Saturday 4 March 2023

ANDAMAN DIARIES / CELLULAR JAIL 1/4

#AndamanTrip2023 1/4
#cellularjail 
#Savarkar 
#portblair 

आज दि. 26.02.2023 , तात्यारावांचा तारखेने  स्मृतीदिन!

   गेले काही महिने ह्या दिवशी अंदमान मध्ये सेल्यूलर जेल ला भेट द्यायचा केलेला मानस आज पूर्ण होतोय. 
   लहानपणापासून म्हणजे रत्नागिरीत पतित पावन मंदिरात जात असल्यापासून , तिथला माघी गणेशोत्सव असो किंवा शिवजयंतीचे कार्यक्रम असोत , सावरकरांविषयी काही कार्यक्रम झाला नाही असे कधी झाले नाही. नाटक असो , व्याख्यान असो , देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम असो सावरकर या धगधगत्या कुंडाची ओळख तेव्हापासून होण्यास सुरूवात झाली. यात  माघी गणेशोत्सवात आणि इतर प्रसंगी झालेली  श्री आफळे बुवांची कीर्तने फार वरच्या क्रमांकावर आहेत. 
    पुढे जरा वय वाढल्यावर " माझी जन्मठेप " हातात आले. आजपर्यंत त्याची अनेक पारायणे झाली. आणि 'अंदमान' हा शब्द्च मनात कायमचे घर करून गेलाय. पुढे आणखी वय वाढल्यावर ह्या द्वीपाबद्दल , याच्या भौगोलिक स्थानाबद्दल , रचनेबद्दल मनात खूप कुतुहल वाढले. आणि तेव्हाच मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली की इथे एकदा तरी भेट द्यायचीच. आज तो योग आलाय.

   सध्याचे सेल्यूलर जेल हे मूळ जेल च्या ३०% ते ३५%  शिल्लक आहे. पण जे शिल्लक आहे ते सुस्थितीत आहे. आत प्रवेश केल्यावर लगेच उजवीकडे आणि डावीकडे दोन मोठी दालने आहेत; एकात अंदमानात शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांची नावे आणि कुठल्या खटल्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. दुसऱ्यात काळे पाणी म्हणजे काय ? कुठल्या कुठल्या शिक्षा केल्या जात ? अंदमानचा थोडक्यात इतिहास , इंग्रजांच्या काळातील अंदमानचे काही दुर्मिळ फोटो अशा गोष्टी आहेत. आणखी एक तिसरे दालन जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदमान भेटीचे फोटो आहेत. हे पाहून आत आल्यावर डावीकडे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील ज्ञान अज्ञात वीरांचे स्मृती स्मारक आहे. सेल्यूलर जेल हा स्टार फिश च्या आकारात म्हणजे केंद्रभागी एक tower आणि त्याला विविध दिशेत सात  ( आपण पाकळ्या म्हणूया ) लांबच्या लांब कोठड्यांच्या इमारती  अशी रचना होती. त्यावेळी इथे सुमारे ७०० कैदी ठेवायची क्षमता होती. 
सध्या या सातपैकी केवळ तीन पाकळ्या शिल्लक आहेत. यांची पण रचना अशी आहे की एका पाकळीतल्या कोठडीतील  कैद्याला समोरच्या पाकळीतील तसेच आपल्या पाकळीतल्या कुठल्याही कोठडीतील  कैदी दिसता कामा नये. तळ मजल्यावरील काही कोठड्या उघड्या आहेत. आपण आतून त्या पाहू शकतो. आम्ही त्या पाहिल्या ;  पण आता आम्हाला तात्यारावांची कोठडी पहायची होती. जेल मध्ये आत गेल्यावर उजवीकडील पाकळीवर दुसर्या मजल्यावरील सर्वात शेवटची कोठडी त्यांची आहे. तिथे जाताना पाय अक्षरश : थरथरत होते. " माझी जन्मठेप " मध्ये लिहिलेले अत्याचार डोळ्यासमोर येत होते. आज स्मृतीदिन असल्यामुळे गर्दी खूप होती. कोठडीत पण गर्दी होती ; जरा गर्दी ओसरल्यावर आम्ही आत गेलो आणि तात्यारावांच्या तसबीरीकडे पाहून थिजून गेलो. त्याच कोठडीत दोन्ही हात वर भिंतीला बांधून तासनतास उभे असलेले तात्याराव डोळ्यासमोर येउ लागले , कैद्यांचे हात - पाय ताठ रहावेत ( bend करता येउ नयेत ) म्हणून बनवलेल्या बेड्यान्मधले तात्याराव दिसायला लागले. त्या बेड्या तशाच हातात घेउन घासत चालणारे तात्याराव, कोळशाने भिंतीवर " कमला " लिहिणारे तात्याराव , कोलू ओढणारे तात्याराव , असोला नारळ हाताने सोलणारे तात्याराव , बारी सारख्या नराधमाकडून अपमान सहन करणारे तात्याराव , " अनादि मी , अनंत मी " हे अजरामर गीत रचण्यापूर्वीचे विमनस्क तात्याराव अशी अनेक रूपे डोळ्यासमोर आली आणि एकाच वेळी आपल्या शरिरात असंख्य सूया कोणीतरी टोचतयं अशा वेदना जाणवल्या. किती वेळ गेला हे कळले नाही. तिथली फुले तात्यारावांच्या तसबीरीवर अर्पण करून बाहेर आलो. 
संध्याकाळी तिथे एक लाईट आणि साउंड शो असतो. बघण्यासारखा आहे. जेलच्या दोन पाकळ्यांच्या भव्य पार्श्वभूमीवर हा शो दाखवला जातो. इंग्रजानी आमच्याच जमिनीवर , आमच्याच माणसांचे कष्ट वापरून , आमच्याच पैशाने , आमच्याच क्रांतीकारकांवर अत्याचार करण्यासाठी हा जेल बांधला. निर्दयीपणाची किती  परिसिमा गाठली गेली याची साक्ष म्हणजे हा तुरूंग आहे. आईपासून तिचे लेकरू क्षणभर दूर झाले तर तिचा जीव वर खाली होतो ; इथे भारत मातेचे किती सुपुत्र किती वर्षे खितपत पडले होते. त्यांच्या बद्दल , त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बातम्या तर सोडा साधी कुजबूज कोठडीबाहेर होत नव्हती. असे काय पाप केले होते त्यानी ? त्याना स्वतःबद्दल , कुटूंबाबद्दल स्वप्ने नसतील ? प्रपंच करावा नेटका असे वाटले नसेल ? देश वाचवायची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी ; मला संसार आहे असे का वाटले नसेल ? या असंख्य वीरांचे  ऋण आपल्यावर  आहेत जे आपण कधीच फेडू शकत नाही. 
    यानंतर कैद्याना फाशी देण्याची जागा , कोलू ओढण्याची जागा  पाहिल्या. जेल च्या बाहेर एका बागेत इथे ज्यांचे प्राण गेले अशा वीरांचे पुतळे आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. 
लाईट आणि साउंड शो पाहिल्यावर मनाला एक खिन्नता येते. आज इतक्या वर्षानीसुद्धा मन त्याच काळात जाते आणि आपला देश दीडशे वर्षांच्या गुलामीत का अडकला ? आपण हे टाळू शकलो नसतो का ? असे विचार मनात यायला लागले. सोबत आजही सावरकरांवर होणारे आरोप ऐकून अजून चिडायला होते. हे सर्व आरोप करणार्यानी , शंका घेणार्यानी आपल्या घरात डोक्यावर छप्पर असताना , फॅन / एसी  वगैरे सोयी असताना एका जागेवर फक्त  एक तास न हलता उभे राहून कसे वाटते ते बघावे. सावरकरानी दहा वर्षे परकियांचा छळ इथे सोसलाय ; त्यांच्यावर शंका घेताना आपली जीभ झडत कशी नाही ? भरल्या पोटी आपली नसलेली बुद्धी दाखवणे हे नतद्रष्टपणाचे लक्षण आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या व्यक्तीची देशाचा पहिला पंतप्रधान होण्याची योग्यता होती त्याना साधे सरकारी ध्वजारोहणाचे आमंत्रण मिळाले नाही ; त्यानी अत्यंत साधेपणाने आपल्या घरात ध्वजारोहण केले. आणि अशाच कृतघ्न लोकांच्या अवलादी आजही तात्यारावांच्या त्यागावर शंका घेतात ? अजून किती अपमान करणार आहोत आपण सावरकरांचा ? डोके सुन्न होते हे सगळे आठवून ..
शेवडे गुरूजीनी उल्लेख केल्याप्रमाणे अंदमान हे "राष्ट्रतीर्थ" आहे ; प्रत्येक भारतीयाने इथे भेट दिलीच पाहिजे. 
आज आता अजून दुसरे काही पहाण्याची इच्छा नाहीये. बाकी अंदमान बाबत नंतर लिहेन ...

(सोबत काही फोटो / विडिओ जोडतोय. खरं तर ही जागा आनंदाने फोटो काढण्याची नाहीये ; पण काही वेळा स्थळ , काळ , वेळ आणि मनस्थिती अनुकूल नसली तरीही फोटो काढावे लागतात आणि त्या प्रतिकूलतेचेही साक्षीदार आपल्याजवळ कायम असावेत असे प्रकाशचित्रकार म्हणून माझे मत आहे.)

- अनिकेत शेटे. २६-०२-२०२३ 
पोर्ट ब्लेअर , अंदमान

No comments:

Post a Comment