Tuesday 19 January 2016

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर.

बारा मोटेची ऐतिहासिक विहीर, गाव : "लिंब शेरी " जि .सातारा 


फेसबुकवर बर्याच वेळा या विहिरीबद्दल वाचले होते . फोटो पाहिल्यावरच तिथे जाण्याची इच्छा झाली होती ;काल योग जुळून आला . पुण्याहून सातार्याला जाताना दुसरा टोल नाका ओलांडला ( भुईंज गावाच्या पुढे ) की दोन अडीच किलोमीटर वर डावीकडे "लिंब " गावाची कमान लागते . तिथून ५-६ किलोमीटर वर हे लिंब शेरी गाव आहे . १२ मोटेची विहीर कोणाला विचारले तरी रस्ता दाखवतात . 

ई .स. १६४० ते १६४१  च्या दरम्यान या विहिरीचे बांधकाम श्रीमंत सौ विरूबाई भोसले यांनी करवून घेतले  असे म्हणतात .विहिरीची खोली ११० फूट असून व्यास ५० फूट आहे . ही विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्रा चा  उत्कृष्ट नमुना आहे . खूप विचार करून ही विहीर बांधलेली आहे . आजही विहिरी ला भरपूर पाणी आहे . (विहिरीतले झरे  जिवंत आहेत ). पाणी काढण्यासाठी विहीरीवर १२ मोटेची सोय केलेली होती .आजही त्याचे अवशेष दिसतात  . उपसलेले पाणी सर्वत्र पोहोचवण्यासाठी दगडी हौद बांधले आहेत . 

मुख्य अष्टकोनी विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी एका महाल वजा ईमारतीतून जावे लागते. जमिनीच्या पातळीपासून खाली उतरून या ईमारतीत जाता येते . या पायर्यासुद्धा प्रशस्त, दगडी  आणि आखीव- रेखीव आहेत . खाली गेल्यावर आपण तळमजल्यावर पोहोचतो . तिथून पुढे गेल्यावर मुख्य विहीर लागते . विहिरीत आत उतरण्यासाठी पायर्या  बांधल्या आहेत . तळमजल्यावरून महालाच्या दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत . इंग्रजी एल अक्षराच्या आकारातले ह्या जिन्यातून एकावेळी एकच व्यक्ती वर जावू शकते .  वर गेल्यावर आपण चार खांब असलेल्या महालात पोहोचतो . या महालाच्या छतावर , खांबांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत . या महालातून छतावर येण्यासाठी आणखी एक अरुंद जीना आहे . इथून वर आलो की आपण परत जमीनी च्या पातळीवर येऊन पोहोचतो . वर आलो की प्रशस्त अशी  सिंहासन वजा जागा आणि त्यापुढे बैठक व्यवस्था आहे . त्याकाळी इथे महत्वाच्या बैठका होत असाव्यात . विहिरीच्या तळमजल्याखाली खलबत खाना आहे . त्याकाळी इथे गुप्त मसलती होत असाव्यात . 

विहिरीचे आणि महालाचे बांधकाम हे काळ्या दगडातले असून आजही शाबूत आहे . आज या विहिरीचा उपयोग लहान मुलामुलींना पोहायाल्या शिकवण्यासाठी आणि शेती साठी होतो .

छत्रपतींच्या काळातल्या  अदभूत आणि भव्य असा हा स्थापत्यकलेचा नमुना आजही सरकारकडून उपेक्षितच आहे . आजही या ठिकाणाची माहिती बहुसंख्य लोकाना नाही . त्यामुळे इथे पर्यटकांसाठी कसलीही सोय नाही . गावातले रस्ते कच्चे आहेत . जवळ असलेल्या शेतघरात आमची जेवणाची सोय उत्तम झाली. भाकरी - पिठलं, ताज्या मेथीची भाजी आणि आमटी भात असा मेनू त्या मावशीनी सुंदर बनवला .

कधी कधी वाटते अशी ठिकाणे प्रकाशझोतात नाहीत तेच चांगले . इतर पर्यटनस्थळान्ची विकासाच्या नावाखाली झालेली हानी आठवते . तिथे होणारी पर्यावरणाची हानी ,ऐतिहासिक वास्तूंचे विडंबन , अस्वच्छता , प्लास्टिक चा अमर्याद वापर , पैशाचा बाजार हे सगळे आठवले की इथे लोक पोहोचली नाहीयेत हेच चांगले असे वाटते . परदेशात मात्र छोट्या छोट्या ऐतिहासिक गोष्टीना खूप महत्व देवून पर्यटकांना आकृष्ट केले जाते आणि तिथल्या इतिहासाचे , शौर्याचे , पराक्रमाचे कौतुक केले जाते , ते पाहिले की मात्र मनाला खिन्नता येते . नेपोलियन , अलेक्झांडर यांच्या तोडीस तोड असे आपले पूर्वज होते ; पण त्यांचा पराक्रम सांगायला, दाखवायला आज आमच्याकडे काही नाही . जे अवशेष शिल्लक आहेत ते फक्त पिकनिक स्पॉट झाले आहेत .
अर्थात जे शिल्लक आहे ते जतन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे . आणि त्यासाठी आपल्या समृद्ध अशा वारस्याची जाणीव  असणे गरजेचे आहे .स्वराज्याच्या कालखंडातील ही अदभूत अशी विहीर याच वारस्याची भाग आहे ; प्रत्येकाने एकदातरी पहावी अशीच आहे .

- अनिकेत शेटे , पुणे .

प्रत्यक्ष विहीर .

विहिरी वरील सिंहासन आणि बैठक व्यवस्था .

विहीरीवरचा महाल .

तळमजला .

तळमजला ते विहीर जोडणारा मार्ग 

तळमजल्यावर येण्याचा मार्ग 

तळमजल्या खालील खलबतखाना

विहिरीत उतरण्यासाठी मार्ग 

विहीर, तळमजला आणि महाल 

विहिरीकडे जाण्यासाठी प्रशस्त , रुंद पायर्या 


तळमजल्यावरून वर जाण्यासाठी अरुंद जीना 




3 comments: