्य मोठे आहे आणि बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत ; पण माझ्याकडे जास्ती दिवस नसल्यामुळे यावेळी मी फक्त अमृतसर लाच जायचे ठरवले . अटारी बॉर्डर चा बीटिंग रीट्रीट चा कार्यक्रम आणि सुवर्णमंदिर हे खास आकर्षण होते माझ्यासाठी. आई आणि मी असे दोघेच जाणार होतो .

#पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे तिकीट बुकिंग:

फक्त अमृतसर ला जायचे असल्यामुळे पुणे ते अमृतसर आणि अमृतसर ते पुणे अश्या प्रवासाचे नियोजन करायचे होते. वेगवेगळे ट्रॅव्हल ब्लॉग्स , ट्रिप ॲडवासर यावर माहिती घेउन मी अमृतसर मधील प्रेक्षणीय स्थळांची यादी काढली. बऱ्याच जणानी अमृतसर ला फिरायला दोन दिवस पुष्कळ झाले असे लिहिले होते. मी काढलेली प्रेक्षणीय स्थळांची यादी आणि त्या ठिकाणांचे सुवर्णमंदिर पासूनचे अंतर मी गूगल मॅप वर पाहून लिहून काढले आणि प्रत्येक दिवशी आपण साधारण किती ठिकाणे करू शकतो याचा अंदाज बांधला आणि तीन दिवसांचा प्लॅन ( itinary) तयार केला यात आणखी एक दिवस जास्तीचा ठेवला कारण माझ्या सोबत आई असणार होती. अमृतसरच्या थंडीत तिला adjust व्हायला एक दिवस लागू शकतो किंवा अटारी बॉर्डर च्या कार्यक्रमात जर सरकार कडून / सैन्याकडून ऐनवेळी काही बदल झाला ( अभिनंदन वर्थमान ला परत आणायच्या दिवशी बिटिंग रीट्रीट चा कार्यक्रम रद्द केला होता ; सामान्य नागरीकाना त्यादिवशी तिथे प्रवेश नव्हता )तर एक दिवस राखीव ठेवला होता. असे प्रवास सोडून 3+1=4 दिवसांचे नियोजन मी केले . जर या जास्तीच्या दिवसाची गरज लागली नाही तर त्यादिवशी कुठे फिरायचे ह्याचे पण नियोजन केले .

पुणे ते अमृतसर अशी डायरेक्ट ट्रेन नाहीये . पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमृतसर असा ब्रेक जर्नी केला तर साधारण ३६ ते ३८ तासांचा प्रवास आहे .
आई सोबत असल्यामुळे मला ट्रेन चा प्रवास टाळायचा होता . एवढा ट्रेनचा प्रवास केल्यावर परत तिथे कमी तापमानात फिरायचे होते. म्हणून मी विमान प्रवास करायचे ठरवले. पण पुणे ते अमृतसर डायरेक्ट फ्लाईट पण नाहीये. मुबंईहून डायरेक्ट फ्लाईट आहे. पण ती सकाळी १०:३० ची आहे म्हणजे त्यासाठी पहाटे लवकर पुण्यातून निघावे लागणार होते. म्हणून मी पुणे ते दिल्ली असा विमानप्रवास करायचा ठरवले. पुण्याहून दुपारी १:३० चे डायरेक्ट विमान आहे ते ०३:४५ ला दिल्लील पोहोचते आणि दिल्लीतून संध्याकाळी ७ ला अमृतसरसाठी ट्रेन आहे . मुम्बई सेंट्रल ते अमृतसर अशी ट्रेन आहे( Train no : 02903) ती संध्याकाळी ७ ला दिल्लीत पोहोचते . तिची तिकीटे मी काढली. येताना पण अमृतसर ते दिल्ली ट्रेन आणि दिली ते पुणे असा विमानप्रवासाची तिकिटे काढली.
हे बूकिंग मी Oct 2019 मध्ये केले आणि प्रवासासाठी Jan 2020 चा पहिला आठवडा निवडला. कारण नोव्हेंबर- डिसेंबर हे थंडीचे महिने टाळायचे होते . तसेच या महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे बरेच पर्यटक बाहेर पडतात. त्यामुळे सगळीकडे गर्दी असते. सगळीकडे दर जास्त असतात पण जानेवारी मध्ये नाताळ ची सुट्टी संपून शाळा सुरू झालेल्या असतात , थंडी थोडी अवाक्यात असते आणि सीझन संपल्यामुळे रिक्षावाले , लॉजवाले बार्गेनिंग च्या मूड मध्ये असतात . आणि आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात छान होते.

# प्रवासाची तयारी :
प्रवासाच्या तयारीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तिथल्या थंडीचा अन्दाज बांधणे. नेट वरून गेल्या २-३ वर्षांचा हवामानाचा trend बघितला आणि प्रत्येकी हातमोजे , पायमोजे, शाली २ जोड , आणि प्रत्येकी एक स्वेटर घेतला. जानेवारी मध्ये हवामान ३° ते ६ ° च्या आसपास असते .
थोड्र सुके खाणे बरोबर घेतले. एक मोठी बॅग check in luggage मध्ये आणि एक सॅक cabin baggage मध्ये घेतली. क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , ट्रेन ची तिकिटे सर्व सोबत घेतले.
अमृतसर ला उतरायचे कुठे हा प्रश्न होता. नेट वरून एवढे समजले होते की शहर फार मोठे नाहीये. आणि सुवर्ण मंदिरापासून बाकीचे spot जवळ आहेत . मग सुवर्ण मंदिराजवळ च रहायचे मी ठरवले. नेट वर सुवर्ण मंदिराच्या भक्त निवासाबद्दल समजले. तिथले बूकिंग online करता येते . ( www.sgpcsarai.com
) भक्त निवास ला तेथे सराई म्हणतात. पण हे online booking फक्त दोन दिवसांसाठीच मिळते. परत वाढवून मिळते का ते माहित नव्हते. आणि त्यावेळी पाच जणांच्या rooms उपलब्ध होत्या. ज्याची मला गरज नव्हती. त्यामुळे मी काही online booking केले नाही. इथले check in time 1300 hrs & check out time 1200 hrs(noon) आहे . त्याबाबतीत इथे शिस्त आहे. वेळ मागेपुढे झाली तर पूर्ण दिवसाचा charge द्यावा लागतो . आणि इथे फक्त कुटुंब आणि विवाहित जोडप्यानाच जागा देतात .
याशिवाय private rooms देणारे सुद्धा बरेच आहेत. नेट वर सगळी माहिती आहे. room मिळायला अडचण येणार नाही हे कळल्यावर मी तिथे जाऊनच room घ्यायचा विचार केला. क्रमश:

Wednesday, 19 December 2018

तिरूमला - तिरूपती

नमस्कार!

मी नुकताच तिरूपतीला जाऊन आलो . तिथल्या सोयी , दर्शन आणि रहाणे याबद्दलची माहिती येथे देत आहे .

*तिरूमला - तिरूपती*

१) तिरूमला हे टेकडीवर असून तिथे मुख्य बालाजीचे मंदिर आहे . तिरूपती हे खाली असून ते रेल्वे आणि विमान सेवेने connected आहे . तिरूपती पासून दहा किमी वर रेणिगुंटा नावाचे रेल्वे स्टेशन आहे . काही रेल्वे या तिरूपतीला न थांबता रेणिगुंट्याला सुद्धा थांबतात . ऱेल्वे बूकिंग करताना तिरूपती स्टेशन ( station code: TPTY) सापडले नाही तर रेणिगुंटा ( station Code: RU) पहावे. 

२) मुंबई हून तिरुपतीसाठी रोज 03:45 PM ला CSMT- kanyakumari express सुटते ती दुसऱ्या दिवशी दुपारी 3:10 ला तिरूपतीला पोचते . परतीच्या प्रवासाला हीच गाडी पहाटे 3:15 ला तिरूपतीवरून सुटते . दुसरी chennai - CSMT एक गाडी रेणिगुंट्याला दुपारी 3:00 ला सुटते . ही पण सोयीची गाडी आहे . बालाजी दर्शनानंतर कोल्हापूर ला महालक्ष्मी दर्शनाला जायची पद्धत आहे . त्यासाठी रोज रात्री 9:00 वाजता तिरूपतीहून ' Haripriya Express ' सुटते . दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:35 ला कोल्हापूर ला पोचते .

3) तिरूपती स्टेशन पासून तिरूपती बस स्टॅंड जवळ आहे . (1.5km). या स्टॅंड च्या जवळ " श्रीनिवासम " ही तिरूमला - तिरूपती देवस्थानम ( यापुढे TTD) ची भव्य पाच मजली इमारत आहे . ( Lift आहे. ) इथे भक्ताना उतरण्याची सगळी सोय आहे . 200 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत रोज याप्रमाणे खोल्या उपलब्ध आहेत . 200 रूपयांच्या खोलीत दोन मोठे  बेड आणि शिवाय दोन माणसे खाली झोपतील एवढी जागा आहे . शिवाय Toilet- bath attached आहे . या खोल्या 24 hrs checkout basis वर मिळतात. पहिल्या 24 तासानंतर आपण परत पुढले 24 तासांसाठी वाढवून घेउ शकतो . त्यापुढे मात्र valid reason असेल तरच मुदत वाढवून मिळते . या खोल्या आपण घरातून online सुद्धा book करू शकतो . पण त्या सहजासहजी मिळत नाहीत . म्हणून इथे current booking ला सतत गर्दी असते . पण रांगेत 2 ते  2:30 तास थांबायची तयारी असेल तर इथे नक्की रूम मिळते . पण समजा इथे रूम नाही मिळाली तर बाहेर शहरात खूप लॉज आहेत . तसेच श्रीनिवासम मध्येच common  dormitory आहे जिथे आपण निवांतपणे राहू शकतो. इथे 7-8 मोठे सामायिक हॉल आहेत. तसेच आपले सामान ठेवायला मोफत लॉकर्स उपलब्ध आहेत. सगळीकडे CC TV Cameras आहेत त्यामुळे सुरक्षितता आहे . प्यायचे पाणी (RO Purified), सार्वजनिक स्वछ्तागृहे (जी स्वछ आहेत) तर खूप आहेत . मोबाईल चार्जर पॉईंट्स पण जागोजागी आहेत. एखाद्या वेळी रूम नाही मिळाली तरी इथे रहायला काहीच अडचण नाही. याच इमारतीत ATM , Xerox, General stores, Post office, Union Bank of India, Andhra Bank, Canara Bank, Air India office ची सुविधा देखील आहे. 
TTD च्या खोल्या अविवाहीत लोकाना (एकट्यासाठी)आणि अविवाहीत जोडप्याना मिळत नाहीत .
याशिवाय तिरूमला ला सुद्धा रहाण्यासाठी TTD च्या खोल्या मिळतात त्याबद्दल नंतर कधीतरी लिहिन . 

४) रहाण्याची सोय झाली की अर्धे काम झाले नंतर राहाते ते बालाजीच्या मुख्य दर्शनाची सोय करणे. या दर्शनाची तिकीटांचे तीन प्रकार आहेत. *तिकीट काढण्यासाठी , रूम बूक करण्यासाठी तसेच लॉकर्स बूक करण्यासाठी आधार कार्ड जवळ असणे गरजेचे आहे.*

अ ) *सर्वदर्शन* : हे फुकट दर्शन आहे. (तरी याचे तिकीट घ्यावे लागते) हे तिकीट श्रीनिवासम मध्ये मिळते तसेच वर तिरूमला मध्ये सुद्धा मिळते. तिरूपती शहरात आणखी 4-5 ठिकाणी याची टिकीटे मिळतात .हे दर्शन फुकट असल्यामुळे याची तिरूमला येथील  रांग खूप मोठी असते आणि रांगेत उभे राहिल्यापासून दर्शन मिळेपर्यंत कमीत कमी 2:30 तास ते जास्तीत जास्त कितीही वेळ लागू शकतो . हे दर्शन घेणाऱ्यांना मोफत प्रसादाचे लाडू मिळत नाहीत . 
ब) *दिव्य दर्शनम* : काहीजण बालाजीचे दर्शन हे आलिपारी किंवा श्रिवारी पेट्टू चढून चालत करतात. त्यांच्यासाठी ही मोफत दर्शनाची तिकीटे आहेत. स्टेशन पासून या टेकड्यांपर्यंत मोफत बस सेवा, मोफत लॉकर सेवा, मोफत रहाण्याची सेवा या भाविकाना देण्यात येते .
क) *स्पेशल एंट्री दर्शनम* : हे प्रती व्यक्ती 300 रूपयांचे तिकीट असून online book करता येते . श्रीनिवासम मध्ये सुद्धा मिळते पण त्यासाठी खूप रांग असते . या मध्ये दर्शनाला उभे राहिलो तर कमीतकमी 45 मिनीटे ते जास्तीतजास्त 2-2:30 तासात दर्शन होते ( गर्दी वर अवलंबून ). या तिकीटावर प्रत्येक व्यक्तीसाठी प्रसादाचे  दोन मोफत लाडू मिळतात . 
ड) *स्पेशल एंट्री दर्शनम* ( अपंग आणि वयस्कर व्यक्ती ६५ वयाच्या पुढील ) : हे सुद्धा मोफत दर्शन असून सकाळी 7 वाजता ही तिकिटे तिरूमलालाच मिळतात . सुमारे 1400 तिकीटे रोज वितरीत होतात . 

५) प्रसादाचे लाडू : बालाजीचे  दर्शन झाल्यावर शेजारीच लाडू विकत घेण्यासाठी च्या कूपन विक्रीसाठी रांग असते . इथे प्रत्येक व्यक्ती 2 ते 10 लाडू विकत घेउ शकतो . प्रत्येक लाडवाची किम्मत 50/- आहे . हे कूपन घेतल्यावर आपले जर स्पेशल एंट्री चे तिकीट  असेल तर त्यावरील लाडू घेण्यासाठी लाडू counter वर जाऊन लाडू घेता येतात . लाडवांसाठी प्लॅस्टिक पिशवी 10/- ला मिळते आणि त्याची वेगळी रांग असते त्यामुळे आपली पिशवी जवळ बाळगणे उत्तम . (रांगेचा वेळ वाचतो)

६) ड्रेस कोड : स्त्रिया : साडी , पंजाबी ड्रेस चालतो.
शर्ट- पॅंट , लेगिंग्स , व्ही कट , लो कट चे टॉप्स चालत नाहीत . स्लीव्हलेस , बॅकलेस चालत नाहीत . अंगभर व्यवस्थित कपडे हवेत.
पुरूष : कुर्ता / पायजमा , पूर्ण शर्ट पॅंट चालतो . स्पेशल एंट्री चे दर्शन असेल तर पुरूषाना धोतर बंधनकारक आहे . हे धोतर महाराष्ट्रीयन पद्धतीने नेसले तरी चालते किंवा दक्षिण भारतीय पद्धतीने लुंगीसारखे नेसले तरी चालते.

७) दर्शनाच्या वेळी आपल्याकडे मोबाईल , कॅमेरा किंवा इतर ईलेक्ट्रॉनिक वस्तू असता कामा नये . या सगळ्या वस्तू आणि आपल्याकडे काही इतर सामान असेल तसेच आपल्या चपला या बाहेर काउंटर वर जमा कराव्या लागतात . त्याचा बार कोड असलेला बिल्ला आपल्याला मिळतो . दर्शन घेउन बाहेर आल्यावर तो दाखवला की आपले सामान परत मिळते . दर्शनाच्या रांगेची सोय ही खूप प्रशस्त आहे . वाटेत मध्ये मध्ये बसायची सोय आहे , प्यायचे पाणी , स्वछ्तागृहे ही वाटेत आहेत . त्यामुळे लहान मुले , स्त्रिया , वयस्कर माणसे यांचे हाल होत नाहीत . दर्शनाच्या रांगेत स्त्रिया आपली पर्स आत नेउ शकतात . पण तिचे सुद्धा चेकींग होते . बॅटरी , नेलकटर , सुरी- चाकू चालत नाही .

८) तिरूपती हून तिरूमला ला जायला आंध्रप्रदेश सरकारच्या बसेस आहेत . सतत असतात. श्रीनिवासम मधून बाहेर रस्त्यावर आलो की या बस मिळतात . 55/- तिकीट आहे . ( 18Kms) 
परतीचे पण काढू शकतो . ते तीन दिवस ग्राह्य असते . घाटात वाटेत सर्व गाड्यांचे चेकींग होते . आपले सामान घेउन आपण खाली उतरायचे आणि electronic scanner मध्ये scan करून घ्यायचे आणि परत आपल्या गाडीत बसायचे . तिरूमला ला पोचल्यावर सगळे महत्वाचे बोर्ड इंग्रजीमध्ये आहेत. आपले ज्या दर्शनाचे टिकीट असेल त्या प्रमाणे रांगेत जावे आत गेल्यावरच सामान आणि मोबाईल ठेवायचे काउंटर आहेत . केस कापून अर्पण करायचे  असतील तर त्याची वेगळी जागा आहे . स्त्रियांचे केस कापायला आता TTD ने स्त्रिया ठेवल्या आहेत . केस कापून झाल्यावर आंघोळीची सोय आहे . आंघोळ झाल्यावर दर्शनाच्या रांगेत उभे रहायचे आहे .

९) मुख्य दर्शन झाल्यावर आधी प्रसादाचे लाडू ताब्यात घ्यावेत . कारण लाडू विकत घेणार असाल तर त्याच्या कूपन ची वैधता केवळ तीन तास असते . लाडू घेउन झाल्यावर अन्न- प्रसादम घ्यावा . अन्न म्हणजे भात . भाताचा प्रसाद . या प्रसादासाठी एक मोठी इमारत आहे . प्रसाद घेउन झाल्यावर आपले मोबाईल ताब्यात घेण्यासाठी परत काउंटर वर  यावे . मुख्य मंदिरापासून ही अंतरे थोडी लांब आहेत .यासाठी TTD ने मोफत बस सेवा पुरवली आहे . दर ५-१० मिनिटानी ही भगव्या रंगाची बस येते . त्यात दरवाज्यामध्ये एक conductor असतो त्याला आपण  कुठे उतरायचे ते सांगावे म्हणजे तो गाडी थांबवतो .

१०) मुख्य दर्शन झाल्यावर तिरूमला टेकडीवर पाच महत्वाची पौराणिक ठिकाणे आहेत . ती पाहू शकतो . यात पापविनाशनम झरा , आकाशगंगा, वेणूगोपाल स्वामी मंदिर , शीलातोरणम ( दगडांचे तोरण - हे पाहाण्यासारखे आहे ) आणि बालाजीच्या वराह अवतारातल्या पादुका आहेत . ही ठिकाणे फिरायला साधारण दोन अडीच  तास लागतात . आकाश गंगा येथे उतरायला आणि चढायला 200 पायऱ्या आहेत . local tour operator इथे tour arrange करू  देतात. साधारण 1500- ते 2200/- घेतात . इथे वर तिरूमला ला रिक्षाना परवानगी नाही त्यामुळे ही ठिकाणे फिरायला चारचाकी गाडीच करावी लागते . बस सुद्धा सगळीकडे जात नाही. पिवळ्या नंबर प्लेट पेक्षा पांढरी नंबर वाली गाडी केली (private vehicle) तर आपण दरात bargain करू शकतो . मी तसेच केले .

११) तिरूमला ला खाण्यासाठी सर्व प्रकारची हॉटेल्स आहेत . प्यायचे पाणी आणि स्वच्छतागृहे तर सगळीकडेच आहेत . 
श्रीनिवासम मध्ये रात्री 7 ते 9:30 पर्यंत खिचडी चा प्रसाद मिळतो.  बाकी काही खायचे असेल  बाहेर यावे लागते . बाहेर आल्यावर बस स्टॅंड च्या दिशेला ' सरावना भवन ' हे व्हेज हॉटेल आहे . जरा पुढे ' लक्ष्मी नारायण भवन ' आहे . इथे पोंगल चांगला मिळतो . खाण्यात इडली , मेदू वडा , डोसा , पोंगल हे प्रामुख्याने मिळते . पण आता काही महाराष्ट्रीयन हॉटेल्स सुद्धा सुरू झाली आहेत . बेसन - भाकरी , पोळी भाजी सुद्धा  मिळते . दुकानाच्या पाटीवर छ. शिवाजी महाराज आणि कै. बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले आहेत . मराठी यात्रेकरूंना आकर्षित  करण्यासाठीची ही योजना आहे . मला मात्र जाऊ तिथले खाण्याची आवड असल्याने मी दाक्षिणात्य पदार्थांवर ताव  मारला . 

१२) तिरूपती मध्ये सुद्धा चार पाच मंदिरे पहाण्यासारखी आहेत . पद्मावती मंदिर हे खाली तिरूपतीमध्ये आहे . श्रीनिवासम पासून ४ किमी.आधी पद्मावतीचे दर्शन घेउन मग बालाजीचे दर्शन घ्यावे अशी इथे पद्धत 
आहे . गोविंदराजस्वामी मंदिर , कोंडाराम स्वामी मंदिर , कपिलेश्ववर मंदिर, श्री अगस्थेश्वरा स्वामी मंदिर  ही काही प्रसिद्ध आणि सुंदर मंदिरे आहेत . तसेच श्रीकालह्स्ती मंदिर तिरूपतीहून ४० किमी वर आहे . इथे कालसर्प शांती आणि राहू - केतूची शांती करण्यासाठी देशभरातून लोकं येतात. ही मंदिरे पहाण्यासाठी आंध्र सरकारच्या बस सेवेची तिकीटे मिळतात. तसेच private Taxi सुद्धा आहेत.
तिरूपती मध्ये बालाजी मंदिरासंधर्भात एक मुझियम आहे . यात मंदिराचा इतिहास , रचना , architecture , sculpture, mythology याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे .

*टीप : ही माहिती मी माझ्या अनुभवातून लिहिली आहे . तरी प्रत्यक्ष प्रवास करण्यापूर्वी सोबत असलेल्या फोटोंवरील संपर्क क्रमांकाना संपर्क करून खात्री करून घ्यावी आणि प्रवासाला सुरूवात करावी* 🙏🏻

- अनिकेत शेटे , पुणे 15/12/2018

ShriNivasam Complex


Museum


Mobile ATM

Pap Vinashanam

Famous StoneArch ( शीलातोरणम)

SouthIndian Attire









Friday, 19 January 2018

शेगावीचे योगीराज श्री गजानन महाराज!!

शेगावीचे योगीराज श्री गजानन महाराज!!



      २०१७ मध्ये दोनदा गुरूपुष्यामृत मुहूर्तावर ' गजानन विजय ' पोथीचे पारायण करण्याचे भाग्य मिळाले आणि तेव्हापासूनच शेगाव ला स्वामींच्या चरणी दर्शनाला जावे असे मनातून वाटू लागले . असे बरेच ठिकाणी आपल्याला जावेसे वाटते किंवा कधीतरी आपण जाऊया असे आपण ठरवतो पण शेगाव च्या बाबतीत मात्र आपण लवकरात लवकर तिथे जायलाच हवे असे मनातून वाटू लागले. म्हणून रेल्वे ची तिकिटे चेक केली तर जानेवारी २०१८ मध्ये पहिल्या आठवड्यात तिकिटे उपलब्ध होती ; मी लगेच जातानाची आणि येतानाची तिकिटे बूक करून टाकली आणि मनातून निश्चिन्त झालो .

    आणि हळूहळू जाण्याचा दिवस उजाडला . पुण्यातून रोज संध्याकाळी ६:२५ ला आझाद हिंद एक्सप्रेस हावडा, कोलकत्यासाठी रवाना होते. दुसर्या दिवशी पहाटे ५ वाजता ही गाडी शेगाव ला थांबते . पुणे ते शेगाव रेल्वेचे अंतर ६०० किमी आहे. मी शेगाव बद्दल  थोडीफार माहिती फेसबूक वरून  आणि गूगलवरून घेउन ठेवली होती . सगळी माहिती सकारात्मक असल्यामुळे मन निर्धास्त होते आणि स्वामींच्या दर्शनासाठी व्याकूळ होते . 

    सकाळी ५ वाजता शेगाव ला उतरल्यावर शेगावच्या  सुप्रसिद्ध शेगाव कचोरीचे मुख्य ठिकाण दिसले ; हे स्टेशन जवळच आहे. तिथे नंतर नक्की यायचे असे ठरवून पुढे आलो तर रिक्षावाल्यांचा गराडा पडला . त्याना बाजूला करून जरा अजून बाहेर आल्यावर शेगाव संस्थान ची बस उभी असलेली दिसली. दर्शनाला येणाऱ्या भक्तांना स्टेशनवरून  भक्तनिवास / मुख्य मंदिर येथे सोडण्याची सेवा संस्थान ने विनामूल्य पुरविली आहे . स्वामीनी आमच्यासाठी  किती सोय करून ठेवलेली आहे हा विचार मनात आला . मुख्य मंदिर स्टेशनपासून फार तर २ -२.५ किमी असेल . रिक्षा करायची वेळ आली तर सिट मागे दहा रूपयात ते मंदिराजवळ आणून सोडतात . 

   मंदिराजवळ आल्यावर परत एकदा रूम पुरवणारे , फ्रेश होण्याची सोय पुरवणारे  यांचा गराडा पडला . पण फेसबूक वरील मित्रांच्या सल्ल्यानुसार भक्त निवासातच रहायचे ठरले असल्यामुळे आम्ही सरळ मंदिरात गेलो. आत प्रवेश केल्यावरच सर्वात पहिल्यांदा नजरेत भरले ते पांढरे शुभ्र सदरा आणि लेंगा आणि मस्तकावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेले सेवेकरी आणि कमालीची स्वछता आणि शांतता . या सेवेकर्यांबद्दल पुढे सविस्तर लिहिणार आहे . आत गेल्यावर चौकशी कक्षात चौकशी केल्यावर समजले की भक्तनिवास क्रमांक १ व २ मंदिर परिसरातच आहेत आणि भक्तनिवास क्रमांक ३ ते ६ मंदिराबाहेर पण जवळच आहेत . तसेच 'आनंद विहार' आणि 'आनंद विसावा' हे अजून दोन मोठे भक्तनिवास मंदिरापासून २-३ किमी अंतरावर आहेत . मंदिरातील भक्तनिवासातच सोय झाली तर बरे म्हणून भक्तनिवास १ व २ च्या चौकशी केंद्रात निघालो तर समोरच्या दोन महावृक्षावरील पक्ष्यांच्या किलबिलाटाने लक्ष वेधले. दोन्ही वृक्षांच्या बुंध्याला  खालपासून वरपर्यंत उलट्या शंकूच्या आकारात हिरवे बारीक  जाळीदार कापड बांधले होते . यामुळे पक्ष्यांची विष्ठा तसेच सुकलेली पाने जमीनीवर न पडता त्या शंकूतच जमा होण्याची सोय केलेली होती. त्या वृक्षांवर पहाटे अगणित पोपट , चिमण्या , टिटव्या यांचे अस्तित्व त्यांच्या किलबिलाटामुळे जाणवत होते ; प्रत्यक्ष डोळ्यांना कोणी दिसत नव्हते . भक्तनिवासात चौकशी केल्यावर समजले की सगळ्या रूम भरलेल्या आहेत आणि १-२ रूम तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध आहेत. आमच्या बरोबर वयस्कर व्यक्ती असल्यामुळे तिसरा मजला आम्हाला नको होता म्हणून आम्ही मंदिराबाहेर भक्तनिवास क्र ३ ते ६ मध्ये प्रयत्न करायचे ठरवले. मंदिराबाहेर सात - आठ मिनिटे चालल्यावर ही मोठी इमारत लागते . ( काळोखात ओळखायची खूण म्हणजे तिथे एक मोबाईल टॉवर आहे त्यावरचा लाल लाईट रात्री दिसतो ; त्या दिशेने जायचे.) आत प्रवेश करतानासुद्धा बाहेरच्या लॉजवाल्यांचा सुळसुळाट भेदावा लागतो . ते काहीही सांगतात की आतल्या सगळ्या रूम संपल्या आहेत , ६-७ तासांचे वेटिंग आहे वगैरे वगैरे पण आपण आत जाऊन चौकशी करून मगच निर्णय घ्यावा . आत गेल्यावर आमच्यासारखेच मंदिरातून इकडे आलेले खूप लोक तिथे होते . प्रत्येक कुटूंबातील एकाला एका रांगेत नंबर लावायला सांगून बाकीच्याना सामनासकट  बाहेर बसायला सांगितले. तिथे सुद्धा रूम उपलब्ध नव्हत्या ; जशा रूम खाली होतील तशा मिळत जातील असे सांगितले. किती वेळ थांबायला लागेल याचा काही अंदाज नव्हता . ज्याना थांबणे शक्य नाही त्यांच्यासाठी आनंद विहार व आनंद विसावा इथे सोय नक्की होवू शकते ( तिथे खूप खोल्या आहेत ) व तिथे जाण्यासाठी बस ची सुद्धा सोय आहे असे सांगण्यात आले. पण मंदिरापासून ही ठिकाणे दूर असल्यामुळे आम्ही तिथेच थांबून वाट पहाण्याचा निर्णय घेतला . थोड्या थोड्या वेळाने जशा रूम उपलब्ध होतील तशा दिल्या जायला सुरूवात झाली . प्रत्येकाला एक फॉर्म देण्यात आला . त्यात नाव / गाव / संपर्क क्रमांक ही माहिती विचारली होती . आपल्या बरोबरच्या सदस्यांशी आपले नाते, आपण किती दिवस रहाणार ई माहिती विचारली जाते. हा फॉर्म देताना सगळ्या सदस्यांचे आधार कार्ड लागते. त्यामुळे ते न विसरता बरोबर ठेवावे . हा फॉर्म जमा करतानाच मी खालच्या मजल्यावर रूम मिळाली तर बरे होइल अशी विनंती केली . तेव्हा तेथील सेवेकरी बघतो म्हणाले आणि पहिल्या मजल्यावरची रूम आम्हाला दिली . हे सगळे होइपर्यंत ७ वाजले . वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत . साधी रूम , toilet/ bath attached रूम , deluxe रूम , जास्त सदस्यांसाठी मोठ्या रूम , ज्याना रूम घेणे शक्य नाही किंवा उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी कॉमन dormitory अशा सोयी आहेत .

  आम्ही toilet / bath attached रूम घेतली . रूम अतिशय स्वच्छ , टापटीप आहेत , गरम पाण्याची सोय आहे . आम्ही आंघोळ करून खाली प्रसादालयात नाश्ता करण्यासाठी आलो . तिथे सुद्धा एकाने रांगेत उभे राहून कूपन घ्यायचे , याच रांगेत असताना मेनू सांगितला जातो. अतिशय नाममात्र दरात नाश्ता मिळतो. सगळी कामे शिस्तीने केली जातात . कुठेही कसलीही घाई गडबड नाही , वाद होण्याची शक्यता नाही . आपले खाउन झाल्यावर प्रत्येकाने आपले ताट / भांडे उचलून ठेवावे एवढी माफक अपेक्षा असते. 

   नाश्ता झाल्यावर आम्ही मंदिरात दर्शनासाठी निघालो . मंदिरात प्रवेश केल्यावर परत एकदा सेवेकर्यांचे दर्शन झाले . ठराविक अंतरावर बसून ते आपली सेवा करत होते . पुढे आत गेल्यावर चप्पल स्टॅंड लागतो . एकावेळी हजारो लोकाना चपला ठेवता याव्यात आणि त्या ठेवताना / घेताना गडबड होवू नये याची काळजी इथे घेतली आहे . क्रमवार चप्पल स्टॅंड चे बूथ एकाच छताखाली केलेले आहेत . चपला ठेवल्यावर हात - पाय धुवायची जागा आहे . इथून पुढे गेल्यावर एक डिजिटल डिस्प्ले दिसतो ; त्यावर समाधी दर्शनाला आणि मूख दर्शनाला अंदाजे  किती वेळ लागेल हे लिहिलेले असते . दोन दिवसात तीन वेळा मी दर्शन घेतले . हा अंदाज सहसा चुकत नाही हे मला कळले . समाधी दर्शानाची जागा ही तळघरात आहे . गर्दी नसल्यामुळे रांग नव्हती आणि आम्ही लगेच तळघरात पोचलो आणि स्वामींचा धवल रंगातला मुर्तीच्या  चेहर्याचे दर्शन झाले . बाकी मूर्ती फुलानी सजवली होती . अचानक स्वामींचे इतके जवळून  लोभस दर्शन झाल्यामुळे काय करू आणि काय नको असे झाले होते . इतके दिवस ज्याची आतूरतेने वाट पहात होतो तो क्षण मी प्रत्यक्ष जगत होतो . स्वामींकडे कितीही  वेळा पाहिले तरी मन तृप्त होत नव्हते . तिथून वर निघालो आणि समाधीच्या वर राम - लक्षुमण - सीता यांचे मंदिर आहे तिथे पोचलो . तिथून दर्शन घेउन शेजारी असलेल्या पारायण मंडपात गेलो तिथे असंख्य भक्तगण ' गजानन विजय ' ग्रंथाचे पारायण करत होते . इथले वातावरण खूप शांत असते . आम्हीसुद्धा तिथे थोडावेळ पारायण केले .  याच परिसरात स्वामींचे वास्तव्य होते असे नाग मंदिर व औदुम्बर वृक्ष आहेत.

   याच परिसरात दोन मोठे प्रसादालये आहेत इथे हजारो भक्तगण दररोज महाप्रसाद ग्रहण करतात . इतक्या लोकांचा इथे वावर आहे पण इथली स्वछ्ता , शिस्त वाखाणण्याजोगी आहे . कुठेही कचरा, चिखल नाही, पायाचे ठसे नाहीत, भिंतींचे कोने पानाच्या पिचकारीने रंगलेले नाहीत. सेवेकरी ही सगळी सेवा मनोभावे करतात . मंदिर परिसरात आणि बाहेरच्या भक्तनिवासात ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची सोय आहे . तसेच नवजात शिशूंच्या स्तनपानासाठी  स्वतंत्र खोल्या बांधल्या आहेत . 

   ही सगळी व्यवस्था पहायला सेवेकरी आहेत . साधारण २५ ते ४० वयोगटातील पुऱूष वर्ग सेवेकरी म्हणून इथे येतात . महिन्यातले कमीतकमी ५ दिवस सेवेला देतात . प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांचा सेवेसाठी नंबर लागतो . नेट वर कळले की संस्थान कडे असे १७००० हजार सेवेकरी नोंदणीकृत आहेत तसेच अजून खूप जिल्हे आपला नंबर लागावा म्हणून प्रतिक्षेत आहेत . पांढरा सदरा - लेंगा आणि पांढरी गांधी टोपी हा त्यांचा गणवेश आहे . स्वच्छ दाढी केलेले हसतमुख असे हे सेवेकरी भक्ताना मदत तर करतातच तसेच त्याना ठरवून दिलेल्या सेवा पार पाडतात. ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येणार नाहीत . तसेच ते एकमेकांशी सुद्धा गप्पा मारत बसलेले तुम्हाला दिसणार नाहीत . प्रत्येकाने कुठे उभे राहून काय सेवा करायची हे ठरलेले असते आणि हे सेवेकरी ती सेवा मनापासून करतात . 

  दुपारी मंदिरात महाप्रसाद असतो . त्यासाठी सुद्धा रांग असते . एका वेळी हजारो भक्त महा प्रसाद बसून  ग्रहण करू शकतात अशी सोय केलेली आहे . फक्त पानात काही टाकू नये आणि खाऊन झाल्यावर आपले ताट - वाटी उचलून ठेवावे एवढीच अपेक्षा असते . प्रसाद घेउन आम्ही आमच्या भक्तनिवासाकडे निघालो . भक्तनिवास क्र ३ ते ६ च्या प्रांगणातून आनंद विसावा आणि आनंद विहार या भक्तनिवासाकडे जाण्यासाठी संस्थानच्या बस सुटतात . तसेच या प्रांगणात रेल्वे चे वेळापत्रक लावले असून त्या नुसार स्टेशन साठी सुद्धा बस सुटतात . या सर्व बस सेवा भक्तांसाठी विनामूल्य आहेत . बस साठी नीट रांगा लावव्या लागतात.  सेवा भक्तांसाठी फुकट आहे पण संस्थान ला खर्च आहेच म्हणून पूर्ण बस भरल्याशिवाय सोडत नाहीत. बस चे चालक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत . ( साधारण १५-२० मिनिटात बस भरते.) 

   इथे यायचे ठरवल्यापासून आनंद सागर बद्दल खूप ऐकले / वाचले होते . त्यामुळे तिथे जायचेच होते . दुपारी आम्ही आनंद सागर ला जायला निघालो. भक्तनिवासापासून सुमारे ३-४ किमी अंतरावर आनंद सागर आहे . सुमारे ४०० एकरावर हा प्रकल्प वसला आहे . प्रवेश फी ५०/- आहे . प्रत्येकाने बघावाच असे हे ठिकाण आहे . लहान मूलांसाठी तसेच ज्येष्ठ नगरीकांसाठी Wheel chair ची सोय आहे. सुरूवातीलाच 'संत दर्शन ' लागते . महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील संतांच्या संगमरवरातील मूर्ती इथे पहायला मिळतात. आपल्याला फक्त महाराष्ट्रातील संत माहित असतात , इथे इतर राज्यातील संतांबद्दल माहिती मिळते . नंतर पुढे Toy train आहे. Train ने पूर्ण प्रकल्पाला फेरी मारून आणली जाते . नंतर १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळायची सोय आहे . इथले विवेकानंद स्मारक खूप सुंदर आहे. संध्याकाळी ६:३० ला  ते बंद होते म्हणून आम्ही तिकडे निघालो . हे खूप शांत ठिकाण आहे . खास ध्यान करण्याची सोय इथे आहे .  गोड्या पाण्यातील माशांचे मत्सालय पण पहाण्यासारखे आहे . संध्याकाळी ७:०० ते ७:१५ इथे कारंज्यांचा कार्यक्रम असतो . तो सुरू होण्यापूर्वी संस्थान च्या कार्याविषयी माहिती दिली जाते . आनंद सागर मध्येही ठिकठिकाणी अल्पोपहाराची / प्रसाधनगृहांची सोय केलेली आहे. रात्री  ८: ०० ला आनंद सागर बंद होते . 

  दुसर्या दिवशी सकाळी परत एकदा स्वामींचे दर्शन घेतले . गुरूवार असल्यामुळे आज गर्दी होती . बाहेर डिस्प्ले वर समाधी दर्शानाला लागणारा  वेळ ४० मिनिटे दर्शवत होता . स्वामींच्या  तेजस्वी मुद्रेवरून नजर हटत नाही . सारखे तिथेच उभे रहावे असे वाटते . पण गर्दीमुळे ते शक्य नसते . आम्ही ४५ मिनिटात दर्शन घेउन बाहेर आलो. 

 नंतर आम्ही शेगावातील चारधाम करायचे ठरविले. मंदिरापासून जवळ जवळ च आहेत ही ठिकाणे .  पहिल्यांदा लागते ते शितला मातेचे मंदिर. स्वामीना पाटलाच्या मुलानी ऊसाने मारले होते ती ही जागा . याच मुलाना स्वामीनी हाताने ऊस पिळून रस प्यायला दिला.  नंतर स्वामी प्रगट झाले ते स्थान.  मोठ्या महावृक्षाखाली ही जागा आहे . आता पार बांधून काढला आहे . इथेच पहिल्यांदा स्वामीना  उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाताना बंकट्लालने पाहिले होते . नंतर येते ते बंकटलाल यांचे घर.  इथे स्वामींचे वास्तव्य होते . अजून ही वास्तू जपून ठेवली आहे.  इथेच स्वामीनी जानराव देशमुखाना तीर्थ देउन बरे केले . आणि नंतर येते ते हरीहर (महादेव) मंदिर . इथेच टाकळीकर बूवांच्या कीर्तनाचा उत्तारार्ध स्वामींनी पूर्ण केला . तसेच त्यांचा घोडा आणि सुकलालाच्या गायीला स्वामीनी इथेच शांत केले .

 साधारण १०-१२ किमी अंतरावर नागझरी, आकोट , कोडोली , आडगाव ही धार्मिक स्थळे आहेत .

संस्थान ची जागा सोडली तर शेगाव गावाची परिस्थिती फार बेताची आहे. संस्थान ची शिस्त , स्वच्छता बाहेर कुठेही दिसत नाही .  काही  भक्त गण सुद्धा इथल्या शिस्तीला कंटाळा करत होते . प्रत्येक गोष्टीला रांगेत उभे रहावे लागते हा तक्रारीचा सूर असतो . पण ही शिस्त आहे म्हणूनच तिथे अजिबात गडबड / गोंधळ होत नाही . आपण परदेशात गेलो की तिथल्या शिस्तीने / स्वच्छतेने भारावून जातो पण आपल्या देशात सुद्धा आपण हे केले पाहिजे असे आपल्याला वाटत नाही . तसेच शेगाव मधून परतताना इतर धार्मिक ठिकाणी आणि आपल्या अवतीभोवती सुद्धा अशी शिस्त हवी असे आपल्याला वाटायला हवे. 

  आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मंदिरात किंवा आनंद सागर मध्ये सगळे फलक मराठी/हिंदीत आहेत ;उगीच इंग्रजीचे कौतूक केलेले नाही. आमची परत निघायची वेळ झाली होती.संध्याकाळी १९:५० ची ट्रेन होती . प्रसाद घेउनच बाहेर पडलो . खरेतर पाय हलत नव्हता . पण इलाज नव्हता . परत इथे यायचेच असा निश्चय करून ,  स्वामींचे स्मरण करत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. 



सोबत शेगाव येथील काही फोटो जोडत आहे




श्रीगजानन महाराज


प्रवेशद्वार- आनंद सागर


संतदर्शन -आनंद सागर
स्वामी विवेकानंद ध्यान मंदिर -आनंद सागर
स्वामींचे प्रकटस्थान
बंकटलाल यांच्या घरातील स्वामींची प्रतिमा
भक्तनिवास सम्पर्क

रेल्वे वेळापत्रक शेगाव

Tuesday, 19 January 2016

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर.

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर, गाव : "लिंब शेरी " जि .सातारा 


फेसबुकवर बर्याच वेळा या विहिरीबद्दल वाचले होते . फोटो पाहिल्यावरच तिथे जाण्याची इच्छा झाली होती ;काल योग जुळून आला . पुण्याहून सातार्याला जाताना दुसरा टोल नाका ओलांडला ( भुईंज गावाच्या पुढे ) की दोन अडीच किलोमीटर वर डावीकडे "लिंब " गावाची कमान लागते . तिथून ५-६ किलोमीटर वर हे लिंब शेरी गाव आहे . १२ मोटेची विहीर कोणाला विचारले तरी रस्ता दाखवतात . 

ई .स. १६४० ते १६४१  च्या दरम्यान या विहिरीचे बांधकाम श्रीमंत सौ विरूबाई भोसले यांनी करवून घेतले  असे म्हणतात .विहिरीची खोली ११० फूट असून व्यास ५० फूट आहे . ही विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्रा चा  उत्कृष्ट नमुना आहे . खूप विचार करून ही विहीर बांधलेली आहे . आजही विहिरी ला भरपूर पाणी आहे . (विहिरीतले झरे  जिवंत आहेत ). पाणी काढण्यासाठी विहीरीवर १२ मोटेची सोय केलेली होती .आजही त्याचे अवशेष दिसतात  . उपसलेले पाणी सर्वत्र पोहोचवण्यासाठी दगडी हौद बांधले आहेत . 

मुख्य अष्टकोनी विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी एका महाल वजा ईमारतीतून जावे लागते. जमिनीच्या पातळीपासून खाली उतरून या ईमारतीत जाता येते . या पायर्यासुद्धा प्रशस्त, दगडी  आणि आखीव- रेखीव आहेत . खाली गेल्यावर आपण तळमजल्यावर पोहोचतो . तिथून पुढे गेल्यावर मुख्य विहीर लागते . विहिरीत आत उतरण्यासाठी पायर्या  बांधल्या आहेत . तळमजल्यावरून महालाच्या दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत . इंग्रजी एल अक्षराच्या आकारातले ह्या जिन्यातून एकावेळी एकच व्यक्ती वर जावू शकते .  वर गेल्यावर आपण चार खांब असलेल्या महालात पोहोचतो . या महालाच्या छतावर , खांबांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत . या महालातून छतावर येण्यासाठी आणखी एक अरुंद जीना आहे . इथून वर आलो की आपण परत जमीनी च्या पातळीवर येऊन पोहोचतो . वर आलो की प्रशस्त अशी  सिंहासन वजा जागा आणि त्यापुढे बैठक व्यवस्था आहे . त्याकाळी इथे महत्वाच्या बैठका होत असाव्यात . विहिरीच्या तळमजल्याखाली खलबत खाना आहे . त्याकाळी इथे गुप्त मसलती होत असाव्यात . 

विहिरीचे आणि महालाचे बांधकाम हे काळ्या दगडातले असून आजही शाबूत आहे . आज या विहिरीचा उपयोग लहान मुलामुलींना पोहायाल्या शिकवण्यासाठी आणि शेती साठी होतो .

छत्रपतींच्या काळातल्या  अदभूत आणि भव्य असा हा स्थापत्यकलेचा नमुना आजही सरकारकडून उपेक्षितच आहे . आजही या ठिकाणाची माहिती बहुसंख्य लोकाना नाही . त्यामुळे इथे पर्यटकांसाठी कसलीही सोय नाही . गावातले रस्ते कच्चे आहेत . जवळ असलेल्या शेतघरात आमची जेवणाची सोय उत्तम झाली. भाकरी - पिठलं, ताज्या मेथीची भाजी आणि आमटी भात असा मेनू त्या मावशीनी सुंदर बनवला .

कधी कधी वाटते अशी ठिकाणे प्रकाशझोतात नाहीत तेच चांगले . इतर पर्यटनस्थळान्ची विकासाच्या नावाखाली झालेली हानी आठवते . तिथे होणारी पर्यावरणाची हानी ,ऐतिहासिक वास्तूंचे विडंबन , अस्वच्छता , प्लास्टिक चा अमर्याद वापर , पैशाचा बाजार हे सगळे आठवले की इथे लोक पोहोचली नाहीयेत हेच चांगले असे वाटते . परदेशात मात्र छोट्या छोट्या ऐतिहासिक गोष्टीना खूप महत्व देवून पर्यटकांना आकृष्ट केले जाते आणि तिथल्या इतिहासाचे , शौर्याचे , पराक्रमाचे कौतुक केले जाते , ते पाहिले की मात्र मनाला खिन्नता येते . नेपोलियन , अलेक्झांडर यांच्या तोडीस तोड असे आपले पूर्वज होते ; पण त्यांचा पराक्रम सांगायला, दाखवायला आज आमच्याकडे काही नाही . जे अवशेष शिल्लक आहेत ते फक्त पिकनिक स्पॉट झाले आहेत .
अर्थात जे शिल्लक आहे ते जतन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे . आणि त्यासाठी आपल्या समृद्ध अशा वारस्याची जाणीव  असणे गरजेचे आहे .स्वराज्याच्या कालखंडातील ही अदभूत अशी विहीर याच वारस्याची भाग आहे ; प्रत्येकाने एकदातरी पहावी अशीच आहे .

- अनिकेत शेटे , पुणे .

प्रत्यक्ष विहीर .

विहिरी वरील सिंहासन आणि बैठक व्यवस्था .

विहीरीवरचा महाल .

तळमजला .

तळमजला ते विहीर जोडणारा मार्ग 

तळमजल्यावर येण्याचा मार्ग 

तळमजल्या खालील खलबतखाना

विहिरीत उतरण्यासाठी मार्ग 

विहीर, तळमजला आणि महाल 

विहिरीकडे जाण्यासाठी प्रशस्त , रुंद पायर्या 


तळमजल्यावरून वर जाण्यासाठी अरुंद जीना