श्री अमरनाथ दर्शनाला आज बरोबर एक महिना होतोय. मागल्या एक तारखेला, सोमवारी मी श्री अमरनाथ गुहेत भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतले. काही कारणान्मुळे यावेळी या परिक्रमेबद्दल लिहायला उशीर झालाय. पण आशा आहे माझे हे अनुभव वाचून या यात्रेबद्दल बरीच उपयुक्त अशी माहिती आपल्याला मिळेल. ही माहिती दोन भागात दिली आहे पहिल्या भागात यात्रेची माहिती, श्राईन बोर्डाकडून देण्यात येणार्या सेवा, यात्रेसाठी करायची तयारी, आणि यातील अनुभव आणि दुसर्या भागात प्रत्यक्ष यात्रेचा, दर्शनाचा माझा अनुभव या बाबत माहिती दिली आहे. फोटो आणि विडिओ एकदम खाली शेवटी आहेत.
* भाग १
*श्री अमरनाथ यात्रा पार्श्वभूमी*
श्री अमरनाथ यात्रा ही भारतातील अतिशय दुर्गम अशी यात्रा समजली जाते. श्री अमरनाथ धाम ला तीर्थांचे तीर्थ म्हटले जाते कारण इथेच भगवान शंकरानी अमरत्वाचे रहस्य माता पार्वतीला सांगितले. या यात्रे दरम्यान दक्षिण काश्मीर मधील दुर्गम अशा अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग दरवर्षी प्रकट होते आणि ते अंतर्धान पावल्यावर यात्रा समाप्त होते. भगवंताचा अद्भूत असा हा चमत्कार आहे. त्यामुळे या दरम्यान या काळात बाबा बर्फानींचे दर्शन घ्यायला खूप यात्रेकरू ही यात्रा दरवर्षी करतात. वर्षातील ठराविक दिवस ही यात्रा असते. सर्वसाधारण पणे जून चा शेवटचा आठवडा ते ऑगस्ट मधील शेवटचा आठवडा अश्या काळात ही यात्रा असते.
भारत सरकार ने श्री अमरनाथ यात्रेसाठी 'श्री अमरनाथ श्राईन बोर्ड' स्थापन केला असून यात्रे संबंधी सारे निर्णय या बोर्डाकडूनच घेतले जातात. दरवर्षी साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेसबंधी सूचना बोर्डाकडून देण्यात येते. दरवर्षी ही यात्रा किती दिवस असेल? हे श्राईन बोर्डाकडून आगावू सूचित केले जाते. ही यात्रा अत्यंत दुर्गम भागातून असून शारीरिक क्षमतेचा कस लावणारी आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छूक यात्रेकरूची आरोग्य तपासणी सरकारी दवाखान्यात केली जाते ; त्यात सार्या निकषांवर आपले शरीर योग्य असेल तरच ही यात्रा करण्याची परवानगी मिळते. १३ ते ७० वयोगटातील व्यक्ती या यात्रेत सहभागी होवू शकतात. देशभरातील कुठल्या इस्पितळात तपासणी करू शकतो तसेच ऑफलाईन नोंदणीसाठी कुठल्या बॅंकेत अर्ज करू शकतो याची यादी बोर्डाकडून जाहीर केली जाते.
यावर्षी ही यात्रा २९ जून ते १९ ऑगस्ट अशी ५२ दिवस आहे. ही यात्रा करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला पारंपारिक मार्ग म्हणजे पेहेलगाम मार्ग. याच मार्गाने भगवान महादेव माता पार्वतीला अमरनाथ गुहेपर्यंत घेउन गेले होते. पेहेलगाम पासून अमरनाथ गुहा ४८ कि.मी. आहे. दुसरा मार्ग बालटाल मधून आहे. बालटाल मार्गे अमरनाथ गुहा १४ कि.मी. आहे. मी पहिल्यांदाच ही यात्रा करणार असल्याने जाताना पेहेलगाम मार्गे आणि परतताना बालटाल मार्गे यायचे असे ठरवले. यात शिवपार्वतींच्या पारंपारिक मार्गाने जाणे आणि येताना बालटाल मार्गही बघून होइल असा उद्देश होता. बहुतेक जण असाच मार्ग निवडतात. बालटाल मार्गे अंतर १४ कि.मी. जरी असले तरी तो सरळ चढणीचा रस्ता असून पायी चढायला खूप अवघड आहे. पेहलगाम मार्गे गुहेपर्यंत जायला २-३ दिवस लागतात. बालटाल च्या तूलनेत पेहलगाम चा मार्ग कमी थकवणारा आहे. म्हणून उतरताना बालटाल मार्गे ( कमी अंतर आणि येताना उतरण ) येण्याचे ठरवले.
या यात्रेसाठी खूप चांगली शारीरिक क्षमता लागते. म्हणून बोर्डाकडून यात्रेआधी किमान दोन महिने रोज किमान १० कि.मी. चालणे आणि उंच ठिकाणी कमी ऑक्सिजन चा त्रास होवू नये म्हणून रोज प्राणायाम करण्याच्या सूचना दिल्या जातात.
*या यात्रेमागची मागची पौराणिक कथा*:-
एकदा माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ एकत्र असताना मातेने त्याना त्यांच्या अमरत्वाचे रहस्य विचारले. मातेने खूप आग्रह केल्यामुळे महादेवानी माता पार्वतीला हे अमरत्वाचे रहस्य सांगण्याचा निर्णय घेतला. यालाच अमरकथा म्हटले जाते. पण हे जीवन मृत्यूचे रहस्य माता पार्वतीशिवाय अजून कोणाला कळू नये म्हणून महादेवानी मातेला दूर अशा निर्जन गुहेत घेउन जाण्याचे ठरवले. जेणेकरून कोणी देवीदेवता तसेच सामान्य व्यक्ती हे रहस्य ऐकू शकणार नाहीत. यासाठीच महादेवानी आपल्या नंदी ला पेहेलगाम ला सोडले. आपल्या जटेतील अर्धचंद्राला चंदनवाडीला सोडले. गळ्यात धारण केलेल्या नागाला शेषनाग तलावात सोडले. श्री गणेशाला वाटेतील महागुण पर्वातावर सोडले. (या थांब्याला आता महागणेश टॉप म्हटले जाते) आपल्यातील पंचमहाभूतांचे अंश पंचतर्णीला सोडले. हे सगळे थांबे आजही या यात्रेत आहेत आणि भाविक यात्रेदरम्यान या ठिकाणी विसावा घेतात.
हे रहस्य कोणत्याही जीवाच्या कानावर पडू नये म्हणून महादेवानी कालाग्नीला सांगून या गुहेत अग्नी प्रज्वलित केला जेणेकरून कोणीही जिवित प्राणी तिथे रहाणार नाही. अशी सगळी खात्री केल्यावर महादेवानी गुहेत हरणाचे कातडे अंथरले आणि माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. हे रहस्य सांगून झाल्यावर माता पार्वती आणि भोलेनाथ एका बर्फाच्या लिंगात एकरूप झाले. असे म्हटले जाते की महादेवानी इतकी काळजी घेउनही एका धवल रंगाच्या कबुतराच्या जोडीने हे रहस्य गुपचूप ऐकले आणि ती जोडीही अमर झाली. आजही श्रावण पौर्णिमेला या गुहेत धवल रंगाची कबुतरे दिसतात. ही कबुतरे ज्याला दिसतात त्याला भाग्यवान समजले जाते.
पुढे या गुहेचा शोध भृगू ऋशीनी लावला आणि स्थानिकाना या अद्भूत अशा बर्फाच्या लिंगाबद्दल माहिती दिली तेव्हापासून स्थानिक लोकं श्रावण महिन्यात भगवान महादेव आणि माता पार्वती ज्या मार्गाने या गुहेत गेले त्याच मार्गाने या गुहेत महादेवांच्या दर्शनाला जातात. ( सांप्रत काळात ई.स. १८५० मध्ये बूटा मलिक नावाच्या व्यक्तीने या गुहेचा शोध लावला ही अत्यंत खोटी माहिती आहे ; इस्लाम चा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून हिंदू बाबा बर्फानींचे दर्शन घेत आहेत ; नीलमत पुराणात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे काश्मीर मध्ये हिंदूंच्या आधीपासून मुस्लीम वास्तव्य करत आहेत या फेक नॅरेटिव्ह ला हिंदूनी बळी पडू नये )
समुद्र सपाटीपासून अमरनाथ गुहा १३,५०० फूट उंचीवर आहे. गुहेची खोली १९ मीटर , रूंदी १६ मीटर , उंची ११ मीटर आहे.
*यात्रेसाठी तयारी*
यावर्षी साधारण मार्च महिना अखेर ला श्राईन बोर्डाकडून यात्रेसंबंधी सूचना आली. आणि एप्रिल पासून आरोग्य तपासणी सुरू होवून यात्रेसाठी नोंदणी सुरू झाली. आरोग्य तपासणी हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. पुण्यासारख्या शहरात हे सर्टिफिकेट मिळायला दोन पूर्ण दिवस लागतात. ग्रामीण भागात तूलनेने कमी वेळ लागतो. या तपासणी मध्ये रक्त , लघवी , छातीचा एक्सरे , डोळ्यांची नजर, कानांची ऐकण्याची क्षमता, मानसिक आरोग्य आणि स्त्रियांची सोनोग्राफी केली जाते. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये या तपासण्या कराव्या लागतात. मी तपासणी सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी सकाळी ८ ला हॉस्पिटल मध्ये गेलो तेव्हा माझ्या आधी किमान १५० लोकं रांगेत तपासणी साठी उभे होते. पूर्ण दोन दिवस दिल्यावर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट हातात पडते.
पेहेलगाम आणि बालटाल बेस कॅंप मध्ये सुद्धा आरोग्य तपसाणी करून On the spot registration करता येते. पण प्रत्येक वर्षी यात्रेला असलेल्या गर्दीवर तिथे registration किती वेळात होइल हे ठरते. कधी कधी २-३ दिवस थांबावे लागते. त्यामुळे मला ते risky वाटते.
यानंतर महत्वाचे काम म्हणजे यात्रेसाठी नोंदणी करणे. ही नोंदणी online / offline पद्धतीने करता येते. Offline साठी Punjab national bank, J & K bank, Yes Bank & SBI या बॅंकांच्या ठराविक शाखेत जावे लागते. आपल्या शहरात कुठल्या शाखेत ही सोय आहे, याची यादी सुद्धा श्राईन बोर्डाकडून प्रसिद्ध केली जाते.
यावर्षी बोर्डाने प्रत्येक दिवशी १०,००० यात्रेकरू दर्शनाला सोडायचे असे ठरवले होते. या १०,००० सर्वसाधारण विभागणी पुढीलप्रमाणे केली होती.
बालटाल मार्गे online नोंदणी : ३०००/ रोज
पेहेलगाम मार्गे online नोंदणी : ३०००/ रोज
offline नोंदणी ( बॅंक द्वारे ), हेलिकॉप्टर ने जाणारे प्रवासी आणि on the spot registration करणारे प्रवासी : 4000/ रोज
ही यात्रा करण्यापूर्वी मी याच खेपेत आधी वैष्णोदेवी करण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी माझ्या प्रवासाच्या तारखा आधीच ठरवल्या होत्या आणि रेल्वेची जातानाची आणि येतानाची तिकीटे आधीच काढून ठेवली होती. खरे तर असे कोणी करत नाही हे तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आले. एक कारण म्हणजे Online नोंदणी साठी तुम्हाला यात्रेचा हवा तोच दिवस मिळेल याची खात्री नसते. मिळाला तरी तुमचे application जर काही कारणाने रद्द झाले आणि परत प्रक्रीया करावी लागली तर ती तारीख परत मिळण्याची शक्यता कमी असते. याबबतीत offline registration बरे पडते. आपले application तिथेच चेक होते आणि आपल्याला हवी ती तारीख मागून घेण्याची संधी पण मिळते.
आणि दुसरे कारण म्हणजे श्री अमरनाथ यात्रेदरम्यान निसर्गाची अनिशितता. कधीही वातावरण बदलून पाऊस , बर्फ पडणे , यात्रा मार्ग बंद करावा लागणे असे प्रकार घडतात. तसेच अतिरेक्यांच्या कारवायान्मुळे सुद्धा काही वेळा यात्रा स्थगित करावी लागली आहे.
त्यामुळे बरेच जण जातानाची तिकीटे काढतात ; येतानाची मात्र काढत नाहीत. ती ऐनवेळी तत्काल मध्ये किंवा break journey दिल्लीपर्यंत करून पुढे पुढचा प्रवास करतात. माझे आधी श्री वैष्णोदेवीचे नियोजन असल्यामुळे मी २४ जून ची पुणे ते जम्मू अशी झेलम एक्स्प्रेस ची तिकीटे काढली. आणि ते दर्शन झाल्यावर मध्ये एक दिवस गॅप ठेवून श्रीअमरनाथ यात्रेसाठी नोंदणी ३० जून ची केली. म्हणजे या दिवशी चंदनवाडीतून माझी यात्रा सुरू होणे अपेक्षित होते. म्हणजे २९ जून ला संध्याकाळ पर्यंत पेहेलगाम बेस कॅंप पर्यंत पोचणे आणि त्याआधी २८ जून ला दुपारपर्यंत जम्मू मध्ये भगवती नगर बेस कॅंप पर्यंत पोचणे आवश्यक होते. ३० जून ला प्रत्यक्ष यात्रा सुरू झाली की पहिला मुक्काम ३० ला रात्री शेषनाग येथे , दुसरा १ जुलैचा मुक्काम पंचतरणी येथे आणि २ जुलै ला महादेवाचे दर्शन , परत २ ला संध्याकाळी बालटाल मार्गे बालटाल बेस कॅंप ला मुक्काम आणि ३ ला सकाळी जम्मू ला येणे आणि या सगळ्यात एक दिवस जास्तीचा ठेवून परतीची ४ जुलै ची तिकीटे मी काढली होती.
यात्रेसाठी नोंदणी आणि प्रवासाची तिकीटे काढून झाली की पुढचा भाग म्हणजे या यात्रेसाठी शारिरीक क्षमता कमावणे आणि सामान एकत्र करणे. यात्रेपूर्वी किमान एक महिना आधी मी रोज किमान ७ किमी चालणे सुरू केले होते. पण ते पुरेसे नाहीये. आता यात्रेवरून आल्यावर मी सांगू शकतो की पाठीवर किमान ५ किलोची बॅग घेउन रोज ७-८ किमी चालणे आणि आठवड्यातून २-३ वेळा पुण्यातील सोमाटण्याजवळील घोरावडेश्वरसारखी टेकडी चढून उतरणे एवढा सराव केला तर श्री अमरनाथ यात्रा सहज पूर्ण होवू शकते.
यात्रेची तयारी कशी करावी ? काय काय साहित्य सोबत घ्यावे याबाबत युट्यूब वर असंख्य video आहेत. त्यामुळे त्याबाबत जास्त काही लिहित नाही. पण माझ्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टींबद्दल थोडी माहिती देतो.
१) या यात्रेच्या तयारीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले बूट. बूट चांगले नसतील तर ह्या यात्रेत अनेक अडचणी येउ शकतात. Online/ Offline/ Decathlon असा बराच अभ्यास करून मी "उनाड भ्रमंतीचे" श्री जितेंद्र शिंदे यांच्याकडे धायरी ला जाऊन बर्फाळ प्रदेशात trekking साठी योग्य असे CTR चे बूट घेतले. मराठी माणूस या बूटांच्या व्यवसायात आहे आणि आवश्यक ती सगळी माहिती ते देतात. माता वैष्णोदेवी ३० किमी आणि श्री अमरनाथ यात्रा ४८ किमी अशी एकूण ७८ किमी पायी यात्रा झाल्यावर मी खात्रीने सांगू शकतो की CTR shoes सगळ्या दृष्टीने हे उत्तम आहेत. फक्त चांगले बूट घेउन थांबायचे नाही तर ते बूट घालून किमान १५ दिवस चालण्याचा सराव करणे आवश्यक आहे.
२) सोबत कमीतकमी पण आवश्यक ते सामान ठेवणे. आधी वैष्णोदेवी केल्यामुळे माझा एकूण दौरा मोठा झाला. त्यामुळे माझे सामन पण वाढले. जास्तीचे सामान भगवती नगर (जम्मू) ला ठेवता येते. पण प्रत्यक्ष यात्रेत जी बॅग सोबत घेणार आहोत ती पाठीवर घेण्याजोगी आणि वजनाला हलकी अशी असावी. यात्रा मार्ग इतका कठीण आहे की १० ग्रॅम जास्तीचे वजन सुद्धा नकोसे होते. या यात्रेत सामानाच्या बाबतीत माझ्या दोन चुका झाल्या. पाठीवर घ्यायची हॅवरसॅक मूळातच जड होती; सामान ठेवल्यावर ती खूप जड झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबत घेतलेला रेनकोट. Two piece मधला माझा रेनकोट हा पण खूप जड झाला. सोबत रेनकोट आवश्यक आहेच पण हाताच्या पंज्याएवढ्या पिशवीत घडी होणारे असे हल्ली ऱेनकोट मिळतात तो या यात्रेत खूप उपयोगी पडेल.
३) यात्रेदरम्यान वापरायची काठी : वैष्णोदेवी यात्रा मी काठीशिवाय केली. तिथे एवढी गरज नाही वाटली. पण अमरनाथ यात्रेत जाताना आणि येताना काठी ही आवश्यक आहेच. जाताना मी नेलेली काठी माझ्या घोडेवाल्याने वाटेत कुठेतरी सोडली त्यामुळे बालटाल मार्गे उतरताना माझ्यासोबत् काठी नव्हती. उतरताना सुद्धा मोठे तीव्र उतार आहेत तेव्हा तोल सांभाळण्यासाठी काठी सोबत असणे आवश्यक आहे. काठी नसेल तर उतरताना पायाच्या अंगठ्यावर ताण येतो आणि अंगठा जर बूटाच्या टोकाला लागत असेल तर त्याल दुखापत होण्याची पण शक्यता असते. तसेच या यात्रेत सोबत नेलकटर ठेवावे. पायाची वाढलेली नखान्मुळे पण उतरताना दुखापत होवू शकते. मी बूट घेताना एक नंबर पुढच्या नंबरचे घेतले होते; त्यामुळे उतरताना सोबत काठी नव्हती तरी माझे पायाचे अंगठे आणि बूट यात घर्षण आणि ताण येत नव्हता. म्हणून मी काठीशिवाय उतरू शकलो.
४) जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करण्यापूर्वी आधार चे Biometrics Unlock करणे आणि आधार सोबत मतदान कार्ड देखील ठेवणे.
काश्मीर मध्ये भारतातील कुठलेही Prepaid Sim चालत नाही. पठाणकोट च्या पुढे गेलो की आपल्या फोनचे network जाते. तिथे जाऊन यात्रा Sim घ्यावे लागते. आधार कार्ड दाखवून नवीन Sim कार्ड मिळते. पण आधार चे Biometrics Unlock असावे लागतात आणि तिथे गेल्यावर ते unlock करता येत नाहीत कारण Network नसल्यामुळे OTP आपल्या फोनवर येत नाही. माझ्यासोबत हा प्रकार झाला. सोबत मतदान कार्ड असल्यामुळे मला Sim मिळाले.
*भगवती नगर बेस कॅम्प*
या यात्रेसाठी बोर्डाकडून जम्मू मधील भगवतीनगर मध्ये कायम स्वरूपी असा बेस कॅंप बनवला आहे. ज्याना आर्मी कॉंनव्हॉय सोबत पेहलगाम / बालटाल ला पोचायचे आहे त्यानी या कॅंप मध्ये आपल्या यात्रा पर्ची वरील तारखेच्या आधी दोन दिवस येणे अपेक्षित आहे.
*आर्मी कॉनव्हॉय : आर्मी कडून यात्रेकरूना सर्वोत्तम अशी सुरक्षा*
अमरनाथ यात्रेकरू हे काश्मीर मधील आतंकवाद्यांचे कायमच लक्ष राहिले आहेत. यापूर्वी अनेक वेळा यात्रेकरूंवर हल्ला करून यात्रा बंद पाडण्यात आली आहे. असले दहशतीचे प्रकार परत घडू नयेत म्हणून या यात्रेकरूंच्या जथ्याला जम्मू पासून पेहेलगाम / बालटाल बेस कॅम्प पर्यंत च्या प्रवासाला आर्मी कडून सशस्त्र संरक्षण पुरवले जाते.
भगवती नगर बेस कॅम्प मध्ये प्रवेश करताना सर्व यात्रेकरूंची आणि त्यांच्या सामानाची कसून ३ वेळा आर्मी कडून तपासणी केली जाते. यात काही नशेचे पदार्थ , शस्त्र किंवा अन्य आक्षेपार्ह वस्तू आढळली तर ती जप्त केली जाते. भगवती नगर कॅंप मध्ये यात्रेकरूंसाठी सगळ्या सोयी आहेत. खाण्यासाठी लंगर , मोफत पिण्याचे पाणी , शौचालये , दवाखाना, बॅंक एटीम, यात्री सिम कार्ड्स, थंडीसाठी लागणारी उत्पादने , जास्तीचे सामान नाममात्र दरात ठेवण्यासाठी क्लॉक रूम, यात्रेकरूना आराम करण्यासाठी विविध प्रकारच्या खोल्या अशा सोयी देण्यात आलेल्या आहेत. इथे आल्यावर यात्रेकरूनी सगळ्यात आधी आपण ज्या मार्गाने (पेहेलगाम / बालटाल) जाणार तिथले बसचे तिकीट काढणे अपेक्षित असते. ते तिकीट काढले की यात्रेकरूला गाडीचा नंबर आणि सीट नंबर दिला जातो. त्या यात्रेकरूने रात्री १:३० वाजता त्या ठराविक गाडीत बसणे अपेक्षित असते. अशा सगळ्या गाड्या भरल्या की पहाटे ४:३० ला आर्मीच्या संरक्षणात सर्व यात्रेकरूंच्या गाड्यांचा जत्था निघतो.
जम्मू ते पेहेलगाम हे अंतर २३२ किमी आहे तर जम्मू ते बालटाल हे अंतर ३३५ किमी आहे. या संपूर्ण मार्गावर आर्मी च्या संरक्षणात जेव्हा यात्रेकरूंचा जत्था जातो तेव्हा तिथली लोकल वहातूक थांबवली जाते. पूर्ण रस्ता इतर वाहनांसाठी बंद केला जातो. विरूद्ध बाजूच्या रस्त्यावरील वहातूक सुद्धा थांबवली जाते. या रस्त्यावर आजूबाजूच्या गावातले येउन मिळणारे रस्ते काटेरी कुंपण घालून बंद केले जातात.
या कॉनव्हॉय मध्ये CRPF ची सशस्त्र वहाने ठराविक अंतराने यात्रेकरूंच्या बसेस च्या मागे पुढे गस्त घालत असतात. वर उल्लेखलेल्या संपूर्ण लांबीच्या रस्त्यावर दर ५० मीटर वर दुतर्फा किमान एक सशस्त्र सैनिक उभा असतो. वाटेत उभारलेल्या प्रत्येक चौकीवर ४-५ सशस्त्र सैंनिक उभे असतात, ते जाणार्या सगळ्या गाड्याच्या नंबरांची नोंद पण ठेवत असतात, दर २०० मीटर वर आर्मीचे सशस्त्र वाहन उभे असते. र्कॉनव्हॉय जात असताना त्यावर ड्रोन ने लक्ष ठेवले जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जिथे शक्य आहे तिथे रस्त्यावरील घरांवर उभे राहू सैनिक गस्त घालताना दिसतात. भारतीय सैन्याकडून अभूतपूर्व अशी सुरक्षा श्री अमरनाथ यात्रेकरूना पुरवली जाते. तासंनतास आणि दिवसेंदिवस यात्रेकरूंसाठी डोळ्यात प्राण आणून गस्त घालणार्या सैनिकांबद्दल कृतज्ञतेचा भाव दाटून येतो.
आमच्या बस चा चालक हा शांतीप्रिय होता. रात्रीपासूनच तो यात्रेकरूंशी उद्धटपणे बोलत होता. ज्यांच्यामुळे आपले पोट भरते त्यांच्याशी किमान योग्य भाषेत बोलावे याची त्याला गरज वाटत नव्हती. त्याने ठरल्यापेक्षा ऐनवेळी ३-४ प्रवासी जास्ती घेउन त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळले. पुढे जेव्हा आर्मी च्या कॉंनव्हॉय सोबत आमची बस निघाली तेव्हा वाटेत एकदा म्हणाला की "या एवढ्या बंदोबस्ताची काय गरज आहे? इथे काही होत नाही, सगळे शांत असते" म्हणजे काहीच दिवसांपूर्वी रियासी भागात माता वैष्णोदेवीच्या भक्तांवर झालेला हल्ला, अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या धमक्या या त्याच्या दृष्टीने फार काही महत्वाच्या नसाव्यात. (कारण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले भाविक हे हिंदू होते)
*बेस कॅंप मधील व्यवस्था*
पेहेलगाम मार्गे यात्रा करताना पेहेलगाम, शेषनाग, आणि पंचतर्णी येथे मुक्काम करावा लागतो. यातील प्रत्येक ठिकाणी बोर्डाकडून बेस कॅंप उभारलेला आहे. प्रत्येक बेस कॅंप ला देशातील विविध राज्यातून दरवर्षी भंडार्यांचे आयोजन केले जाते. आणि त्यामार्फत यात्रेकरूना चहा पाणी, नाश्ता - जेवण पुरवले जाते. भंडार्यांचे सेवेदार आग्रह करून यात्रेकरूना प्रसादासाठी बोलवत असतात.
प्रत्येक बेस कॅंप ला यात्रेकरूना रहाण्यासाठी बोर्डाकडून तंबूंची सोय केलेली आहे. बहुतेक करून कॅंप चे संचालक हे शांतीप्रिय समाजाचे आहेत. बोर्डाने प्रत्येक कॅंप मधील तंबूंसाठी आकारली जाणारी रक्कम निश्चित केली आहे. पण हे शांतीप्रिय ठेकेदार यात्रेकरूंकडून जास्तीचे पैसे आकारण्याच्या प्रयत्नात असतात.
प्रत्येक बेस कॅंप वरून गुहेकडे जाण्यासाठी घोडेवाले, हमाल आणि पालखीवाले यांचेही दर बोर्डाने निश्चित केले आहेत. ही कामे करणारे बहुतेक सगळे हे पण शांतीप्रिय समाजातलेच तरूण आहेत. हे देखील बक्षीसीच्या स्वरूपात हिंदू यात्रेकरूंकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्येक कॅंप मध्ये पुरेशी शौचालये उभारणे, तिथे पाण्याची सोय करून ती स्वछ राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, प्रत्येक तंबूत पुरेश्या उश्या, पांघरूणे, चार्जिंग आणि लाईट यांची सोय करून तंबू स्वछ ठेवणे ही त्या कॅंप संचालकाची जबाबदारी आहे. यातली तंबूंची स्वछता हा विषय फार गंभीरपणे घेतला जात नाही. एकदा तंबू लावला आणि उश्या आणि पांघरूणे आणून तिथे ठेवली की यात्रा संपेपर्यंत ती तिथेच असतात. दररोज रात्री येणार्या नवीन यात्रेकरूनी तीच पांघरूणे आणि उश्या वापरायच्या. यात जे यात्रेकरू यात्रेला उशीरा येतील त्याना तंबूमध्ये जास्त अस्वछता सहन करावी लागते.
प्रत्येक कॅंप मध्ये सुमारे २५० - ३५० तंबू असतात. याशिवाय भंडारा वाल्यांचे तंबू वेगळे. १५०-२०० शौचालये, १००-१२० नहाणीघरे. एवढ्या मोठ्या परिसरात अनेक यात्रेकरू हरवतात, आपल्या नातेवाईकांपासून मागे पुढे होतात. यासंबंधी उद्घोषणा करण्यासाठी सगळ्या कॅंप मध्ये ऐकू जाईल अशी ध्वनी प्रक्षेपण योजना केलेली नाही. भंडारे वाले आपल्या ध्वनी प्रक्षेपण योजनेद्वारे गाणी लावतात, आपल्या भंडार्याचे आमंत्रणे देतात पण आपातकालीन सूचनांसाठी सर्व कॅंप मध्ये ऐकू जाईल अशी ध्वनी प्रक्षेपण योजना केलेली नाही. या सगळ्या यात्रा मार्गात कुठ्ल्याच फोनच्या नेटवर्क ला रेंज नाही. त्यामुळे फोन असून त्याचा काहीही उपयोग नाही. प्रत्येक कॅंप मध्ये एक पब्लिक फोन असणे आवश्यक आहे. प्रत्येक कॅंप च्या प्रवेशद्वाराजळ आणि आतमध्ये अत्यावश्यक सोयी कुठल्या दिशेला आहेत याचे दिशादर्शक लावले गेले पाहिजेत.
यात्रेकरू जेव्हा एखाद्या कॅंप मध्ये येतो तेव्हा तो चालून / घोड्यावर बसून किंवा पालखीतून येताना दमलेला असतो. कधी एकदा तंबू बूक करून आडवे व्ह्यायला मिळते अशा विवंचनेत तो असतो. त्यानंतर फ्रेश होणे, भंडार्यामध्ये जेवायला जाणे आणि सकाळी पुढल्या प्रवासासाठी लवकर उठण्यासाठी लवकर झोपणे ही त्याची गरज असते. अशा वेळी शेकडो घोडेवाले, पालखीवाले, हमाल यात्रेकरूना गाठून किंवा त्यांच्या तंबूत जाऊन पुढल्या प्रवासाठी आपल्या सेवा हव्या आहेत का हे विचारून त्रस्त करतात. दुसर्या दिवशी ज्या यात्रेकरूना ह्या सेवा हव्या असतील ते संपर्क करतीलच पण आदल्या रात्री सगळ्या यात्रेकरूना प्रश्न विचारून त्रास देणे अजिबात योग्य नाही. पण कॅंप चे संचालक आणि ठेकेदार local असल्यामुळे घोडेवाले, हमाल आणि पालखीवाले यांच्या कॅंप मधील मुक्त संचाराला कसलाच धरबंद नाही. वास्तविक या लोकाना कॅंप मध्ये येण्याची परवानगी देताच कामा नये. कॅंप च्या बाहेर दुसर्या दिवशी सकाळी उभे राहून ते आपल्या सेवा देउ शकतात.
दुसरी आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे जम्मूला भगवती नगर बेस कॅंप मध्ये सुरक्षा तपासणी मध्ये कोणाकडे गुटखा, मावा, सिगारेट आहे का? हे चेक केले जाते. या गोष्टी सापडल्या तर त्या जप्त केल्या जातात. काही पुरूष या गोष्टी तपासणीच्या वेळी आपल्या सोबतच्या महिलांकडे ठेवायला देतात. म्हणून महिलांचीही कसून तपासणी केली जाते. पण एकदा भगवतीनगर कॅंप मधून पेहेलगाम मार्गे चंदनवाडीला यात्रा सुरू झाली की पुढे कसलेही चेकिंग होत नाही. आणि इथे शांतीप्रिय तरूण हिंदूना गुटखा, सिगारे , मावा या गोष्टी विकतात आणि हिंदू निर्लज्जपणे यात्रा मार्गात या गोष्टींचा आस्वाद घेतात. वाटेत थूंकतात , कचरा करतात. धर्म शिक्षण नसल्यामुळे हिंदूना यात्रेचे महत्व आणि पावित्र्य कसे जपावे याचे भान नाही आणि याचा फायदा घेउन शांतीप्रिय समाज आपले स्वत:चे अर्थकारण पोसतोय. यात्रा मार्गावर या निषिद्ध गोष्टी आम्ही सेवन करणार नाही असे प्रत्येक हिंदूने निग्रहाने ठरवले तर कोणाची या गोष्टी विकण्याची हिम्मत होइल का ?
संपूर्ण यात्रा मार्गात प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर होतो. प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे संदेश फलक जागोजागी आहेत पण कृतीच्या स्तरावर हा वापर रोखण्यासाठी काहीही योजना केलेल्या नाहीत. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी शांतीप्रिय समाजाचे विक्रेते चहा , पाणी , शीतपेये , काकड्या यांची दुकाने लावून बसतात. पण दुकानाजवळ एकही कचर्यासाठी पिशवी / बादली ठेवत नाहीत. तसेच यात्रेकरूही आपल्या हातातले प्लॅस्टिक कुठेही टाकून देतात. संपूर्ण यात्रामार्गाची रया या फेकलेल्या प्लॅस्टिक मुळे गेलेली आहे. कचर्याची पेटी दिसेपर्यंत आपला कचरा आपल्यासोबत ठेवावा हेसुद्धा हिंदूना शिकवण्याची गरज आहे.
यात्रेकरूना यात्रा करताना छोटे मोठे स्पीकर सोबत नेण्याची परवानगी दिली जाते. तळहातावर मावतील एवढ्या आकारापासून ढोलकीच्या आकाराएवढे स्पीकर यात्रेकरू सोबत आणतात आणि पूर्ण यात्रा मार्गावर त्यावर मोठ्याने गाणी लावली जातात. आपण तीर्थस्थळी भेट द्यायला जात असताना तिथल्या नैसर्गिक शांततेवर किती ओरखडे ओढतोय आणि संपूर्ण यात्रेचे वातावरण बिघड्वतोय याचे भान हिंदूना राहिले नाहीये.
संपूर्ण यात्रा मार्गावर ठिकठिकाणी शांतीप्रिय समाजाची लहान मुले भिक मागताना आढळली. म्हणजे हिंदू यात्रेकरूंकडून पैसे उकळण्याचा कुठलाही मार्ग सोडलेला नाही.
यात्रेचे अंतर आणि दुर्गम रस्ता आणि त्यामुळे येणारा थकवा हा वेगळा भाग आहे पण यात्रेदरम्यान हिंदूंची यात्रा चांगली व्हावी , त्याना कमीत कमी त्रास होवून या यात्रेचा आध्यात्मिक आनंद मिळावा यासाठी कुठलेही प्रयत्न दिसले नाहीत. उलट हिंदूंकडून जास्तीतजास्त पैसे कसे उकळता येतील , यात्रेदरम्यानच्या मूलभूत गरजा पूरवताना देखील हिंदूना त्याचा त्रास कसा होइल याची जास्त काळजी घेतली जाते असे माझे मत बनले.
जेवणाच्या सोयीसाठी मात्र देशभरातून विविध भंडारे इथे सेवा पुरवतात. भंडारे जर इथे नसते तर हिंदूना जेवण विकत घ्यावे लागले असते, त्याचे दर किती असते? आणि त्या अन्नाची गुणवत्ता काय असती? याचा विचार न केलेला बरा.
आर्मी आहे म्हणून सद्यस्थितीत हिंदू ही यात्रा करू शकत आहेत. वेळप्रसंगी आर्मीचे जवान घोडेवाले , पालखीवाले आणि यात्रेकरू यांतील वाद सोडवतात. लोकल लोकाना आर्मीची भिती आहे. त्यामुळे त्याना यात्रेकरूंची सरसकट लूट करता येत नाही. यावरून हिंदूंची देवळे , यात्रामार्ग , तिथे व्यवसाय करण्याच्या परवानग्या या हिंदूंच्या हातात असणे किती गरजेचे आहे हे जाणवले.
*यात्रा गर्दी*
यावर्षी श्राईन बोर्डाकडून प्रतिदिवस १०,००० यात्रेकरूना दर्शन घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. पैकी ३००० ऑनलाईन नोंदणी बालटाल मार्गे , ३००० ऑनलाईन नोंदणी पेहेलगाम मार्गे , तर उरलेले ४००० ऑफलाईन आणि हेलिकॉप्टर ने जाणार्यांसाठी अशी विभागणी केली होती. पण पहिल्या पाच दिवसातच १००,००० यात्रेकरूनी गुहेचे दर्शन घेतल्याचा विक्रम झाल्याची बातमी नुकतीच आली आहे. म्हणजे सरासरी २०,००० यात्रेकरू प्रतिदिवस. म्हणजेच कोटा पद्धत ठरवली गेली तरी श्राईन बोर्डाकडून प्रतिदिवसाची यात्रेकरूंची मर्यादा पाळली गेली नाही. त्या बाबतीत शिथिलता दाखवली गेली म्हणूनच एवढ्या विक्रमी संख्येने यात्रेकरूनी पहिल्या ५ दिवसात दर्शन घेतले.
म्हणजेच देशातील इतर कुठल्याही यात्रे मध्ये कोटा पद्धत नाही म्हणून तिथे अनियंत्रीत गर्दी होते आणि यात्रेकरूंच्या जीवाला धोका निर्माण होतो , आणि तिथल्या निसर्गावर, मानव निर्मित स्रोतांवर सुद्धा अचानक होणार्या गर्दीमुळे विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर श्री अमरनाथ यात्रेची कोटा पद्धत हे वेगळेपण होते पण ते ही आता पाळले जात नाही हे लक्षात येतेय.
*शिवलिंग सहाव्या दिवशीच अंतर्धान पावले*
दरवर्षी गुहेत शिवलिंग किती दिवस असेल याचा अंदाज घेऊन यात्रेचा काळ बोर्डाकडून निश्चित केला जातो. यावर्षी २९ जून ते १९ ऑगस्ट अशी यात्रेची समय मर्यादा निश्चित केली गेली.
पण यावर्षी यात्रा सुरू होवून सहाव्या दिवशीच (५ जून) शिवलिंग अंतर्धान पावले आहे. यावर्षीचा उन्हाळा हा जम्मू काश्मीर मधील सर्वात जास्त उष्णतेचा उन्हाळा आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे हिमालयातील ग्लेशिअर वितळणे फार आधीपासून चालू आहे. यात्रेकरूंची वाढलेली गर्दी. रोज दोन वेळा आरती च्या निमित्ताने गुहेत जमणारी गर्दी , सुविधेच्या नावाखाली बालटाल चा रस्ता हा गाडी गुहेपर्यंत नेण्यालायकीचा बनवण्याचे प्रयत्न आणि त्यासाठी गुहेभोवती वाढलेला मनुष्याचा वावर. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शिवलिंग लवकरच अंतर्धान पावले असे असू शकते.
यात्रा दुर्गम आहे ती दुर्गमच राहू द्यावी. ज्याना शक्य आहे तेच यात्रा करतील. गुहेपासून ६ किमी पर्यंत हेलिकॉप्टर ची सुविधा आधीपासून चालू आहे. आणखी सोय म्हणून गुहेपर्यंत गाडीसाठी रस्ता करून यात्रेच्या मूळ स्वरूपाला आपण धक्का लावत आहोत. गुहे भोवती जेवढी गर्दी कमी राहिल तेवढे जास्त दिवस महादेवांचे दर्शन भाविकाना होइल हे आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी एका भाविकाचे एकदा दर्शन झाले की त्याला परत दर्शनाची संधी किमान ३ वर्षानी दिली जावी. जेणेकरून दरवर्षी नवनवीन भाविकाना संधी मिळेल. यामुळे श्री अमरनाथ गुहेतील भगवंताचा अद्भूत चमत्कार आपण अधिक वर्षे अनभवू शकू. अन्यथा श्री अमरनाथ गुहेत शिवलिंग प्रगटणे बंद होवून हजारो वर्षे चालू असलेली ही यात्रा बंद पडेल की काय अशी भिती वाटते. प्रत्येक हिंदूने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
श्री कृष्णार्पणमस्तू !
*भाग २
*प्रत्यक्ष यात्रा मार्ग आणि शिवदर्शन*
दिवस १ :-
पहाटे ४:३० लाच आम्ही उठून तयार झालो. पेहेलगाम बेस कॅंप वर भली मोठी रांग लागली होती. या कॅंप चे प्रवेशद्वार आणि चंदनवाडीला जायचे द्वार वेगवेगळ्या दिशेला आहेत. साधारण ५:३०ला सर्वाना चंदनवाडीच्या दिशेच्या गेट मधून सोडण्यात आले. या गेटच्या बाहेर आल्यावर समजले की पेहेलगाम गाव आणि वस्ती इथे पुढे आहे. तिथून १६ किमी वर चंदनवाडी चेक पोस्ट आहे. इथे पोचायला सरळ रस्ता आहे. टॅक्सी करून इथे येता येते. गेट च्या बाहेर शेकडो टॅक्सी उभ्या होत्या. यावर्षी प्रति प्रवासी २००/- दर बोर्डाने निर्धारीत केले आहेत. एका जीप मध्ये किमान १०-१२ जणाना कोंबून आमचा जीप वाला सुसाट निघाला होता. घाट रस्ता अरूंद आणि दुहेरी वहातूकीचा असूनही वेग कमी करायची त्याची अजिबात इछा नव्हती. आम्हाला सोडून परतमागे १६ किमी येउन नवीन प्रवाश्याना घेउन जायची त्याला घाई होती. आम्ही मात्र जीव मुठीत धरून बसलो होतो. चंदनवाडीला पोहोचल्यावर RFID card आणि आचे सामान याची परत एकदा तपासणी झाली आणि आम्ही मुख्य यात्रा मार्गावर पोहोचलो.
इथे बरेच भंडारे आहेत. तिथेच आम्ही नाष्टा केला. चढायला मदतशीर अशा काठ्या विकत घेतल्या आणि सकाळी ७:४५ ला हिमालयाला , महादेवाला आणि निसर्गदेवतेला प्रार्थना करून प्रत्यक्ष यात्रेला सुरूवात केली. मी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर मध्ये गेलेलो. अत्तापर्यंत फक्त फोटोत बघितलेली पर्वत राजी , तिथली झाडे , निसर्ग जवळून पहात होतो. हवा पण सुंदर होती. थंड आणि प्रसन्न वातावरण होते. 'जय बाबा बर्फानी ; भुके को अन्न और प्यासे को पानी' , 'हर हर महादेव!' अशा घोषणा देत सहयात्री चालत होते. देशाच्या कानाकोपर्यातून सगळे आलेले असल्यामुळे विविध भाषा कानावर पडत होत्या. मध्येचा मराठी वाक्ये कानावर पडली की कुठले गाव? नाव काय? किती जण आहात? अशा प्रश्नोत्तरांची अदलाबदली व्हायची. वाटेत पिंपरी चिंचवड आणि कोकणातील अनेक जण भेटले. इतक्या लांब आपल्या गावचे कोणी भेटले की ती अनोळखी व्यक्ती असली तरी खूप आनंद होतो. पहिली चढाई पिसू टॉप पर्यंत होती. साधारण ४ किमी चा हा टप्पा यात्रेतला एक अवघड भाग समजला जातो. चढताना आपली पोटरी आणि पाउल यात ३०° चा कोन होइल अशी खडी चढण खूप दमवणारी आहे. तरी यावर्षी पायी यात्रेकरूंसाठी नवीन रस्ता सुरू केला आहे. जूना रस्ता घोडे आणि पिठ्ठू वाल्यांसाठी आहे. नवीन रस्ता पण खूप दमवणारा आहे. दोन दिवसांपूर्वीच वैष्णोदेवीची ३० किमी पायी परिक्रमा केल्यामुळे चालण्याचे काही वाटत नव्हते. पण चढताना लागणारा दम थकवणारा होता. छाती भरून येत होती. या यात्रेबद्दलचे अनेकांचे अनुभव आधी ऐकले होते त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे कितीही दमायला झाले तरी सतत जमिनीवर बसायचे नाही. एकदा का आपण बसलो की शरिराचे रक्ताभिसरण थांबते आणि थंड वातावरणात परत ते चालू व्हायला बरीच उर्जा खर्च होते आणि पुष्कळ थकवा येतो. त्यामुळे कितीही थकायला झाले तरी उभ्या उभ्याच विश्रांती घ्यायची. काठीवर डोके टेकवून उभे रहायचे. तोंड बंद ठेवून फक्त नाकानेच श्वास घ्यायचा. एकावेळी दोन पावले टाकायची आणि परत हवे तर थांबायचे पण चालत रहायचे. हे मी केल्यामुळे तूलनेने कमी दमायला झाले. वाटेत अनेक दुर्गम अशा भागात सैनिक उभे दिसले. ' आता फार थोडे अंतर राहिले असे सांगून ते आमचा उत्साह वाढवत होते' कोणी शहाणपणा करून दरीच्या बाजूला रेलिंग वर उभे रहात असेल , selfie काढत असेल तर त्याना दटावत देखील होते. संपूर्ण यात्रा मार्गात या सैंनिकांच्या नुसत्या तिथे उभे असण्याने खूप धीर मिळतो. त्यांचा खूप आधार वाटतो. लहान, मोठे , वयस्कर , स्त्री - पुरूष सगळ्यांशी ते प्रेमाने वागतात. मदत करतात. मोजक्या गप्पा देखील मारतात. जम्मू पासून यात्रा पूर्ण करून परत जम्मू ला पोहोचेपर्यंत भारतीय सेना ही यात्रेकरूंच्या रक्षणासाठी उभी आहे. या सैंनिकांप्रती जितकी कृतज्ञता व्यक्त करू तितकी कमीच आहे.
पिस्सू टॉप ला मी साधारण १०:१५ ला म्हणजे सव्वा दोन तासानी पोचलो. आणि तिथे जमिनीवर स्वत:ला लोटून दिले. वातावरण थंड असल्यामुळे घाम येण्याचा प्रश्न नव्हता. पण शरीर दमले होते. उंची जसजशी वाढत जाणार तसा थकवा वाढणार होता. १०-१५ मिनिटे आराम करून तिथक्या भंडार्यामध्ये फलाहार केला आणि पुढे निघालो. पहिल्या दिवसाचा मुक्काम शेषनाग येथे होता. ते अजून खूप लांब होते. चंदनवाडीपासून शेषनाग १३ किमी आहे. ज्याना पहिल्याच दिवशी पंचतरणी पर्यंत जायचे असते त्यानी शेषनाग कॅंप दुपारी २ पर्यंत पार करणे आवश्यक असते. दुपारी २ नंतर शेषनाग च्या पुढे कोणाला जाऊ देत नाहीत. यात्रेची माझी पहिलीच वेळ असल्याने पुढे रस्ता कसा आहे याची कल्पना नव्हती आणि अशा ठिकाणी आपली शारिरीक क्षमता कशी आहे याचा काहीही अंदाज नव्हता त्यामुळे मला काही घाई नव्हती. मी आरामात जाऊन पहिला मुक्काम शेषनाग लाच करायचा असे ठरवले होते. त्यामुळे मला वेळेचे बंधन नव्हते.
पिस्सू टॉपला घोड्यांचा रस्ता येउन मिळाला होता. त्यामुळे आता घोडेवाले , पिठ्ठू वाले, पालखीवाले आणि पायी यात्रेकरू एकाच रस्त्याने जात होतो. त्यामुळे चालण्याच्या वेगावर मर्यादा आली होती. कधी कधी गर्दीमुळे घोडे अंगाला लागत होते. पण त्यांची भिती वाटत नव्हती.
वाटेत इतक्या पर्वत रांगा लागत होत्या, कुठली रांग कुठे सुरू झाली आणि कधी संपली कळत नव्हती. पण प्रत्येक रांग सुंदर दिसत होती. किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. मध्येच कधीतरी सुकलेल्या पांढर्या बर्फाची चादर घेतल्याप्रमाणे काही पर्वत दिसत होते तर काहीवेळा शुभ्र पाण्याने वहाणारी नदी आणि तिच्या मार्गात मध्येच गोठलेला बर्फ आणि त्या बर्फाखालून गडप झालेले वहाते पाणी काही अंतरावर अचानक प्रगट होइ. खूप सुंदर वातवरण होते. मुख्य म्हणजे ह्या यात्रेचा साधारण दीड महिना सोडला तर बाकी वर्षभर या मार्गावर कोणी येत नाही, इथे कायमची वस्ती नाही, हिवाळ्यात तर बर्फच बर्फ असतो सगळीकडे. मनुष्याच्या अस्तित्वापासून ह्या पर्वतराजी लांब आहेत म्हणून त्या अगदी कोर्या करकरीत, ताज्या भासतात. एकदा का माणूस निसर्गात कायमचा आला की ती जागा विद्रूप व्हायला सुरूवात होते.
वाटेत लागणार्या सगळ्या टप्प्यांची अंतरे किती बाकी आहेत ; याची माहिती देणारे बोर्ड आहेत. पण एकाही बोर्ड्वर लिहिलेले अंतर मनाला पटले नाही. ती फसवी, कमी लिहिली असावीत आणि आपण यापेक्षा खूप चाललोय असे वाटले. एकतर ही अंतरे हवाई अंतरे असावीत किंवा चालण्याच्या अतिश्रमामुळे वस्तूस्थिती accept करण्याची मनाची ताकद संपली असावी.
पेहेलगाम मार्गे जाताना वाटेत पिस्सू टॉपला फक्त एअरटेल चे नेटवर्क मिळाले. पुढे गुहेपर्यंत ते कधी मिळाले नाही. BSNL आणि Jio ला रेंज होती. बालटाल मार्गे येताना मात्र एअरटेल ला पूर्ण मार्गावर रेंज होती.
आता दुपार झाली आणि मी झोझिबाल ला पोचलो. इथे पण २-३ मोठे भंडारे होते. भूक लागली होती पण त्याआधी विश्रांती हवी होती. सावली कुठेच नव्हती. सरळ गवतावर उन्हात आडवा झालो. आजूबाजूला वेगवेगळ्या उंचीचे पर्वत , डोक्यावर ऊन , पण त्या उन्हातसुद्धा पाठीवरची बॅग खाली ठेवल्यावर आणि पाघ जमिनीला टेकल्यावर खूप बरे वाटत होते. अर्धा तास तशी विश्रांती घेतल्यावर भंडार्यामध्ये जाऊन जेवण घेतले. आणि परत थोडा वेळ विश्रांती घेतली. इथून शेषनाग ५ किमी होते. आणि दुपारचे पावणे दोन झाले होते. म्हणजे साधारण ५ पर्यंत मी शेषनाग ला पोचेन असे वाटले होते. विश्रांती नंतर परत चालायला सुरूवात केली. या यात्रेत आणखी एक आलेला अनुभव म्हणजे चालताना ८०% वेळ माझा नामजप झाला. त्यामुळे मनात अनावश्यक विचार आले नाहीत. एरव्ही अनावश्यक विचार करून आपण किती थकतो ते यावेळी जाणवले. मन शांत असले की दमायला पण कमी होते. उलट नामस्मरण आपल्याला उर्जा देते.
वाटेत एक बर्फाची प्रचंड शिळा लागली. आयुष्यात पहिल्यांदा बर्फ एवढ्या जवळून पाहिला. त्याला हात लावून , त्यावरचा बर्फ हाताने खरवडून बघितला , फोटो काढले. बर्याच वर्षांची इछा पुरी झाली.
पुढे नागाकोटी हे ठिकाण लागले. इथे BSNL चे towers आहेत. जास्तीकरून हे सैन्याच्या वापरासाठी असावेत. इथे Medical Camp पण आहे. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर परत प्रवास सुरू झाला आणि वातवरणात बदल जाणवू लागला. समोर दिसणार्या पर्वतान्मध्ये हिरवी छटा दिसू लागली आणि जसजसे पुढे गेलो तशी ती छटा मोठी होवू लागली. मग समजले की हा शेषनाग तलाव आहे. गुहेकडे जाताना याच तलावात महादेवानी आपल्या अंगावरील नागराजाला सोडले होते. आणि इथेच आमचा पहिल्या दिवसाचा मुक्काम होता. तलाव दिसला म्हणजे कॅंप जवळ आला असे समजून मी खूष झालो. आणि याच दरम्यान माझ्या उजव्या गुडघ्यात दुखायला लागले. आता कॅंप वर जाऊन बघू अशी स्वत: ची समजूत काढून मी चालत राहिलो. जिथून पहिल्यांदा तलाव दिसला तिथून साधारण ३ किमीची, तलावाला उजव्या हाताला ठेवून अर्ध प्रदक्षिणा झाल्यावर कॅंप दिसतो. तिथे पोचायला अजून अर्धा किमी चालावे लागते. कॅंपला पोचेपर्यंत सगळी शक्ती संपली होती. आता तिथे जाऊन तंबू बूक करायचा होता, मग प्रसाधनगृहे शोधून फ्रेश होवून मग आडवे व्हायचे होते. नंतर रात्री जेवायला भंडार्यामध्ये जायचे होते. खरे तर काहीच करायची ताकद नव्हती. दोन्ही खांदे , दोन्ही पाय , मांड्या आणि विशेष करून उजवा गुडघा खूप दुखत होते.
दिवस २:-
रात्री तंबूत झोपताना गुडघ्याला तीळाचे तेल लावले. पण गुडघा खूपच दुखत होता. दुसर्या दिवशी काय करायचे हा विचार मनात होता. देवाला प्रार्थना करून झोपलो. सकाळी उठून सगळे आवरले. गुडघा दुखायचा थांबत नव्हता. अजून निम्मे अंतर ही झाले नव्हते. आणि पुढचा रस्ता कसा आहे याचा अंदाज ही नव्हता. वाटेत काही त्रास होण्यापेक्षा घोडा करायचा ठरवले. माझ्या तंबू वाल्याला सांगून शेषनाग पासून गुहेपर्यंत घोडा ठरवला.
पुढला मुक्काम पंचतरणीला होता पण तिथे मुक्काम करून पुढे चालत जाता येइल का याबबत अत्ता निर्णय घेणे कठीण होते. कुठल्याही स्थितीत मला दर्शन घेतल्याशिवाय माघारी जायचे नव्हते. किंवा अनिश्चित काळासाठी मेडिकल कॅंप मध्ये अडकून पडायचे नव्हते. त्यात तिथला निसर्ग कधी बदलून पाऊस / बर्फ पडायला लागेल याचाही नेम नाही. मनातून महादेवाला परत एकदा मनापासून प्रार्थना केली. आणि थेट गुहेपर्यंत घोड्याने जायचा निर्णय घेतला. शेषनाग ते अमरनाथ गुहा हे अंतर २० किमी आहे. सकाळी निघालो तरी गुहेपाशी पोचायला संध्याकाळ होणार. परत पंचतरणी ला येण्यापेक्षा वाटेत संगम ला रहायची सोय झाली तर तिथे राहू किंवा बालटाल मार्गावर राहू किंवा नाईलाज झाला तर पंचतरणीला परत येऊ असे ठरवले. पंचतरणी ते गुहा ६ किमी अंतर आहे. आणि परत जाताना बालटाल मार्गे जायचे नक्की होते त्यामुळे पंचतरणीला परत येणे म्हणजे ६ किमी + ६ किमी चालणे उगाच वाढवणे. म्हणून दर्शन झाले की परत पंचतरणी टाळायचे होते. असे सगळे विचार डोक्यात चालू होते. आमच्या घोडेवाल्याने शेषनाग कॅंप मधील आणखी एक कुटूंब सुद्धा माझ्याबरोबर घोड्यावरून येइल असे सांगितले. मी सकाळी ६:३० ला आवरून तयार होतो. त्या कुटूंबात नवरा बायको आणि दोन मुली होत्या. त्याना आवरायला खूप वेळ लागला. त्यात त्या कुटूंबातील आईचे बूट तंबूमधून रात्री चोरीला गेले. आपले सामान इथे खूप जपावे लागते. मग कॅंप मध्येच १-२ दुकाने होती तिथे जाऊन त्यानी नवीन बूट घेतले. हे सगळे होइपर्यंत ८:३० झाले. आम्ही बेस कॅंप बाहेर उभे असलेल्या घोड्यांजवळ पोहोचलो. एक एक करून सगळे घोड्यावर बसलो. माझ्या पाठीवर मोठी हॅवरसॅक होती आणि हातात अजून एक छोटी सॅक होती. ती सॅक आणि काठी घोडेवाल्याकडे दिली. त्याचे नाव 'हुसेन' होते. आणि माझ्या घोड्याचे नाव 'हीरा' होते. लहानपणी महाबळेश्वर च्या सहली मध्ये एकदा घोड्यावर बसलो होतो. पण लहानपणापासून मला घोडा खूप आवडतो. 'हीरा' सुद्धा फ्रेश दिसत होता. तो नऊ वर्षांचा होता. वैष्णोदेवी ला घोडेवाले घोड्याना कसे पोटात गुद्दे मारतात, त्यांच्या शेपट्या पिळून त्याना कसे पिळवतात, त्यांच्या तोंडातून फेस आलेला असताना आणि त्यांचे प्राण डोळ्यात आलेले असताना सुद्धा फक्त पैशासाठी त्याना कसे अमानुषपणे वागवतात हे नुकतेच पाहिले असल्यामुळे मी हुसेन ला आधीच त्याबद्दल सांगितले. आपल्याला लवकर गुहेपर्यंत जायचे आहे पण त्यासाठी घोड्याला काही त्रास द्यायचा नाही. त्याच्या खाण्याच्या, पाणी पिण्याच्या आणि विश्रांतीच्या वेळा पाळायच्या. आणि असे नाही झाले तर मी घोड्यावरून खाली उतरेन. 'हीरा'वर बसण्याआधी मला एका लहान वयाच्या घोड्यावर बसायला सांगितले होते. पाठीवर हॅवरसॅक घेउन डाव्या रीकीबीत पाय घातल्यावर उजवा पाय घोड्याच्या पाठीवरून पलीकडे उजव्या रिकीबीत नेताना माझे शरीर घोड्याच्या पाठीवर मला adjust करता आले होते. तसेच त्या घोड्यावरून उतरताना उजवा पाय रिकीबीतून सोडवून घोड्याच्या डोक्यावरून डाव्या बाजूला आणून उतरणे मी करू शकलो हे हुसेन पाहिले होते. हे सगळे माझ्या उंचीमुळे मला जमले असावे. त्यामुळे मी घोड्यावरून उतरेन म्हटल्यावर मी खरच तसे करू शकतो हे त्याला जाणवले असावे. नाहीतर बर्याच जणाना आणि बहुतेक वेळा महिला वर्गाला घोड्यावर चढता / उतरताना घोडेवाल्याचीची मदत ही घ्यावी लागते. त्याशिवाय ते चढू / उतरू शकत नाहीत. मी जे सांगितले त्याला त्याने होकारार्थी मान हलवली. आणखी दुसरे कारण म्हणजे इथे घोड बूक करताना जी पावती फाडली जाते ती प्रवास पूर्ण होइपर्यंत प्रवाश्यांकडेच असते. ती प्रवास पूर्ण होण्याआधी घोडेवाल्याला द्यायची नसते. माघारी आल्यावर ती पावती दाखवूनच त्याना त्यांचे पैसे मिळतात. एक प्रकारे त्यांचा जीवच त्या पावतीत असतो. त्यामुळे शक्यतो ते प्रवाश्यांचे ऐकतात. वाटेत त्याना सोडून देणे, जास्त पैसे मागणे, भांडण करणे, इतर घोडेवाल्याना सोबत घेउन दबाव आणणे असले प्रकार आता ते करू शकत नाहीत.
घोडावर बसताना काय काय करायचे हे हुसेनला विचारून घेतले. तो म्हणाला , 'हातातला लगाम हा ब्रेक आहे, घोड्याला ज्या तीव्रतेने थांबवायचे त्या तीव्रतेने तो ओढायचा. तोच लगाम ढिला सोडणे म्हणजे Accelator आहे. घोड्याला उजवीकडे जाण्यापासून रोखायचे असेल तर लगाम उजवीकडून ओढायचा. तसेच डाव्या बाजूसाठी. चढाव लागला तर आपले वजन पुढे वाकून घोड्याच्या पुढील बाजूवर टाकणे जेणेकरून चढताना आपल्या वजनाने त्याचे पुढील पाय वर हवेत नको जायला. तसेच उतरण असेल तर आपले वजन पाठी वाकून त्याच्या पाठच्या बाजूवर टाकणे.' एवढ्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर काही त्रास होत नाही. घोडा हा अतिशय हुशार आणि उमदा प्राणी आहे. चढण आणि उतारावर आपले वजन नीट Adjust केले की त्याला पण आपल्याला नेणे सोपे जाते. अमरनाथ यात्रेत हे वजन Adjust करणे दर ३-४ मिनिटाने करावे लागते. इतका मार्ग वर खाली असा आहे.
बरेच जण घाबरून घोड्यावर बसतात. हातात लगाम घेत नाहीत. फक्त खोगीर धरून बसतात. रस्ता असेल त्याप्रमाणे आपले वजन Adjust करत नाहीत मग ते घोड्यावर एखादे पोते ठेवल्याप्रमाणे दिसतात. सामानाचे पोते जसे वर् खाली होते तसे ते होतात. वजन Adjust न केल्याने कधीतरी पडतात देखील. पूर्ण प्रवासात माझ्या समोर ३-४ बायका घोड्यावरून पडल्या. आणि अजून घाबरल्या. घोडा सहसा स्वत:हून आपल्याला पाडत नाही. अमरनाथ चा यात्रा मार्ग इतका अरूंद आहे की सोबत जाणारे घोडे, समोरून येणारे घोडे आणि पिठ्ठूवाले, पायी यात्रेकरू यांच्यामुळे कधी कधी Traffic जाम होते. तेव्हा घोडे एकमेकांवर आपटणे, घोड्यानी आपली लेन सोडणे, हे प्रकार सर्रास घडतात. घोडेवाला आपल्या सोबत असतो पण आपण घोड्यावर असतो तेव्हा घोडा आपण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. लगाम हातात घेउन आपण कृती केली तर घोडा त्याप्रमाणे चालतो. पण बर्याच वेळा प्रवासी घोडा दुसर्या घोड्याला धडकला , किंवा लेन सोडून भलतीकडेच निघाला , समोरून येणारा घोडा आपल्यालाला घासून गेला की नुसते ओरडत रहातात किंवा घोडेवाल्याला पण बोलतात. घोडेवाले सतत असातातच सोबत पण कधीकधी ते पण मागे पुढे राह्तात. तेव्हा प्रवासी घाबरून आरडाओरड करतात.
आमचा प्रवास सुरू व्हायला ८:४० झाले. उशीर झाला होता आणि शेषनाग चा पुढला रस्ता अरूंद असल्यामुळे तिथे Traffic जाम झाले होते. त्या वेळात हुसेन कडून ' हीरा' बद्दल वरील सगळी माहिती घेतली. आमच्या सोबत असणार्या कुटूंबातील पुरूष ज्या घोड्यावर बसला होता तो घोडा 'हीरा'चा भाऊ होता. त्यामुळे 'हीरा' सतत त्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर आपले तोंड घासायचा. काही झाले तरी 'हीरा' आपल्या भावाला सोडणार नाही आणि त्याच्या पुढेही जाणार नाही असे हुसेन ने सांगितले आणि पूर्ण यात्रेत हे खरे झाले. कधी 'हीरा' आणि त्याच्या भावात मध्ये इतर घोडे आले तरी 'हीरा' काहीही करून भावाच्या मागे रहायचा प्रयत्न करायचा. हळूहळू Traffic सुटले आणि आम्ही वर जाऊ लागलो. ' हीरा' खरच समजूतदार होता. त्याच्या पाठीवर थाप मारून मी त्याच्याशी बोलत होतो ते त्याला समजत असावे. हुसेनने सांगितल्याप्रमाणे मी लगाम हाताळत होतो आणि माझे वजन सांभाळत होतो. मी बोललेलो त्याला कळत होते. गर्दी झाली की तो थांबायचा, दिशा सांगितली की त्या दिशेने जायचा. हळू चल म्हटले की हळू चालायचा. मला कमाल वाटत होती. माझा काही परिचय नसताना ' हीरा ' किती छान वागत होता माझ्याशी !
घोड्यावरून प्रवास सुरू झाला पण सुरूवातीला आजूबाजूला निसर्गाकडे लक्षच नव्हते. कारण तेव्हा फक्त 'हीरा' कडेच लक्ष होते. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आजूबाजूला लक्ष गेले. घोड्यावर असल्यामुळे फोटो काढायला मर्यादा आली होती. जेवढे शक्य तितके फोटो काढले.
बर्याच वेळा वाटेत Traffic जाम होत होते. यात पायी यात्रेकरूंचे हाल होतात. पहिल्या दिवशी मी अनुभवले होतेच. आपले सामान आणि काठी घेउन चढणे इतके कठीण आहे त्यात घोडेवाले सारखे बाजूला व्हा , बाजूला व्हा म्हणत मागे पुढे ये जा करत असतात. कित्येक वेळा आपण ज्या दिशेने जातोय त्याच दिशेने समोरून घोडा येतोय म्हणून आपली दिशा बदलण्याची ताकद पण तेव्हा नसते. घोडेवाल्यानी दरीच्या बाजूने आणि पायी यात्रेकरूनी डोंगराच्या बाजूने जायचे हा इथे नियम घालून दिला आहे. पण घोडा हा प्राणी आहे त्याला हा नियम माहित नसतो. तो मोकळा रस्ता दिसला की आपली बाजू बदलतो. तेव्हा त्यावर बसलेल्या प्रवाश्याने आणि घोडेवाल्याने त्याला परत एका बाजूला आणणे आवश्यक असते. या सगळ्या गडबडीत आपले पाय पायी प्रवाश्याना लागतात , समोरून येणार्या घोड्यावरील प्रवाश्याची ढोपरे आपल्याला लागतात. त्या स्थितीत आपण फार काही करूही शकत नाही. सहप्रवाश्याची माफी मागणे हाच पर्याय असतो.
मजल दरमजल करत आम्ही महागणेश टॉप ला पोचलो. इथेच महादेवानी श्री गणेशाला सोडले होते. ही जागा समुद्रसपाटीपासून १४५०० फूट उंचीवर आहे (म्हणजे निम्मे एव्हरेस्ट!) इथे आम्ही चहासाठी थांबलो. उंच असल्यामुळे सभोवती बर्फाछादित पर्वतराजी होती. थोडे फोटो काढले. इथे काही जणाना ऑक्सीजनच्या कमतरतेचा त्रास होतो. इथून पुढे उतरण आहे. चढण जवळजवळ नाहीच.
साधारण २-३ किमी नंतर अमरनाथ यात्रेतील प्रसिद्ध असा 'पोषपत्री' भंडारा लागला. आम्ही इथे जेवायला थांबलो. प्रत्येक अमरनाथ यात्रेकरूने इथे एकदा भेट द्यावीच. अत्तापर्यंत यात्रेतील भंडारा म्हणजे २-३ पदार्थ -मुबलक प्रमाणात असे स्वरूप होते. पण हा भंडारा याला अपवाद आहे. एखाद्या तारांकित हॉटेलप्रमाणे इथे किमान १०० ते १२५ पदार्थ एकावेळी असतात. उत्तर भारतीय / दक्षिण भारतीय, चायनीझ, मिठाई, फळे, फळांचे रस, चाट, जे काही खायला हवे ते इथे मिळते. यात्रेकरूंसाठी अक्षरश: चंगळ असते. आम्ही सुद्धा इथल्या व्यंजनांचा आस्वाद घेतला. पण जास्त वेळ थांबू शकलो नाही. कारण आम्हाला दुपारी २ च्या आत पंचतरणी बेस कॅम्पचे गेट पार करायचे होते तरच आम्ही पुढे गुहेपर्यंत जाऊ शकणार होतो. आता उतरणीचा रस्ता होता. पंचतरणी कॅंप जसा जवळ येत होता तसा हेलिकॉप्टरचा आवाज जवळून आणि सतत येत होता. पंचतरणीलाच हेलिपॅड आहे. पेहेलगाम वरून हेलिकॉप्टर ने येणारे प्रवासी पंचतरणीला उतरतात आणि इथून पुढे पायी / घोड्याने / पालखीने गुहेपर्यंत जातात.
पंचतरणी कॅंप ११५०० फूटांवर म्हणजे तूलनेने सखल भागात आहे. त्यामुळे कॅंप च्या भोवती मोठ्मोठे पर्वत आणि मध्ये या कॅंप च्या आवतीभवती मोकळ्या पटांगणासारखी जागा आहे. आम्ही दुपारी दीड ला कॅंप चे गेट पार करून पुढे जाऊन जरावेळ थांबलो. अर्धा दिवस होवून गेला आणि इथून पुढे अजून ६ किमी वर गुहा आहे. घोड्यांना थोडी विश्रांती झाल्यावर परत प्रवास सुरू झाला. हा टप्पा पण दमवणारा आहे. इथे मोठी चढण आहे. समोरून माघारी येणार्या लोकांची गर्दी खूप असते. दर्शन घेउन माघारी मुक्कामी येणारे, दर्शन घेउन हेलिकॉप्टरने माघारी जाणारे, यात्रेकरूना गुहेपाशी सोडून रिकामे माघारी येणारे घोडेवाले , पालखीवाले आणि दर्शनाला जाणारे आम्ही अशी सगळी गर्दी असते. वेग मंदावतो. वाटेत सैनिक Traffic जाम होवू नये म्हणून Traffic Police चे काम करतात अरूंद रस्त्यावर एका बाजूची वहातूक थोडा वेळ थांबवून दुसरी बाजू मोकळी करतात. असे करत करत आम्ही ' संगम ' या ठिकाणी पोचलो. इथून बालटाल वरून येणार्या रस्त्याला जाता येते म्हणून याला 'संगम ' म्हणतात. तिथे रहायची काही सोय नाहीये म्हणजे दर्शन झाले की एकतर बालटाल मार्गे परतीचा प्रवास सुरू करायचा किंवा पाठी पंचतरणीला येउन मुक्काम करायचा हेच दोन पर्याय आहेत हे समजले.
अजून थोडे पुढे गेल्यावर पहिल्यांदा आम्हाला दूरून श्री अमरनाथ गुहेचे दर्शन झाले. तिथून गुहा ३ किमी लांब होती. गुहेहवळील भिंतीला लाल रंग दिला आहे. तो लाल रंग एका ठिपक्याप्रमाणे अत्ता दिसत होता. पण तेवढ्या एका दर्शनाने मनाला खूप हुरूप आला आणि त्याच दरम्यान तिथे एअर टेलला रेंज आली. लगेच आईला फोन करून तिच्याशी बोललो. कालपासून माझी खुशाली तिला नीट कळली नव्हती. आणि इथून पुढे त्या लाल ठिपक्याकडे बघतच आम्ही जाऊ लागलो डाव्या बाजूला दरी आणि त्यापलीकडे डोंगराच्या मध्यभागातून जाणारी बालटाल मार्गावरची वाट दिसत होती. त्या बाजूचे यात्रेकरू दिसत होते. आता कधी एकदा गुहेपाशी पोचतोय असे झाले होते. या मधल्या दरीत अमरावती नदी वहाते. तिचा आवाज येत होता. थोडे पुढे गेल्यावर घोड्यांसाठी शेवटचा टप्पा आला आणि आम्ही खाली उतरलो. घोडेवाल्याना त्यांच्या पावत्या दिल्या. तिथे आजूबाजूला बरीच गर्दी झाली होती आता गुहा जवळून दिसू लागेली होती. तरी अजून दीड किमी चालयचे होते. हे सर्वात त्रासदायक वाटत होते. गुहा तर समोर दिसतेय पण अजून चालायची ताकद नव्हती. वैष्णोदेवी यात्रेचे ३० किमी , चंदनवाडी ते शेषनाग १३ किमी , तिथून पुढे घोड्याने २० किमी असे अंतर पार करून इथे आलो होतो. घोड्यावर इतका वेळ बसल्याने पाठ आणि सीट चा भाग खूप ठणकत होते. घोड्यावरून उतरल्यावर त्याची जास्त जाणीव झाली. मध्ये मध्ये थांबत पाठीवर दोन बॅग सांभाळत आम्ही चालू लागलो. माझी दुसरी बॅग वाटेतच हुसेन ने माझ्या हातात दिली होती. आणि माझी काठी कुठेतरी हरवून टाकली होती. कसे बसे आम्ही गुहेच्या पायथ्याशी पोचलो. स्पीकर वरून विविध घोषणा होत होत्या. काहीजण आपल्या सहयात्रेकरूंपासून हरवले होते ते आपल्या ठिकाणाबद्दल सूचना देत होते, श्राईन बोर्ड वाले ' इथे कोणालाही रात्री रहायची परवानगी नाही ; दर्शन झाले की परतीचा प्रवास सुरू करा' असे सांगत होते. ' वातावरण बदलून कधीही पाऊस सुरू होवू शकतो' हेही सांगितले जात होते. ४:३० वाजले होते. दर्शन घेताना सोबत काहीही न्यायला परवानगी नाहीये. मोबाईल, चप्पल , आणि बॅग यांची तिथे सोय करून आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. शरीर खूप थकले होते. आजूबाजूच्या गोंधळात काही सूचत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले की आता दर्शन बंद करणार आहेत ; ते ऐकून पोटात गोळा आला. एवढ्या जवळ येउन दर्शन न मिळणे यासारखे दुर्भाग्य काय असू शकते? परत एकदा भगवान शंकराला मनापसून प्रार्थना केली. आणि रांग पुढे जायची वाट बघू लागलो. इथून साधारण २५० ते ३०० पायर्या चढायच्या आहेत. वाटेत एका तरूण मुलीला चक्कर आली ती आमच्या खूप पुढे शिवपिंडीजवळ होती, तिला दर्शन न घेताच मागे उचलून आणावे लागले. NDRF च्या जवानानी तिला उचलून खाली आणले. तेवढ्या गर्दीतही लोकानी तिला जाण्यासाठी लगेच वाट करू दिली.
" इरादे लाख बनते है , बनकर टूट जाते है ;
श्री अमरनाथ वही आते है , जिन्हे बाबा बुलाते है!"
हे वाटेत एका बोर्डावर वाचलेले वाक्य मला तेव्हा आठवू लागले. अजून वर गेल्यावर अयोध्येतील श्रीराम मूर्ती बनवणारे श्री अरूण योगीराज यांच्याच हस्ते बनलेली श्री नंदीची मूर्ती जीची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा गुहेजवळ झाली ती दिसली. श्री नंदीला नमस्कार करून पुढे गेल्यावर मात्र फार थांबावे लागले नाही. एका रांगेत पटापट पुढे जाऊन प्रत्यक्ष गुहेत पोचलो. तिथले वातावरण फारच वेगळे होते. गुहा आतून पूर्ण ओली होती. अभिषेक केल्याप्रमाणे गुहेच्या आतल्या बाजूने वरून पाण्याचे थेंब पडत होते. त्याचा बारीक आवाज येत होता. बाहेरच्या जगाची तिथे काहीही जाणीव होत नव्हती. महादेवानी अमरकथा सांगण्यासाठी किती विलक्षण जागा निवडली हे तेव्हा जाणवले. तिथे जाऊन नक्की काय काय वाटले हे शब्दात सांगणे कठीण आहे. पण ज्या क्षणी शिवपिंडीचे दर्शन झाले तेव्हापासून डोळ्यातून अश्रूंची संततधार सुरू झाली जी पुढे बाहेर येइपर्यंत चालू राहिली. तेव्हा मनाला, शरिराला कसलाही शिणवटा जाणवत नव्हता; फक्त आपल्यावर कोणत्यातरी दिव्य शक्तीची कृपा आहे आणि त्या शक्तीचा स्रोत हा त्या गुहेतच आहे हे जाणवले. नकळत कैलास पर्वतावर ध्यानस्त बसलेले महादेवांची प्रतिमा डोळ्यासमोर येत होती. तिथे गुहेत शेजारीच माता पार्वती आणि श्री गणेश जी आणि शेषनाग जी यांच्या प्रतिमा सुद्धा असतात. त्यांचेही दर्शन घेतले आणि बाहेर निघालो. निघताना एका पुजार्यानी हातात बेलपत्र ठेवले. बाहेर आल्यावर एका बाजूला थोडी बसायला जागा आहे तिथे शांतपणे बसलो डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. शांत बसल्यावर अत्ता दहा मिनिटापूर्वी आपल्या आयुष्यात काय घडले याचा विचार करू लागलो. देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे. त्यातले फार तर काही लाख जण दरवर्षी या यात्रेला येतात आणि त्यातले आपण एक आहोत आणि एवढ्या जवळून आज शिवपिंडी चे दर्शन घेऊ शकलो. श्री अमरनाथ यात्रेबद्दल असे म्हणतात की जेव्हा महादेवांची कृपा होते तेव्हा महादेवच आपल्याला इथे बोलावून घेतात आणि दर्शन देतात त्यांच्या इछेशिवाय काहीही होत नाही. ते अगदी खरे असल्याचे जाणवले आणि मनात कृतज्ञता व्यक्त करून मी खाली उतरलो.
दर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासाबद्दल विचार सुरू झाला. बालटाल मार्गे चालतच जाण्याचे ठरवले. अंग इतके दुखत होते की परत घोड्यावर बसायची इछा नव्हती. गुहेपासून बालटाल बेस कॅंपचे अंतर १४ किमी आहे. वाटेत परत गुडघा दुखायला लागला तर काय करायचे ही भिती वाटत होती; पण दुसरा पर्याय पण नव्हता. परत एकदा देवाला प्रार्थना करून सुरूवात केली. साधारण संध्याकाळचे ७:३० झाले होते. गुहेजवळ भंडारे आहेत. पण बालटाल मार्गावर एखाद-दुसरा भंडारा आहे हे मला माहित होते म्हणून गुहेजवळच निघतानाच खाऊन घेतले. आता रात्र झाली होती. माझी काठी हुसेनने हरवली होती. त्यामुळे आता काठीशिवायच चालायचे होते. बालटाल मार्गावर परत जाणार्यांचीच वर्दळ होती. रस्त्यावर लाईट लावले आहेत. अमरावती नदीचा शांत आवाज दरीतून येत होता. दरी आणि दरीच्या पलीकडील पर्वत अजिबात दिसत नव्हते. या मार्गावर सुरूवातीला कालीमाता मंदिरापर्यंत चढण आहे. इथे डोंगरात स्वयंभू कालीमातेची मूर्ती आहे. ती रात्री दिसली नाही. पण त्यानंतर उतरण सुरू झाली. वाटेत NDRF , सैन्याचे जवान उभे होते. ते रात्रीच्यावेळी जास्त वेळ कोणाला वाटेत थांबू देत नव्हते. तसेच डोंगराच्या बाजूला जिथे दरड कोसळण्याची शक्यता होती तिथून यात्रेकरूना लवकर पुढे जायला सांगत होते.
थोड्या वेळाने माझा गुडघा परत दुखायला लागला. निघताना पायावर स्प्रे मारला होता. थोड्या वेळाने नाईलाजाने एक पेन किलर घेतली आणि तिचा प्रभाव असेपर्यंत पटापट चालून जास्तीतजास्त अंतर उतरण्याचा प्रयत्न केला. मध्येच उजव्या पायावर ताण न देता डाव्या पायावर जास्त ताण देउन चालत होतो. थोड्या वेळाने डावा पाय न उचलता घासत पुढे ओढत चालत होतो. वेदना असह्य होत होती. तीव्र उतारावर तोल सांभाळण्यासाठी तिरक्या चालीने उतरावे लागत होते. मध्ये मध्ये थांबत होतो. रात्र असल्यामुळे फार पुढचे दिसत नव्हते. आणि गर्दीही कमी होती. दिवसा या मार्गावर भरपूर धुरळा उडतो आणि डोळ्याना त्रास होतो. वाटेत एक भंडारा लागला तिथे चहा घेतला. आणि पुढे निघालो. अमरावती नदी खळाळत होती. तिचाच आवाज वातावरणात होता. तापमान एकदम थंड होते. रस्त्याच्या बाजूला उंच पर्वतांचे अस्तित्व जाणवत होते पण काळोखामुळे दिसत काहीच नव्हते. नागमोडी रस्त्यावर पुढच्या वळणांवरील लाईट दिसत होते. एकूण किती अंतर आहे आणि किती आपण पुढे आलोय याचा पत्ता लागत नव्हता. पण एकाअर्थी ते बरेच होते. गुडघा दुखायचा थांबला होता. साधारण रात्री २:३० ला दोमेल जवळील एका भंडार्यामध्ये थांबलो. त्यावेळी तिथे गरम मसाला दूध मिळाले. ते पिऊन खूप तरतरी आली. त्या भंडार्याच्या मालकाने तासभर इथे पडा, पहाटे पुढला प्रवास सुरू करा असे सांगितले. त्याने सगळ्याना झोपण्यासाठी गाद्या आणि ब्लॅंकेट घातली होती. तिथे जाउन झोपलो. पाठ जमिनीला टेकवल्यावर बरे वाटले. गाढ झोप लागली नाही. सावध झोप होती. साधारण ४ वाजता भंडारा मालकाने आम्हाला उठवले. आता बालटाल वरून दर्शनाला जाणारे यात्रेकरू यायला सुरूवात झाली होती. इथून पुढे जास्त अंतर नव्हते. चहा घेउन परत चालायला सुरूवात केली. आता नव्या उत्साहाचे यात्रेकरू खालून वर येत होते. घोडे , पालख्या परत सुरू झाल्या. साधारण ५:३० ला मी बालटाल बेस कॅंप ला पोचलो. तो कॅंप बघून पेहेलगाम कॅंप ची आठवण आली. सगळी तशीच व्यवस्था होती. कॅंप मधून बाहेर पडताना गळ्यातील RFID कार्ड जमा केले.
बालटाल वरून जम्मू ला जाणारा Army Convoy पहाटे ४ ला निघतो. मला ५:३० वाजल्यामुळे ती संधी गेली होती. पण बालटाल ला बाहेर गावात जाऊन मी Taxi केली आणि संध्याकाळी ७ पर्यंत जम्मूला पोचलो.
श्री कृष्णार्पणमस्तू !
दि ०१/०८/२०२४
![]() |
RFID Card |
![]() |
Bus fare from both routes |
Towards Pissu Top |
Towards Zozibal |
![]() |
At zozibal |
![]() |
बर्फाची शिळा |
![]() |
At Ganesh Top |
![]() |
Sheshnag Lake |
![]() |
At the Cave |
![]() |
Night view on Baltal route |
No comments:
Post a Comment