Saturday 4 March 2023

ANDAMAN DIARIES / BARATANG LIMESTONE CAVES

#AndamanTrip2023 3/4
#Baratang
#Baratang_limestone_caves
#Limestonecaves

   अंदमान ला येण्यासाठी आकृष्ट करणारे अजून एक  ठिकाण म्हणजे बाराटांग बेटावरील लाखो वर्षापूर्वीच्या नैसर्गिक चूनखडीच्या ( Limestones) गुहा.
बाराटांग हे बेट मध्य अंदमानात पोर्ट ब्लेअर पासून १०० किमी अंतरावर , पोर्ट ब्लेअर - दिग्लीपूर या NH-4 वर आहे. पण इथे मनात आले आणि जाऊन आलो असा विषय नाहीये. इथे जाण्यासाठी खास तयारी करावी लागते. ह्या भागात पोर्ट ब्लेअर पासून ४८ किमी वर " जरावा " आदिवासींची वस्ती आहे.  'जरावा' हे इथल्या मूळ रहिवाश्यांपैकी एक आहेत. पण आता त्यांची संख्या खूप कमी आहे ; म्हणून भारत सरकार ने त्यांच्या वस्तीला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. कोणीही भारतीय तिथे पूर्वपरवानगी शिवाय जाऊ शकत नाही. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन हे भारत सरकारचे उद्दीष्ट आहे. पूर्वी हे लोक हिंस्र होते आता तसे नाहीत , आता कपडे घालतात , हिंदी बोलतात , को#ड काळात टोचून पण घेतले. पण आपल्यात मिक्स होत नाहीत, ते त्यांच्याच वस्तीत खूष असतात. त्यांची शरीराची ठेवण आफ्रिकेतील निग्रोंसारखी आहे.
    तर बाराटांग ला जाताना या ' जरावा' वस्तीवरून जावे लागते. आणि तिथले नियम फार कडक आहेत. त्यांच्या वस्तीच्या आधी २० किमी वर एक गेट आहे ते सकाळी ६ ला उघडते. त्यावेळी तिथे ज्या गाड्या पुढे म्हणजे बाराटांग , दिग्लीपूर , मायाबाजार या ठिकाणी जाण्यासाठी रांगेत असतील त्यानाच तिथून प्रवेश दिला जातो. पण प्रवेश देण्यापूर्वी गाडी नम्बर , प्रवासी संख्या , त्यांची kyc हे सगळे करावे लागते. त्या गेट वर ६ च्या आधी पोहोचण्यासाठी आम्हाला पोर्ट ब्लेअर सकाळी ३ ला सोडावे लागले , त्याआधी रात्री २ ला उठावे लागले!
    ४:१५ ला आम्ही त्या गेट जवळ पोहोचलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला एका रांगेत गाडी लावावी लागते. आणि कागतपत्रांची पूर्तता करावी लागते. तिथेच चहा - नाश्त्याची छोट्या टपर्या आहेत. बरोबर ५:४५ ला स्पीकर वरून तिथले नियम सांगायला सुरूवात झाली . 'जरावा' वस्तीतून जाताना सगळ्या गाड्या एका मागोमागच जातील. कोणीही overtake करायचा नाही . गाडीचा वेग ४० प्रति तास पेक्षा जास्त नसेल. दोन गाड्यान्मध्ये २५-३० मीटर अंतर असेल. वाटेत कोणीही थांबायचे नाही. ' जरावा ' दिसले तर कोणीतरी वेगळा प्राणी दिसला असे समजून आरडाओरड अजिबात करायचा नाही , त्यांच्याकडे बोटं दाखवायची नाहीत , त्यांचे फोटो काढायचे नाहीत , त्याना खायला काही द्यायचे नाहीत , विचारपूस करायची नाही , त्याना कपडे किंवा इतर वस्तू द्यायची नाही. वाटेत plastic फेकायचे नाही , सुट्टा ब्रेक , selfie point, आडोश्याला जाणे  वगैरे काहीही करायचे नाही.
   आणि यातले काही केले तर सरळ ॲट्रोसिटी कायद्याखाली कारवाई होते. म्हणजे सरकार या बाबतीत किती गंभीर आहे हे लक्षात येते.

    बरोबर ६ वाजता आमचा त्या गेट मधून प्रवास सुरू झाला. लोकल driver सगळे नियम पाळत होते. कोणीही आगाऊपणे overtake करणे , हॉर्न वाजवणे असले प्रकार करत नव्हता. सुमारे २०० वाहने याच शिस्तीत जात होती. वाटेत २-३ वेळा  'जरावा' दिसले. आपल्याप्रमाणेच माणसे आहेत ती. शांतपणे आमच्या जाणाऱ्या गाड्या बघत होते. मनूष्याला आपल्या कातडीच्या रंगाचा उगाचच अहंकार असतो. आपल्या कातडीचा जो काही रंग आहे त्यात आपले काय कर्तुत्व असते ? आणि दुसऱ्याकडे तो रंग नसेल तर त्यात त्याचा काय दोष किंवा कमीपणा  असतो ? असो.


    हा सगळा प्रवास घनदाट जंगलातून आहे. विविध पक्ष्यांचे मंजूळ आवाज , झाडांची सळसळ , नुकत्याच झालेल्या सुर्योदयाने पसरलेला प्रकाश असं मस्त वातावरण होते. अंदमानात हिंस्र श्वापदे म्हणजे वाघ, सिंह वगैरे नाहीयेत ; त्यामुळे इथे भिती वाटत नाही. बेट असल्यामुळे ही इथली सुरक्षितता आहे. दूरून कुठून कोणी प्राणी स्थलांतर करून येण्याची पण शक्यता नाही. जोपर्यंत इथे बाहेरून आणून कोणी प्राणी सोडत नाही तोपर्यंत भिती नाही.

 
    ७:३० ला आम्ही ' जरावा ' वस्तीच्या दुसऱ्या बाजूच्या गेट ला पोहोचलो. इथे नदी आहे. ज्या गाड्या पुढे दिगलीपूर किंवा मायाबाजार ला जाणार आहेत त्या गाड्या मोठ्या बोटीत चढवल्या जातात. मला कोकणातील  धोपावे - दाभोळ फेरी बोट ची आठवण झाली. ज्याना फक्त बाऱाटांग इथे जायचे आहे त्यानी आपल्या गाड्या इथेच ठेवून फक्त बोटीवर चढायचे आणि पलीकडे जायचे. त्याप्रमाणे दहा मिनिटात आम्ही पलीकड्च्या किनार्यावर पोहोचलो. तिथे बाराटांग ला जाण्यासाठी speed boat सुटतात. त्यांचे पण आधीच booking करावे लागते. दहा जणांच्या गृप ला एक याप्रमाणे त्या बोटी सुटतात. मी गेलो तेव्हा महाराष्ट्रातील बरेच गृप आले होते त्यामुळे बोट मिळणे जरा अवघड होते. पण माझ्या driver ने सगळे सोपस्कार आधीच पुरे केले असल्याने आम्हाला बोट मिळाली. या बोटीसोबत जो captain असतो तोच पुढे गुहेपर्यंत सोबतीला येणारा गाईड असतो. हा अर्धा तासाचा प्रवास आहे. एका बाजूला प्रसिध्द अशी mangroove forest मऱाठीत ज्याला आपण खारफुटी म्हणतो ती जंगले आहेत. अर्ध्या तासाने दाट अशा खारफुटीच्या जंगलात बोट थांबते आणि आपण बारटांग बेटावर पोहोचलेलो असतो. तिथून पायी प्रवास सुरू होतो. सुमारे दीड किलोमीटर चालायचे आहे. थोडे चढणे - उतरणे आहे. वयस्कर लोकाना त्रास होवू शकतो. आणि शेवटी आपण जगप्रसिद्ध अशा limestone खाणी जवळ पोचतो. दोन्ही बाजूला उंच पण अरूंद अशा limestones च्या  खिंडीसारख्या रचनेच्या मार्गातून चालावे लागते. सुमारे १२० चौ मी मध्ये या गुहा आहेत. यातील ४० चौ मी सजीव म्हणजे त्यावर चून्याचे formation चालू आहे. बाकीच्या dead आहेत. या कशा बनतात ? किती वर्षे लागतात ? याबद्दल लेखन सीमेमुळे मी इथे लिहित नाही; google वर ही माहिती आहे.
पण या गुहेत गेल्यावर लाखो वर्ष जूने असे limestone चे formations बघायला मिळतात. त्यांचे हत्ती , मगर , श्री गणेश असे विविध आकार बघायला मिळतात. सरकारने या गुहा हल्लीच काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी मोकळ्या केल्या आहेत. तूलनेने त्या आपल्यासाठी नव्याच आहेत. गाईडच्या माहितीनुसार जिथे वरून सूर्यप्रकाश आणि पावसाचे पाणी पडते तिथले खडक वाढायचे थांबतात ; त्यालाच ते dead म्हणतात. असे dead खडक बाहेरून गुहेत आत येताना बरेच बघायला मिळतात. त्यांचे रंग राखाडी पिवळसर झालेला आहे. जे खडक अजून जिवंत आहेत ते पांढरे शुभ्र दिसतात. त्यानासुद्धा मनुष्याच्या स्पर्ष नाही झाला तर येणार्या काही हजार वर्षात त्यांचे सुद्धा मोठमोठाले formations बनतील. आपण आजपर्यंत कधीही न पाहिलेला निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहातोय याची जाणीव होते.
    पाहून झाल्यावर परत परतीचा प्रवास चालू कारण वेळ काढून चालणार नसते ; जिथे गाडी ठेवली आहे तेथील ' जरावांचे' गेट परत दुपारी १२:३० ला उघडणार असते. त्याआधी दोन जलप्रवास करून तिथे पोचणे आवश्यक असते. ते झाले की परत सगळ्या गाड्यांचा एका रांगेत परतीचा प्रवास आणि पोर्ट ब्लेअर ला पोचायला दुपारचे ३:१५ वाजतात.
बारा तासांचा प्रवास आहे पण ज्याना निसर्गाच्या आविष्कारान्ममध्ये रस आहे त्यांच्यासाठी बाराटांग च्या गुहा या not to miss catagory मध्ये येतात.
- अनिकेत शेटे
पिंपरी चिंचवड.


No comments:

Post a Comment