Thursday 14 April 2022

दैनंदिन जीवनातील व्यावसायिकतेचे धडे - १

दिवस : कालचा 
स्थळ: पिंपरी- चिंचवड
वेळ : रात्री १०:४५ 

     घरातील एक कडधान्य संपले असल्याने आणि तेच रात्री भिजत घालायचे असल्याने ते विकत घ्यायला मी घराखाली उतरलो. घराजवळ दोन राजस्थानी लोकांची दुकाने आहेत. याना इथे छोटी सुपर मार्केट म्हणतात. जवळ गेलो तर दोन्ही दुकाने उघडी होती. त्यातील नेहमीच्या दुकानात गेलो तर त्या घरातील २५-२७ वयाची सून जी सकाळपासून दुकानात असते ती आनंदी चेहर्याने काऊंटर मागे उभी होती. मी मला हवे असलेले कडधान्य आहे का विचारले. तिने आहे म्हटले आणि मला आणून दिले. ( आजपर्यंत इथे  मला " नाही " हा शब्द ऐकायला मिळाला नाही ; नाही म्हणायची वेळ आली तर तो त्याना अपमान वाटतो ; लगेच आपल्या डायरीत नोंद करून ती गोष्ट मागवून घेतात )
     त्या सूनेला मी विचारले की मी खाली येताना जरा साशंक होतो की दुकान चालू असेल की नाही, त्यावर ती म्हणाली , अजून थोडा वेळ आहे बंद करायला. शेजार्याने अजून बंद केले नाही. मला काही समजले नाही. त्यावर ती म्हणाली की शेजारचे दुकान बंद होण्याआधी आम्ही आमचे दुकान बंद केले तर आमची गिर्हाइके त्यांच्याकडे जातात ; दोघानी एका वेळी बंद करूया असे आम्ही सांगितलें तर तो शेजारी ऐकत नाही म्हणून मग आम्ही त्याचे दुकान बंद झाल्याशिवाय आमचे दुकान बंद करत नाही.
      सकाळी ५:३० ला चालू झालेले दुकान रात्री १०:४५ ला  का बंद केले नाही यामागचे तिचे कारण मी थक्क होवून ऐकत होतो. व्यवसाय किती आत मुरला आहे या लोकांच्या  हे परत एकदा जाणवले. तिच्या वयाच्या आमच्या मुलीबाळी काय विचार करतात ? तिच्या वयाचा मी असताना काय विचार करायचो? आणि आमच्या मूळगावी आमचा मराठी दुकानदार एव्हाना दुकान बंद करून अडीच तास होवून गेले असतील या गोष्टींचा  विचार करत मी घरी आलो. 
     दुकानामागे दुकानापेक्षा निम्म्या जागेत यांचा संसार असतो. याच जागेत त्यांची लग्ने होतात. दीर असतो , आई - वडील येउन जाऊन असतात. गावावरून आलेला आपल्याच बिरादारीचा एक  मुलगा असतो जो पुढे जाऊन २-३ वर्षानी आपले स्वतःचे दुकान काढायचे म्हणून उमेदवारी करायची म्हणून इथे आलेला असतो. इथेच याना मुले होतात , इथेच ती लहानाची मोठी होतात , व्यवहारापुरते शालेय शिक्षण घेतात. पण सर्वात महत्वाचे शिक्षण , व्यावसाईक शिक्षण आईच्या पोटात असल्यापासूनच चालू झालेले असते. त्यांचा १२-१४ वर्षांचा मुलगा आपल्या पदवी घेतलेल्या मूलाला व्यवसाय समजावू शकतो. पैशाने पैसा कसा वाढवायचा हे त्याना बरोबर समजते. 
     वर्षातून एकदा १५-२० दिवसांसाठी गावी जातात. ते सुद्धा नाईलाज म्हणून जात असावेत. एवढ्या दिवसांचा व्यवसाय जाणार याचे दु:ख त्याना असते. 
     वर उल्लेख केलेली सून नावापुरते शिकलेली आहे. पण पहाटेपासून रात्रीपर्यंत ती दुकान आणि घर व्यवस्थित सांभाळते. सगळ्यांची जेवणे , मूलांचे डबे , त्यांच्या आंघोळी , त्यांचा अभ्यास , घरातले कपडे भांडी हे सगळे तीच करते. आणि दुकान पण सांभाळते. सांभाळते म्हणजे नुसते कॉउंटर ला उभी रहात नाही तर संपलेला माल मागवणे , तो मोजून घेणे , तो नीट लावणे , त्याची payments करणे , लोकांच्या उधार्या लिहून ठेवणे , त्या वेळेवर वसूल करणे , बॅंक व्यवहार बघणे हे सगळे ती करते. सगळे कुटूंब प्रचंड कष्ट करते. गिर्हाईके जोडून ठेवण्यासाठी उधारी देणे , थोडा discount देणे , मालाची home delivery देणे ह्या गोष्टी पण करतात.  मॉल संस्कृती आणि घरपोच माल मिळण्याच्या जमान्यात यांच्या व्यवसायावर पण परिणाम होतोय पण त्यांची जिद्द , चिकाटी आणि कष्ट कमालीचे आहेत. एवढे करून स्वतः मात्र आपल्याला हव्या असलेल्या वस्तू / सेवा स्वतःच्या जातभाईकडूनच घेणार. मिठाई , कपडे , फर्निचर, हार्डवेअर, डेअरी , फळे , टायर , रीयल इस्टेट ई सगळ्या व्यवसायात हे लोक आहेत. आणि एकमेकांशी चांगले संबंध ठेवून आहेत . वेळी अवेळी आपल्या माणसाच्या मदतीला पुढे असतात. आपला पैसा आपल्या समाजातच राहिला पाहिजे हा अलिखित नियम आवर्जून पाळतात. 
     स्वतःचे पूर्ण आयुष्य त्यानी व्यवसायाला वाहून घेतलेले असते. आयुष्य आणि व्यवसाय वेगळे काढणे कठीण जाते. मराठी लोकानी यांचे खूप गुण घेण्यासारखेच आहेत . सुरूवातीला भाड्याच्या जागेत सुरू झालेला त्यांचा व्यवसाय अल्पावधीत स्वतःच्या जागेत जाऊन संपत्तीचे साम्राज्य कसे निर्माण करतो याचे गुपित त्यांच्या व्यवसायाप्रती असलेल्या commitment मध्ये आणि लहानपणापासूनच घरात मिळणाऱ्या व्यावसाईक बाळकडू मध्ये आहे.

© अनिकेत शेटे.
पिंपरी- चिंचवड
चैत्र. शु. १३, शके १९४३ 
दि: १४ एप्रिल २०२२